उत्साही, हसतमुख आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले पुणे येथील सनातनचे साधक श्री. इंद्रजित वाडकर अन् जिज्ञासू वृत्ती असलेल्या सौ. शिवानी इंद्रजित वाडकर !
२९.११.२०२१ या दिवशी पुणे येथील सनातनचे साधक चि. इंद्रजित वाडकर आणि गिरगाव (तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर) येथील चि.सौ.कां. शिवानी सावंत यांचा कोल्हापूर येथे शुभविवाह झाला. त्या निमित्त साधकांना चि. इंद्रजित वाडकर यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि सौ. शिवानी यांची त्यांचे यजमान श्री. इंद्रजित यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
लेखिका – सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि सौ. राजश्री खोल्लम, पुणे
१. सेवा करण्यास साधक उपलब्ध होण्यात अडचण असल्यास ती सेवा स्वतः करणे
‘कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या दळणवळण बंदीपूर्वी काही कालावधी इंद्रजितदादा सकाळी नोकरी करून रात्रीही नोकरी करत होता. त्या काळात त्याला शक्य असेल, तेव्हा तो ‘बस’मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे ठेवण्याची सेवा करत असे, तसेच शक्य तेव्हा मुद्रणालयात सेवेलाही येत असे. काही सेवा रात्री उशिरापर्यंत असल्यामुळे अनेक वेळा या सेवेला साधक उपलब्ध होण्यात अडचण येते. अशा वेळी दादा ती सेवा स्वतः करतो.
२. सेवेत अडचणी आल्यास सकारात्मक राहून सेवा पूर्ण करणे
मुद्रणालयाच्या सेवेची व्याप्ती पुष्कळ आहे. या सेवेत अनेक साधकांशी समन्वय करावा लागतो. तेव्हा कधी अडचणीही येतात. अशा वेळी दादा सकारात्मक राहून सर्व सेवा करतो. तो मनमोकळेपणाने स्वतःच्या अडचणी सांगून सहसाधकांचे साहाय्य घेतो.’
लेखक – श्री. संदीप सकपाळ (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि श्री. राजेंद्र दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१. नम्रता
‘दादाचा सेवेनिमित्त अनेक साधकांशी संपर्क येतो. त्याच्या मनात सर्वांविषयी आदर असल्यामुळे तो सर्वांशी नम्रतेने बोलतो.
२. दादाच्या घरातील वातावरण आश्रमातील वातावरणाप्रमाणेच जाणवणे
आम्ही सेवेनिमित्त पुणे येथे गेल्यावर प्रत्येक वेळी आमची रहाण्याची व्यवस्था दादाच्या घरी असते. तेव्हा त्याच्या घरातील वातावरण आश्रमातील वातावरणाप्रमाणेच जाणवते. दादाच्या घरातील सर्व जण आमच्याशी मिळूनमिसळून वागतात.
३. सेवेची तळमळ
३ अ. सेवा परिपूर्ण करणे : काही वेळा ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकांची छपाई बाहेरील जिल्ह्यांतून करून घ्यावी लागते. तेव्हा ‘छपाई, अंकांचे वितरण आणि वाहनांची व्यवस्था’ यांचे नियोजन मोठ्या प्रमाणावर करावे लागते. त्यासाठी अधिक कालावधी द्यावा लागतो. तेव्हा ‘नोकरी करून या सेवांचा समन्वय करणे जमेल का ?’, असा विचारही दादाच्या मनात येत नाही. तो त्याही परिस्थितीत ‘विशेषांकांच्या संदर्भातील नियोजन परिपूर्ण कसे होईल ?’, यासाठी धडपडत असतो.
