सार्वजनिक बांधकाम खात्यात ७० कोटी रुपयांचा नोकरभरती घोटाळा झाल्याचा सत्ताधारी भाजपच्याच मंत्र्याचा आरोप !

  • १५ ऑक्टोबर २०१९ नंतरच्या सर्वच नोकरभरतीचे ‘सीबीआय’च्या वतीने अन्वेषण करा ! –  काँग्रेसची राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्याकडे मागणी 
  • वजन माप खात्यात भरतीच्या वेळी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १०० गुण दिल्याचा आरोप

पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) :  सार्वजनिक बांधकाम खात्यातील कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक साहाय्यक पदे यांच्या भरतीत तब्बल ७० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विद्यमान भाजप सरकारमधील महसूलमंत्री आतानासियो उपाख्य बाबूश मोन्सेरात यांनी ११ डिसेंबर या दिवशी केला होता. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांची १३ डिसेंबर या दिवशी राजभवन येथे भेट घेतली. १५ ऑक्टोबर २०१९ नंतरची सर्व पदे मोडीत काढावीत, तसेच या दिनांकानंतर झालेल्या नोकरभरती प्रक्रियेचे ‘केंद्रीय अन्वेषण विभाग’च्या (‘सीबीआय’च्या) वतीने अन्वेषण करावे, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस पक्षाने या वेळी राज्यपालांना दिले. या वेळी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष तथा आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स आदींची उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम खात्यासमवेतच गोवा वैद्यकीय महाविद्यालय, पोलीस दल आणि वजन माप खाते या खात्यांतील नोकरभरतीमध्ये वशिलेबाजी आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, वजन माप खात्यात भरतीच्या वेळी मंत्र्याच्या स्वीय सचिवाला लेखी परीक्षेत पैकीच्या पैकी म्हणजे १०० गुण दिले आहेत. ही वशिलेबाजी आहे. नोकरभरतीतील घोटाळ्यामुळे राज्यातील पात्र उमेदवारांमध्ये खच्चीकरण केल्याची भावना निर्माण झाली आहे.’’

यानंतर पत्रकारांना गिरीश चोडणकर म्हणाले, ‘‘सरकाने वर्ष २०१९ पासून कर्मचारी निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) जाणीवपूर्वक निद्रिस्त ठेवला आहे. त्यामुळेच सरकारी खाती, स्वायत्त संस्था, महामंडळे, निम स्वायत्त संस्था आदींमध्ये वशिलेबाजी आणि भ्रष्टाचार करण्यासाठी सरकारला वाव मिळाला आहे. यापुढे कर्मचारी भरती कर्मचारी निवड आयोगाच्या वतीनेच करण्यात यावी.’’

मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी !  मायकल लोबो

मायकल लोबो

या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून प्रकरणाचे अन्वेषण करावे. नवीन विधानसभेत जर मी सरकारमध्ये असेन, तर नक्कीच कर्मचारी निवड मंडळाची स्थापना करून मंडळाच्या वतीने कर्मचारी भरती प्रक्रिया राबवणार आहे, असे मत बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

प्रकरणाविषयी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करणार ! – सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

सदानंद शेट तानावडे

नोकरभरती घोटाळ्याविषयी केलेला आरोप हा सरकारी पातळीवरील आहे. त्यामुळे याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करणार आहे. त्यानंतरच संबंधित आमदार आणि मंत्री यांच्याकडे बोलणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.