भारतीय चलनी नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करा ! – कोलकाता उच्च न्यायालयात याचिका
कोलकाता (बंगाल) – भारतीय चलनी नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्याची मागणी करणारी याचिका कोलकाता उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर सुनावणी करतांना न्यायालयाने केंद्र सरकारला याविषयीचे उत्तर देण्यास नोटीस बजावली आहे. यावर २१ फेब्रुवारी २०२२ या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
९४ वर्षीय स्वातंत्र्यसैनिक हरेन बागची विश्वास यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे. त्यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे की, म. गांधी यांच्याप्रमाणेच नोटांवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे छायाचित्र का प्रसिद्ध केले जात नाही ? भारत सरकारने अद्याप नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाला योग्य मान्यता दिलेली नाही.
Calcutta High Court Seeks Centre’s Response In Plea Seeking Printing Of Netaji Subhash Chandra Bose’s Picture On Indian Currency Notes @Aaratrika_11 https://t.co/QeW9dcuaOf
— Live Law (@LiveLawIndia) December 14, 2021
यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली आहे अशी मागणी करणारी याचिका !
सप्टेंबर २०२१ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने सुनावणी करतांना नेताजी बोस यांचे छायाचित्र नोटांवर छापण्याची मागणी करणारी एक याचिका फेटाळली होती. न्यायालयाने म्हटले होते की, नोटांवर म. गांधी यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचेही छायाचित्र न छापण्याचा केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांचा निर्णय योग्य आहे. न्यायालय नेताजी बोस आणि अन्य कोणत्याही स्वातंत्र्यसैनिकाला न्यून लेखत नाही. सर्व ज्ञात आणि अज्ञात लोकांनी कार्य केलेले आहे. जर कुणी प्रत्येकाविषयी अशी मागणी करू लागले, तर त्याला अंतच रहाणार नाही.