कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या ! – प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारूकीचे स्वातंत्र्य ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद
मुंबई – विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत, तसेच जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार. या देशात हिंदु आणि मुसलमान यांच्यासाठी दोन वेगवेगळ्या ‘अभिव्यक्ती स्वतंत्रता’ आहेत ! ‘जगात केवळ इस्लाम धर्म आहे’ असे कट्टर धर्मांध मानतात. जगात महंमद पैगंबर किंवा इस्लाम यांविषयी कुणीही बोलले, तर त्यांची हत्या केली जाते किंवा घरे जाळली जातात. हिंदु धर्माचा अवमान करण्यासाठी ‘बॉलीवूड’ला मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जातो आणि या चित्रपटांतून हिंदू अन् हिंदु धर्म यांचे चुकीचे चित्रण दाखवले जाते. या षड्यंत्राच्या विरोधातही आपण जागरूक होऊन त्याला विरोध करणे आवश्यक आहे. हिंदूंनी आता पुढे येऊन या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून न्यायालयीन लढा दिला पाहिजे, असे आवाहन कर्नाटकातील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि उद्योजक श्री. प्रशांत संबरगी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारूकीचे स्वातंत्र्य ?’ या विषयावर १ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
या परिसंवादात सर्वोच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या मणि मित्तल, देहली येथील उच्च न्यायालयाचे अधिवक्ता युधवीर सिंह चौहान आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांनीही त्यांचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. वैभव आफळे यांनी केले. हा ऑनलाईन कार्यक्रम ३ सहस्र ९६८ जणांनी पाहिला.
भारतात बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी कायदे नाहीत ! – अधिवक्ता युधवीर सिंह चौहान, देहली उच्च न्यायालय
हिंदूंच्या धर्माविषयी विनोद केले जातात, हिंदु देवतांचा अवमान केला जातो आणि हिंदू हे सहन करत आहेत. विनोदाच्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान करणार्यांच्या विरोधात ठिकठिकाणी तक्रारी प्रविष्ट होणे आवश्यक आहे. असे झाल्यासच हिंदु धर्माचा अवमान करणार्यांना (वैध मार्गाने) धडा शिकवता येईल. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसाठी या देशात पुष्कळ कायदे आहेत; पण बहुसंख्य हिंदूंच्या सुरक्षेसाठी कायदे नाहीत.
‘स्टँडअप कॉमेडी’च्या माध्यमातून हिंदु देवतांचा होणारा अवमान रोखला गेला पाहिजे ! – अधिवक्त्या मणि मित्तल, सर्वोच्च न्यायालय
मुनव्वर फारूकी अशा साखळीचा हिस्सा आहे, ज्याचा आरंभ मकबूल फिदा हुसेनपासून (मकबूल फिदा हुसेन हे हिंदुद्वेष्टे चित्रकार असून त्यांनी हिंदु देवता आणि भारतमाता यांची अश्लाघ्य चित्रे रेखाटली होती.) झाली होती. मुनव्वर फारूकी ‘कलाकारा’च्या नावावर कलंक आहे. ‘स्टँडअप कॉमेडी’च्या (एकपात्री विनोदी कार्यक्रम) माध्यमातून हिंदु देवतांच्या संदर्भात विनोद करणे, अवमान करणे, हे काम केले जात आहे. हे चुकीचे असून रोखले गेले पाहिजे. हा संवेदनशील विषय आहे.
हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायदा आणावा ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
हिंदु धर्माचा अवमान केल्यावर हिंदूंनी आतापर्यंत घटनात्मक मार्गाने विरोध केला आहे. मुनव्वर फारूकी, कुणाल कामरा यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांतून हिंदु धर्माचा अपमान केला आहे. हिंदु देवतांचा अपमान करणे, ही कोणती कला आहे ? जर इस्लामचा कुणी अपमान केला असता, तर देशात काय वातावरण झाले असते ? हिंदु देवतांची खिल्ली उडवणार्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायद्या’ची आम्ही सरकारकडे मागणी केली आहे.