६३ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. नैवेद्या वैती हिने मुंबई जिल्हास्तरीय ‘तायक्वांडो क्योरूगी’ स्पर्धेत पटकावले रजतपदक !
कु. नैवेद्या हिने मिळवलेल्या यशाविषयी सनातनच्या वतीने तिचे अभिनंदन !
मुंबई, १४ डिसेंबर (वार्ता.) – महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली सनातन संस्थेची दैवी बालिका कु. नैवेद्या संदीप वैती (वय ७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) हिने मुंबई जिल्हास्तरीय ‘तायक्वांडो क्योरूगी’ स्पर्धेत रजतपदक (चांदीचे पदक) पटकावले. या यशाबद्दल पदक आणि प्रमाणपत्र देऊन तिला गौरवण्यात आले. कु. नैवेद्या शिवडी येथे रहाते.
कु. नैवेद्या ही इंडियन एज्युकेशन सोसायटी ओरायन (आय.ई.एस्. ओरायन) या शाळेत इयत्ता १ ली मध्ये शिकते. मुंबई जिल्हास्तरीय ‘तायक्वांडो क्योरूगी’ स्पर्धेत २० किलो वजनाच्या गटात तिने हे प्राविण्य दाखवले. दोन पूर्वप्रतियोगिता जिंकून अंतिम स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. मागील ४ मासांपासून प्रशिक्षक किरण गावंडे यांच्याकडून ती नियमित ‘तायक्वांडो क्योरूगी’चे प्रशिक्षण घेत आहे.
स्पर्धेत मिळालेल्या यशाविषयी बोलतांना कु. नैवेद्या म्हणाली, ‘‘स्पर्धेच्या वेळी श्रीकृष्णबाप्पाचे अस्तित्व जाणवत होते. हे यश मला श्रीकृष्ण आणि परमपूज्य डॉ. आठवले यांच्या कृपेने मिळाले.’’ ती नियमित नामजप आणि सेवा करते. ‘तिच्याकडून चूक झाल्यास ती स्वत:चे कान पकडून क्षमा मागते’, असे तिचे वडील श्री. संदीप वैती यांनी सांगितले.