प्रेमळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेली ६३ टक्के आध्यात्मिक पातळीची फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर (वय ४ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हे या पिढीतील आहेत !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष दशमी (१३.१२.२०२१) या दिवशी फोंडा (गोवा) येथील चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिचा ४ था वाढदिवस झाला. त्या निमित्त तिची आजी (वडिलांची आई) आणि मोठी बहीण कु. मोक्षदा मयूरेश कोनेकर यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘वर्ष २०१८ मध्ये ‘चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असून ती महर्लाेकातून पृथ्वीवर साधनेसाठी आल्याचे घोषित करण्यात आले होते. आता तिची पातळी ६३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
चि. मुक्ता मयूरेश कोनेकर हिला ४ थ्या वाढदिवसाच्या निमित्ताने सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !
१. इतरांना साहाय्य करणे
अ. ‘मुक्ता मला प्रत्येक कामात साहाय्य करते, उदा. धान्य निवडण्यासाठी ताट, वाटी आणि बसायला पाट आणून देते, तसेच मला माझ्या औषधाच्या गोळ्याही आणून देते.
आ. मी रामनाथी आश्रमात जायची सिद्धता करते. तेव्हा ती अत्तर, कापूर, रूमाल, पाण्याची बाटली आणि भ्रमणभाष इत्यादी वस्तू माझ्या पिशवीत भरून देते.
इ. घरातून बाहेर जायला निघतांना ती मला माझ्या चपला आणून देते.
वरील सर्व कृती मुक्ता नियमितपणे आणि कुणीही न सांगता करते.
२. वरील सर्व कृती केल्यावर मुक्ताला ‘कुणी आपले कौतुक करावे’, असे वाटत नाही.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुला साहाय्य करायला शिकवले’, असे आजीला सांगणारी चि. मुक्ता !
एकदा मी मुक्ताला विचारले, ‘‘असे सर्व छान छान साहाय्य करायला तुला कुणी शिकवले ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘अगं आजी, मी लहान होते ना ! तेव्हा आबांकडेच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडेच) होते. थोडी मोठी झाल्यावर मला आबांनी सुंदर फ्रॉक घातला आणि सांगितले की, आता तू आजीकडे जा आणि तिला साहाय्य कर; म्हणून मी तुला साहाय्य करत आहे.’’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक १०.१२.२०२१)
लेखिका : कु. मोक्षदा मयूरेश कोनेकर (चि. मुक्ता हिची मोठी बहीण, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) ढवळी, फोंडा, गोवा.
१. प्रेमभाव
‘मुक्ता सर्वांवरच पुष्कळ प्रेम करते. मुक्ताला कुणी खाऊ दिल्यास ती अर्धा खाऊ माझ्यासाठी ठेवते. ‘तिने मला खाऊ ठेवला नाही’, असे कधीच झाले नाही. बाबांचे (श्री. मयूरेश कोनेकर यांचे) पाय दुखत असल्यास ती त्यांचे पाय चेपून देते.
२. इतरांना साहाय्य करणे
ती बाबांना कपडे वाळत घालण्यासाठी आणि मला खेळणी आवरून ठेवण्यासाठी साहाय्य करते.
३. चुकांविषयी संवेदनशीलता
अ. एकदा मुक्ता आईला (सौ. राघवी मयूरेश कोनेकर यांना) उलट बोलली. तेव्हा मी तिची चूक तिच्या लक्षात आणून दिली. नंतर तिने आईची क्षमा मागितली.
आ. एकदा मी सर्व खेळणी पिशवीत भरून ठेवली होती. इतक्यात मुक्ता आली आणि तिने सर्व खेळणी पिशवीतून काढून परत पसरवून ठेवली; पण थोड्या वेळाने येऊन ती मला म्हणाली, ‘‘ताई, तू मला सांगितले होते की, चूक झाल्यावर क्षमा मागायची; पण मी या वेळी क्षमा मागितली नाही. या दोन्ही (खेळण्यांचा पसारा करणे आणि क्षमा न मागणे) माझ्या चुका आहेत. मला क्षमा कर.’’ त्यानंतर मुक्ताने स्वतःचे कान धरून माझी क्षमा मागितली.
४. देवाची आवड
ती भगवान दत्तात्रेयाचा नामजप म्हणून दाखवते. तिला मारुतिस्तोत्र पाठ आहे. ती रात्री मारुतिस्तोत्र ऐकल्याविना झोपत नाही.
५. मामाला बरे वाटत नसतांना चि. मुक्ताने त्याला गणपतीचा नामजप करण्यास सांगणे आणि नामजप केल्यावर मामाला बरे वाटणे
मुक्ता ३ वर्षांची असतांना एकदा माझ्या मामाला (श्री. सिद्धेश करंदीकर यांना) बरे वाटत नव्हते. तेव्हा मामाने मुक्ताला विचारले, ‘‘मुक्ता, मला बरं वाटत नाही. मला नामजप शोधून देशील का ?’’ तेव्हा मुक्ताने थोडा वेळ डोळे मिटले आणि नंतर सांगितले, ‘‘मामा, तू गणपतिबाप्पाचा नामजप कर.’’ मामाने केवळ ५ मिनिटे ‘ॐ गँ गणपतये नमः ।’ हा नामजप केला. त्यानंतर पुढच्या २ मिनिटांत त्याला बरे वाटले.
६. भाव
अ. एकदा मुक्ता कपड्यांच्या घड्या घालत होती. मी तिला म्हटले, ‘‘मुक्ता, कपड्यांच्या घड्या किती सुंदर घातल्यास !’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘आबांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) करवून घेतले.’’
आ. एकदा आजीने मुक्ताला गंमतीत विचारले, ‘‘त्या भिंतीत कोण आहे ?’’ तेव्हा मुक्ता म्हणाली, ‘‘या भिंतीत श्रीकृष्ण आहे.’’
इ. एकदा मी मुक्ताला माझ्या मामीने (सौ. सायली सिद्धेश करंदीकर यांनी) म्हटलेली आरती ऐकवली. त्या वेळी तिच्या डोळ्यांत पाणी आले. आधी आम्हाला कुणालाच काही समजले नाही; पण नंतर देवाने आईच्या मनात विचार दिला, ‘मुक्ताची भावजागृती झाली असावी.’ या प्रसंगावरून माझ्या लक्षात आले, ‘तिची एवढ्या लहान वयात भावजागृती होते; म्हणजे मलाही तिच्याप्रमाणे प्रयत्न करायला हवेत.’
७. चि. मुक्ताचे स्वभावदोष
हट्टीपणा, आरडाओरडा करणे आणि इतरांचे न ऐकणे.
‘हे श्रीकृष्णा, ‘तूच मला ही आध्यात्मिक बहीण दिलीस’, याबद्दल मी कोटीशः कृतज्ञ आहे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २९.११.२०२१)
कु. मोक्षदा मयूरेश कोनेकर (चि. मुक्ता हिची मोठी बहीण, वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) ढवळी, फोंडा, गोवा.
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |