पुणे शहरात ‘होर्डिंग’ लावण्यासाठी सर्रास वृक्षतोड !
आकाशचिन्ह विभाग, वृक्ष प्राधिकरण समितीचे दुर्लक्ष
पुणे – शहरात अनधिकृत आकाशचिन्ह फलक (होर्डिंग) लावणार्यांना ५० सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्याचा नियम महापालिकेने केला आहे; पण शहरात अनेक होर्डिंग व्यावसायिकांनी सर्रास झाडांच्या फांद्या तोडून मोठमोठे होर्डिंग लावले आहेत. झाडाच्या फांद्या वाढल्यानंतर त्या पुन:पुन्हा कापल्या जातात. यासाठी होर्डिंग व्यावसायिक वृक्ष प्राधिकरण समितीची कोणतीही अनुमती घेत नाहीत. यावर आकाशचिन्ह विभाग, वृक्ष प्राधिकरण समितीकडूनही दुर्लक्ष होतांना दिसत आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी सांगितले की, शहरात अशा प्रकारचे ‘होर्डिंग’ लावणार्यांवर गुन्हे नोंद करण्याचे आदेश आकाशचिन्ह विभागाला दिले आहेत.
‘परिवर्तन’ या सामाजिक संस्थेचे सदस्य अनिकेत राठी म्हणाले की, आकाशचिन्ह विभागाने नवे नियम नुकतेच घोषित केले; पण ही नियमावली केवळ कागदावरच असून, यापूर्वीपासून होर्डिंगसाठी वृक्षतोड करणार्यांवर प्रत्यक्षात कारवाई केली जात नाही. त्यामुळे झाडे तोडण्याचे प्रमाणही वाढत आहे. नवीन नियमावलीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत प्रशासनाने दाखवावी. (आकाशचिन्ह विभाग नवे नियम घोषित करते; परंतु कारवाई का होत नाही ? नियम केवळ जनतेला दाखवण्यासाठी आहेत का ? असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)