काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार कधी ?

संपादकीय

हिंदूंना त्यांच्या प्रत्येक हक्कासाठी प्रदीर्घ लढा द्यावा लागतो, हे संतापजनक !

भगवान शिवाने श्री विष्णूकडून कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी मागून घेतलेली विश्वातील सर्वांत प्राचीन, म्हणजे वैदिक काळापूर्वीपासूनची नगरी काशी ! ५ नद्यांचा वास असलेली, आदि शंकराचार्यांनी पुनर्स्थापना केलेली ही १ सहस्र ६४१ हून अधिक मंदिरांची नगरी आहे. येथील चैतन्यशक्तीमुळे ‘परमेश्वराप्रती उत्कट भाव असणार्‍याला मोक्षापर्यंत नेणारी मोक्षनगरी’ म्हणून तिचे माहात्म्य आहे. त्यामुळेच दक्षिण आणि उत्तर दोन्ही भारतियांच्या श्रद्धेचे भारतातील परमतीर्थस्थान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मतदारसंघ म्हणून निवडले, हेही अर्थवाही आहे. पंतप्रधान मोदी यांच्या सर्वच गोष्टी विशेष असल्याने केवळ त्यांचा मतदारसंघच म्हणून नव्हे, तर भारतातील या सर्वाेच्च तीर्थस्थळाचा विकासही असाच होणे, हे मोदी यांच्या कर्तृत्वशैलीला साजेसे आहे. मोदी यांना पंतप्रधान होऊन ८ वर्षे पूर्ण होत असतांना आता समस्त देशातील धर्माभिमानी हिंदूंची ‘राममंदिराप्रमाणेच मुसलमान आक्रमकांनी अतिक्रमण केलेली हिंदूंची धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी अपेक्षा आहे.

अनादि काशी विश्वेश्वराला मुक्त करा !

स्कंद पुराणात काशीतील या शिवमंदिराचे वर्णन आहे. वर्ष १२०६ नंतरच्या काळात विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडून तिथे मशीद उभारली. अकबराच्या काळात तोडरमल राजाने हे मंदिर पुन्हा बांधले. औरंगजेबाने मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मशिदीच्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर बांधले, जे सध्या अस्तित्वात आहे. त्यानंतर राजा रणजितसिंह यांनी त्याच्या कळसावर सोन्याचा मुलामा चढवला होता. विश्वेश्वरावरील आक्रमणकर्त्या सोलार मसुदला राजा सुहेदेव यांनी पराभूत केले. वर्ष १७८१ मध्ये इंग्रज अधिकारी वॉरन हेस्टिंगला काशीवासियांनी पलायन करण्यास भाग पाडून विश्वेश्वराचरणी भक्तीची प्रचीती दिली. आता वर्ष २०२१ मध्ये अनादि काशीविश्वेश्वर परिसराचा जीर्णाेद्धार पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने घडत आहे, ही चांगलीच गोष्ट झाली आहे; परंतु हिंदूंना मूळ मंदिर परत हवे आहे. जर मोदी शासन राममंदिरावरील आक्रमणाचा न्यायालयीन लढा लढून तिथे मंदिर उभारण्याचे कार्य चालू करू शकते, तर भारताच्या हृदयस्थानी असणार्‍या काशीमध्येही त्यांनी मनात आणले, तर त्यांना ते सहज शक्य आहे. भाजपची मातृसंघटना रा.स्व. संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदु परिषदेची ही जुनी मागणी आहे, तशीच देशभरातील समस्त धर्माभिमानी हिंदूंची साहजिकच ती मनोकामना आहे. राममंदिर उभारण्याला गती मिळाल्यापासून या मनोकामनेचे आता ध्येयात रूपांतर होत चालले आहे. मोदी शासनानेही हे लक्ष्य कदाचित् ठेवलेले असू शकते; मात्र सध्या तरी परिसर विकासाच्या कार्याच्या निमित्ताने ते हिंदूंच्या लक्षात आलेले नाही.

काशी विश्वेश्वर मंदिर

हिंदूंची मंदिरे हिंदूंची कधी होणार ?

भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत, परिसरातील सर्व छोट्या-मोठ्या मंदिरांना योग्य ते स्थान देऊन, तीर्थक्षेत्री येणारे भाविक अन् जिज्ञासू यांच्या आवश्यकता लक्षात घेऊन, सौंदर्य आणि भव्यता यांचे मेळ साधून काशी विश्वेश्वर मंदिराच्या परिसराचे शासनाने पुनर्निर्माण केले. ते एक आदर्श तीर्थक्षेत्र विकासाचे उदाहारण म्हणता येईल. अलीकडच्या काळात वाराणसीतील विश्वेश्वराच्या या सर्वाेच्च मंदिराचा परिसर छोट्या अरुंद रस्त्यांनी आणि बांधकामांनी गजबजल्याचे लक्षात आले होते. या मंदिराच्या परिसराचा विकास करणे आवश्यक होतेच; परंतु त्याचसमवेत मूळ मंदिराच्या ठिकाणी मंदिराचा जीर्णाेद्धार झाला असता, तर हिंदूंचा आनंद गगनात मावला नसता. परिसराच्या या उद्घाटन कार्यक्रमाला आलेल्या शेकडो साधू-संतांचे मोदी यांना आशीर्वाद आहेतच; परंतु मूळ मंदिराच्या ठिकाणी जर मंदिर उभे राहिलेले त्यांना पहायला मिळाले असते, तर त्यांचा आनंद द्विगुणीत होऊन ईश्वराची भरभरून कृपा अनुभवायला मिळाली असती. भारतातील सहस्रो मंदिरे पाडून त्या जागी किंवा त्याच्या लगत मशिदी उभ्या राहिल्याचा कटू इतिहास घेऊन आज हिंदू वर्तमानात जगत आहेत. हिंदूंच्या पिढ्या पुढे सरकत चालल्या, तरी त्यांच्या मनातील या भळभळत्या जखमा अद्यापही तशाच आहेत. मोदी शासन आल्यानंतर हिंदूंना काहीसा दिलासा मिळाला आहे. राममंदिर उभारण्याच्या कार्याने हिंदूंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ते स्वप्न आज ना उद्या पूर्ण होईल, यासाठी हिंदू मोदी यांच्यासारख्या सक्षम नेत्याकडे आशेने पहात आहेत. सर्वसामान्य हिंदूच्या मनातील ही भावना आहे. नुकतेच हिंदु धर्मात परत आलेले वसीम रिझवी, म्हणजे जितेंद्र त्यागी यांनी म्हटले होते, ‘‘मुख्य ११ मशिदी हिंदूंना परत द्याव्यात.’’ त्यागी यांनी केवळ ११ ठिकाणे सांगितली आहेत; मात्र भारतात मंदिरे पाडून मशिदी पाडल्याचा इतिहास पहाता ही संख्या सहस्रोंच्या घरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच पातशाह्यांचे आक्रमण रोखले ते क्षात्रतेज आणि भवानीदेवीच्या कृपेने. आज मोदी यांच्या जवळही या दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळेच हिंदूंची त्यांच्याकडून त्यांची मंदिरे परत मिळावीत, अशी रास्त अपेक्षा आहे. हिंदूंचा द्वेष करणार्‍यांचा भरणा असणार्‍या काँग्रेसकडून हिंदूंनी ही अपेक्षा कधीच ठेवली नाही; मात्र मोदी यांच्याकडून काशी विश्वेश्वराचे मूळ मंदिर परत मिळवण्याची अपेक्षा आहे; कारण विश्वेश्वराच्या कृपेवर त्यांचा विश्वास आहे आणि त्याच्याच कृपेने ते त्या मतदारसंघातून निवडून येऊन देशाच्या सर्वाेच्चपदी विराजमान झाले आहेत. काशी विश्वेश्वर मंदिर परत मिळण्यासाठी हिंदूंना प्रदीर्घ न्यायालयीन लढा द्यावा लागणार आहे. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप’ कायदाही हे मंदिर परत मिळण्याच्या आड येत आहे. हा कायदाच रहित करून हे मंदिर हिंदूंना परत मिळण्यासाठी मोदी शासनाने प्रयत्न करावेत, हीच हिंदूंची अपेक्षा आहे !