आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या बाहेर अभाविपची निदर्शने!
म्हाडाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण !
मुंबई – म्हाडाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी १३ डिसेंबर या दिवशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानाच्या बाहेर निदर्शने केली. आंदोलनकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या त्यागपत्राची मागणी करत त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.
म्हाडातील विविध ५६५ रिक्त जागांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार होती. १२, १५, १९ आणि २० डिसेंबर या दिवशी म्हाडाच्या विभागीय मंडळातील विविध केंद्रांवर ही परीक्षा होणार होती; मात्र परीक्षेला ३-४ दिवस असतांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ही परीक्षा घेणार्या ‘जी.ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीस’ या आस्थापनाचे संचालक डॉ. प्रीतीश देशमुख यांच्यासह ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.