सातारा येथे ‘हाफ हिल मॅरेथॉन’ स्पर्धा उत्साहात
पुरुषांमध्ये माण (जिल्हा सातारा) येथील बाळू पुकळे, तर महिलांमध्ये मुंबई येथील मनीषा जोशी प्रथम !
सातारा, १३ डिसेंबर (वार्ता.) – कोरोनामुळे गत २ वर्षांपासून रखडलेल्या ‘सातारा हाफ हिल मॅरेथॉन’ स्पर्धा १२ डिसेंबर या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील पुकळेवाडी येथील बाळू पुकळे यांनी पुरुषांमध्ये, तर मुंबई येथील मनीषा जोशी यांनी महिलांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. येथील ‘पोलीस परेड ग्राउंड’वर सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते झेंडा फडकावून स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी झाले होते. ज्यांचे लसीचे २ डोस पूर्ण झाले आहेत, अशा केवळ १ सहस्र ५०० स्पर्धकांना प्रवेश देण्यात आला होता. २१ किलोमीटर अंतर असलेली ही स्पर्धा बाळू पुकळे यांनी १ घंटा १४ मिनीट १३ सेकंद, तर मनीषा जोशी यांनी १ घंटा ४६ मिनीट ३५ सेकंदामध्ये पूर्ण केली.