महाबळेश्वर येथे गोरक्षकांमुळे १६ म्हशींचे प्राण वाचले !

  • रात्री अपरात्री गोरक्षणासाठी तळमळीने प्रयत्न करणाऱ्या गोरक्षकांकडून प्रेरणा घ्या ! – संपादक

  • ‘अनेकदा गोरक्षकांमुळे गोवंशांचे प्राण वाचले, असे का होते’, याचा पोलिसांनी गांभीर्याने विचार करावा’, असे गोरक्षकांना वाटते.- संपादक 
गोवंश भरलेला ट्रक अडवणारे गोरक्षक

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – म्हशी ट्रकमध्ये भरून अवैधपणे महाबळेश्वरला पशूवधगृहाकडे नेल्या जात असल्याची माहिती वाई येथील गोरक्षकांना मिळाली. गोरक्षकांनी कडाक्याच्या थंडीतही महाबळेश्वर येथे धाव घेत ट्रक पकडला. या वेळी १६ म्हशी अत्यंत दाटीवाटीने ट्रकमध्ये भरून नेण्यात येत असल्याचे गोरक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क करून त्यांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी वाहनचालकाकडे कागदपत्रे मागितली; मात्र त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. तेव्हा पोलिसांनी गोरक्षकांची लेखी तक्रार घेऊन कायदेशीर कारवाई करत म्हशींना गोशाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे १६ म्हशींचे प्राण वाचले.

पोलिसांनी ट्रक आणि चालक यांना कह्यात घेतले आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ६ नुसार म्हशींच्या वधास बंदी आहे. कह्यात घेतलेल्या पशूधनास वेळे (सातारा) येथील करुणा मंदिर गोशाळेमध्ये ठेवले आहे. कडाक्याच्या थंडीतही गोरक्षक सर्वश्री मनोज ससाणे, चेतन भणगे, सूरज जाधव, अक्षय राजपुरे, सागर जाधव, ऋषिकेश कुरुंदे, ओंकार पवार, शिरिष कोंडके, आशुतोष मोहिते, समाधान राजपुरे, जय आखाडे यांनी रात्रभर जागून म्हशींचे प्राण वाचवले. गोरक्षकांच्या या कृतीचे समाजातून आणि प्राणीप्रेमींकडून कौतुक होत आहे.

म्हशींची अवैध वाहतूक होत असल्याचे कळताच गोरक्षकांनी मध्यरात्री गोरक्षक मिलिंद एकबोटे यांना संपर्क केला. त्यांनी तातडीने महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क करून गोरक्षकांना साहाय्य मिळवून दिले. महाबळेश्वर पोलिसांनीही मध्यरात्री गोरक्षकांना साहाय्य करून म्हशींना जीवनदान दिले.