३ आ. स्वतःच्या विवाहाच्या सिद्धतेसाठी जातांनाही सेवेला प्राधान्य देणे : दादाला स्वतःच्या विवाहाच्या सिद्धतेसाठी १९.११.२०२१ या दिवशी पुण्याहून कोल्हापूर येथे जायचे होते. शनिवारी अंकांची छपाई अधिक होती, तसेच ‘एस्.टी.’च्या संपामुळे खासगी वाहनाने अंक पाठवायला अतिरिक्त व्यय येणार होता. तेव्हा दादाने शुक्रवारी कोल्हापूरला जाणे रहित करून शनिवारी स्वतःच्या वाहनातून कोल्हापूरपर्यंतचे सर्व गठ्ठे वितरण करण्याचे नियोजन केले.’
लेखक -श्री. विलास गायकवाड, पुणे
१. उत्साही
‘दादा नेहमी उत्साही असतो आणि तो इतरांनाही सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
२. हसतमुख
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र्र आवृत्तीच्या अंकांची छपाई पुणे येथे केली जाते. दादा ती सेवा दायित्व घेऊन करतो. एकाच वेळी अनेक सेवा आल्या, तरीही दादा सतत हसतमुख असतो.
३. इतरांशी जवळीक साधणे
दादा अनोळखी व्यक्तीशींही लगेच जवळीक साधतो आणि त्यांच्याशी सहजतेने बोलतो. मुद्रणालयामधील कर्मचारी, तसेच बस स्थानकावरील ‘कंट्रोलर’ (नियंत्रक) यांच्याशीही त्याची जवळीक आहे. दादा त्यांच्याशी सहजतेने संवाद साधू शकतो. त्यामुळे दादाला त्यांचे सेवेत साहाय्य होते.
४. इतरांना साहाय्य करणे
आम्हाला सेवेविषयी काहीही अडचण आल्यास आम्ही दादाला मनमोकळेपणाने सांगतो. ‘तो साहाय्य करील’, याची आम्हाला निश्चिती असते. त्यामुळे सेवा करतांना आम्हाला त्याचा आधार वाटतो.’
लेखक – श्री. गिरीश गुडी, पुणे
१. ‘तो छपाईच्या सेवेतील समन्वय करतांना नवीन सूत्रे शिकण्याचा प्रयत्न करतो.
२. प्रेमभाव : दादा सेवेतील साधकांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी जाणून घेतो. त्याच्यातील प्रेमभावामुळे त्याच्याशी बोलतांना आनंद मिळतो. त्याच्यातील या गुणामुळेच त्याचा मित्रपरिवार मोठा आहे.
३. तो साधकांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांना सेवा देतो.
४. झोकून देऊन सेवा करणे : दादा कार्यालयीन कामांत दिवस-रात्र व्यस्त असूनही पुष्कळ वेळा रात्री उशिरापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’ची छपाई आणि वितरण यांची सेवा करतो. त्याची समन्वयाची सेवा रात्री उशिरापर्यंत चालते आणि पहाटे पुन्हा चालू होते. असे असले, तरी तो न थकता नियमितपणे सेवा करतो.
५. चुकांविषयी संवेदनशील असणे : तो त्याच्याकडून होणार्या चुकांविषयी संवेदनशील असतो. एकदा झालेली चूक पुन्हा न होण्यासाठी तो प्रयत्न करतो. त्यासाठी तो इतरांचेही साहाय्य घेतो.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २७.११.२०२१)
शांत स्वभाव आणि जिज्ञासू वृत्ती असलेल्या सौ. शिवानी इंद्रजित वाडकर !१. ‘सौ. शिवानी स्वभावाने शांत आहे. ती सगळ्यांना समजून घेते.’ विवाहानंतर दृष्ट काढत असतांना माझ्या आईने ‘दृष्ट कशी काढावी ?’, याविषयी तिला माहिती सांगितली. त्या वेळी ‘कसे बसायचे ? हातांची मुद्रा कशी करायची ?’ इत्यादी जाणून घेऊन शिवानीने लगेच तशी कृती केली.’ – श्री. इंद्रजित वाडकर (यजमान), पुणे (२.१२.२०२१) |