चांगला पायंडा !

संपादकीय

उत्तरप्रदेश येथे काशी विश्वनाथ ‘कॉरिडॉर’चे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. त्याविषयी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत आयोजकांनी ‘काशी विश्वनाथ मंदिर हे मोगलांनी उद्ध्वस्त केले होते. नंतर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर आणि परिसर यांचे पुनर्निमाण केले होते’, असा उल्लेख केला आहे. हे पहिल्यांदाच घडले आहे की, जेव्हा एखाद्या मंदिराशी संबंधित कार्यक्रमात मंदिराचा पूर्वेतिहासाचा आणि तोही आक्रमकांनी मंदिर पाडण्याविषयीचा उल्लेख केला आहे. भारतातील आणि विशेषत: उत्तर भारतातील अनेक मंदिरे १ सहस्र वर्षे मुसलमान आक्रमकांची सोपी लक्ष्ये राहिली आहेत. प्राचीन हिंदु मंदिरे संपन्न, वैभवशाली आणि हिंदु संस्कृती प्रदान करणारी केंद्रे होती. मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत. भारतात हिंदु धर्म नष्ट करण्यासाठी इस्लामी मोगल आक्रमकांनी प्रथम मंदिरांवर आक्रमणे करून ती तोडली, त्यांची संपत्ती लुटली, मंदिरांचे अवशेष भूमीत पुरून त्यावर मशिदी उभारल्या. भारतात अशी सहस्रो मंदिरे पाडण्यात आली आहेत.

हिंदुत्वनिष्ठ लेखक पू. सीताराम गोयल यांच्या ‘हिंदु टेम्पल्स व्हॉट हॅपन्ड् टू देम’ (हिंदु मंदिरांचे काय झाले ?) नावाच्या पुस्तकात पाडण्यात आलेल्या मंदिरांपैकी शेकडो मंदिरांची माहिती आणि सध्या त्यावर उभारण्यात आलेल्या मशिदी यांची माहिती दिली आहे.
जे राष्ट्र स्वत:चा इतिहास विसरते, ते भविष्य घडवू शकत नाही. हिंदूंना ‘त्यांच्या मंदिरांची, हिंदु संस्कृतीची मोगलांनी कशी हानी केली ?’, याविषयी पाठ्यपुस्तकात शिकवले जात नाही. त्यामुळे हिंदूंचा स्वाभिमान, धर्माभिमान जागा होत नाही. परिणामी सद्य:स्थितीतही अतिक्रमणाच्या नावाखाली केवळ हिंदूंचीच मंदिरे पाडली जातात. हिंदूंना मंदिरांचे महत्त्वही ज्ञात नाही. अशा वेळी काशी विश्वनाथ मंदिरासारख्या प्रसिद्ध देवस्थानाने मंदिरावरील आक्रमणाविषयी माहिती देऊन चांगला पायंडा पाडला आहे. जीर्णाेद्धार करण्यात आलेल्या अन्य मोठ्या मंदिरांनी त्यांच्या मंदिरात अथवा मंदिर परिसरात मंदिराची माहिती देण्यासमवेत मंदिरावर झालेल्या सुलतानी आक्रमणांची माहिती दिल्यास हिंदूंचा धर्माभिमान जागृत राहील. परिणामी त्यामुळे मंदिरांकडे पुन्हा वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य पुन्हा कुणातही होणार नाही.