आश्रम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक स्थान ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

सनातन आश्रम, रामनाथी

‘२०.७.२०२१ या दिवशी माझे वडील म्हणजे हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांच्याशी भ्रमणभाषवर बोलतांना त्यांनी मला विचारले, ‘‘तुला रामनाथी आश्रमात येऊन १ वर्ष होत आले. तुला कसे वाटत आहे ?’’ मी म्हणालो, ‘‘माझा आध्यात्मिक त्रास नियंत्रणात आल्यासारखे जाणवत आहे. स्वतःचे स्वभावदोष माझ्या लक्षात येत असून मला अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत.’’ त्या वेळी पू. बाबांनी ‘मला आश्रमात रहाण्याचे महत्त्व’ आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये आश्रमाप्रती भाव निर्माण करून त्यांना कसे घडवले ?’, याविषयी पुढील सूत्रे सांगितली. ही सूत्रे लिहून घेतल्यामुळे श्री गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’ – श्री. सोहम् नीलेश सिंगबाळ

(पू. नीलेश सिंगबाळ आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मुलगा, वय २४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२१)          ॐ

पू. नीलेश सिंगबाळ

१. आश्रमाविषयी शिकायला मिळालेली सूत्रे

१ अ. ‘गुरूंचे कार्य आपलेच आहे’, असा भाव स्वतःत निर्माण होणे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे ! : ‘मी वाराणसी येथे केवळ दायित्वाची सेवा न करता झाडणे-पुसणे, वाहन चालवणे, साहित्य (पार्सल) आणणे इत्यादी सेवाही केल्या आहेत. या सर्व सेवांमुळे माझ्यात ‘गुरु आणि त्यांचे कार्य माझेच आहे’, असा भाव निर्माण झाला. असा भाव निर्माण होणे, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा आहे.

१ आ. वाराणसी येथे साधकसंख्या अल्प असतांना अनेक सेवा एकट्याला कराव्या लागणे, त्या वेळी ‘देव शिकण्याची संधी देत आहे’, असा दृष्टीकोन ठेवणे : काही वर्षांपूर्वी वाराणसी येथे साधकसंख्या अल्प असल्यामुळे मला एकट्याला अनेक सेवा कराव्या लागायच्या; पण मी कधीही ‘मीच सर्व सेवा का करायच्या ?’, असा विचार केला नाही. त्याऐवजी मी ‘देव शिकण्याची संधी देत आहे’, असा दृष्टीकोन ठेवला. अशा प्रकारे सकारात्मक राहिल्यास ईश्वर जलद गतीने पुढे नेऊन प्रगती करवून घेतो.

 

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१ इ. आश्रमात स्वेच्छेतून परेच्छेत जाणे सोपे होते ! : आश्रमात रहाण्याचा अजून एक लाभ म्हणजे आपले वेगळे अस्तित्वच रहात नाही. घर म्हणजे माया असते. माझी खोली, माझ्या पद्धतीचे जेवण इत्यादी विचार आणि स्वेच्छाही असतात. ‘आश्रमात आपण सर्वांमधील एक आहोत’, या भावाने असतो. त्यामुळे स्वेच्छेने करण्यापेक्षा विचारून करण्याचा प्रयत्न होतो आणि आपण स्वेच्छेतून परेच्छेत जातो.

 

१ ई. आश्रमात सेवा करण्याने अनेक गुण अंगीकारले जातात ! : ‘आश्रमात स्वच्छता, काटकसर इत्यादी अनेक गोष्टींचे कटाक्षाने पालन केले जाते. या सर्व गोष्टी सनातनच्या सर्वच आश्रमांमध्ये कृतीत आणल्या जातात’, हे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे साधकांमध्ये गुणवृद्धी होते.

श्री. सोहम् सिंगबाळ

२. चांगला शिष्य सिद्ध होण्याचे महत्त्व

एकदा प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या आश्रमात परात्पर गुरु डॉक्टर स्वच्छतेच्या सेवा करतांना प.पू. बाबा त्यांच्याकडे बोट दाखवून इतरांना म्हणायचे, ‘‘हे बघा, माझा आश्रम सिद्ध होत आहे.’’ (येथे आश्रम म्हणजे ‘शिष्य’, असे प.पू. बाबांना म्हणायचे आहे. चांगला शिष्य सिद्ध झाला की, एक आश्रम निर्माण होतो. असा शिष्य कुठेही असला, तरी आश्रमजीवनच जगत असतो. – संकलक)

३. ‘प्रत्येक साधकाच्या मनात आश्रमाप्रती भाव निर्माण झाल्यास साधक घरी असतांनाही आश्रमात वागतो, तसाच वागतो’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगणे

आश्रम बांधणे सोपे आहे; पण प्रत्येकाच्या मनात आश्रमाप्रती भाव निर्माण करणे, ही निराळी गोष्ट आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनीही सांगितले आहे, ‘‘आश्रम म्हणजे केवळ आश्रमाच्या भिंती नाहीत, तर प्रत्येक साधक म्हणजे आश्रमाचे प्रतिबिंब आहे. असा साधक घरी असला, तरी तो आश्रमात असल्याप्रमाणे वागतो.’’

४. स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे आणि घडवणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेव आहेत !

असे आहेत, आमचे परात्पर गुरु डॉक्टर ! स्वतःच्या कृतीतून साधकांना शिकवणारे आणि घडवणारे परात्पर गुरु डॉक्टर एकमेवाद्वितीयच आहेत. हे सर्व करूनही ते नेहमी शिष्यभावात असतात. ‘आश्रम गुरूंचा आहे, तसेच आश्रमातील सेवा करण्याचे दायित्व माझे आहे’, असा त्यांचा भाव असतो. आश्रम हे आध्यात्मिक उन्नतीसाठी पूरक स्थान आहे.

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आश्रमा’ची मला प्रत्यक्ष अनुभूती दिली. (या वेळी पू. बाबांच्या (पू. नीलेश सिंगबाळ यांच्या) आवाजात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. – श्री. सोहम् सिंगबाळ)

– पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती. (२१.७.२०२१)

परात्पर गुरु डॉ. आठवले

लहान लहान गोष्टी शिकवून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

अ. दोनापावला, पणजी, गोवा येथील सेवाकेंद्राच्या खोल्या मोठ्या असून सभागृहही मोठे होते. साधक एका बाजूने दुसर्‍या बाजूपर्यंत केर काढायचे. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘केर कसा काढायचा ?’, हे कृतीतून शिकवले.

आ. खोलीचा थोडा भाग झाडून झाल्यावर सुपलीत तो कचरा भरावा. त्यानंतर पुढचे झाडावे. त्यामुळे केर व्यवस्थित काढला जातो, तसेच ‘खोलीच्या आतल्या बाजूने केर काढायला चालू करून दाराच्या दिशेने केर काढत जावे’, हेही त्यांनी साधकांना शिकवले.

इ. ‘मॉप’ने (उभे राहून लादी पुसण्यासाठी वापरायच्या साधनाने) ‘इंग्रजीतील ८ (8) हा अंक आडवा केल्यावर दिसतो त्याप्रमाणे लादी कशी पुसावी ?’, हे त्यांनी स्वतः करून दाखवले आणि साधकांना शिकवले.

– पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती. (२१.७.२०२१)