गोवा राज्यात प्रथमच ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती’ यांच्या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रारंभ !
‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय’ अन् ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांचा संयुक्त उपक्रम !
रामनाथी (गोवा) – काणकोण येथील ‘ज्ञान प्रबोधिनी मंडळा’चे ‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय’ आणि ढवळी, फोंडा येथील ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ यांच्या एक संयुक्त उपक्रमास प्रारंभ झाला. या उपक्रमांर्तगत विद्यार्थ्यांसाठी भारतीय संस्कृती, अध्यात्म, नीतीमूल्ये आणि राष्ट्र उभारणी, या विषयांवर ‘ऑनलाईन’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात प्रत्येकी एक घंट्याचे एकूण ३० वर्ग घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थ्यांकडून २ प्रकल्पही करवून घेण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमास नुकताच प्रारंभ झाला असून ‘गूगल मीट’च्या (संकेस्थळाच्या) माध्यमातून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत तो शिकवला जाणार आहे. जून २०२२ मध्ये या अभ्यासक्रमाची सांगता होणार असून या अभ्यासक्रमाच्या अंती विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
१. ‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालया’चे प्रा. केवल नाईक हे या अभ्यासक्रमाचे समन्वयक आहेत. भारतीय मूल्ये आणि संस्कृती शिकवणारा हा अभिनव असा अभ्यासक्रम गोवा राज्यात प्रथमच होत असून विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या अभ्यासक्रमाचा लाभ होईल’, असा विश्वास महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय आणि श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालय यांनी व्यक्त केला आहे.
२. अभ्यासक्रम राबवण्यासाठी दोन्ही संस्थांमध्ये ‘सामंजस्य करार’ करण्यात आला. या करारावर ‘श्री मल्लिकार्जुन आणि श्री. चेतन मंजू देसाई महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. मनोज एस्. कामत, श्री. रामदास सावंत, श्री. विविध पावसकर आणि प्रा. केवल नाईक, तर ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे प्रकल्प अधिकारी श्री. चेतन राजहंस, प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, श्री. सत्यविजय नाईक आणि श्री. संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत स्वाक्षर्या करण्यात आल्या.
३. एकूणच या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमधील मूल्यशिक्षणाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमात विविध विषयांवरील परिषदा आणि परिसंवाद आयोजित करण्याचा, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात देवाणघेवाणीचा, तसेच वाचन आणि संदर्भ सामग्री विकसित करण्याचा मानस आहे.
काय असेल अभ्यासक्रमात ?या अभ्यासक्रमाच्या माध्यमांतून सनातन मूल्यांची शिकवण आणि पद्धतींचा परिचय होईल. यासह या अभ्यासक्रमात ‘साधना आणि अध्यात्म, संस्कृतीनुसार आचरण’, ‘भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये’, ‘स्वभावदोष निर्मूलन आणि व्यक्तीमत्व विकास’ आदी अनेक विषयांचा समावेश आहे. |