मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामासलवकरचपुन्हा प्रारंभ ! – शिवराज नाईकवाडे, सचिव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती
कोल्हापूर, १२ डिसेंबर (वार्ता.) – श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले करण्याच्या कामास लवकरच पुन्हा प्रारंभ करण्यात येणार आहे. खोदकामाचे पूर्वीचे दर आणि आताचे दर यांत फरक असून आता नवीन दर ठरवून ते काम करावे लागेल. याच समवेत शेवटच्या टप्प्यातील जे काम शिल्लक आहे, ते अत्यंत काळजीपूर्वक करावे लागणार आहे; कारण त्यात शेजारील इमारतीच्या बांधकामाचा काही भाग कुंडाच्या अगदी जवळ आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली.
१. साधारणत: अजून ३ मास तरी हे काम चालेल असा अंदाज आहे. कुंडाचे प्राचीन वैभव आणण्यासाठी आम्ही पूर्णत: प्रयत्नशील आहोत.
२. श्री महालक्ष्मी मंदिरात काही खांबांवर, तसेच दगडी फरशीवरही संगमरवरी फरशी बसवण्यात आली आहे. खांबांवरील या फरशीच्या मागे शिल्प आहेत. त्यामुळे ही फरशी हटवण्याचे काम आता चालू करण्यात आले आहे. दगडी फरशीवरील संगमरवरी फरशीही काढण्याचे काम चालू असून यामुळे मंदिराचे मूळ शिल्पसौंदर्य कायम राहील. पूर्वीच्या काळी बांधकाम करतांना काही ठिकाणी चुना अडकला आहे, हा चुना विशेष प्रक्रिया राबवून काढण्यात येत आहे. मंदिरातील अनावश्यक रंगरंगोटी, बांधकामांचे थर काढण्यात येत असून यानंतर मंदिराचे मूळ सौंदर्य पहाता येईल अशी अपेक्षा आहे !
३. श्री जोतिबा देवस्थान येथील ३ शिखरांच्या खाली पावसाळा संपल्यानंतरही पाणी गळत रहाते. यामुळे या ३ शिखरांचे ‘वॉटर हार्वेस्टिंग’ करण्याचा प्रस्ताव नगर विकास विभागाकडे देण्यात आला आहे.
४. देवस्थान समितीच्या भूमी कुणाकुणाकडे आहेत ? याची माहिती घेण्याचे काम चालू असून हे काम प्रचंड मोठे आहे. हे काम पूर्ण झाल्यावर देवस्थानची अतिक्रमण झालेली प्रत्येक भूमी आम्ही कह्यात घेऊ.