पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ‘काशी विश्वनाथ धाम’चे लोकार्पण !
|
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील ‘काशी विश्वनाथ धाम’चे लोकार्पण उद्या, १३ डिसेंबर या दिवशी दीपप्रज्वलन करून होणार आहे. या पार्श्वभूमीवर काशीमध्ये १२ डिसेंबर ते १४ डिसेंबरपर्यंत घरोघरी दीप लावले जात आहेत. लोकार्पणासाठी देशभरातील ३०० हून अधिक शंकराचार्य, संत आणि महंत येणार आहेत. लोकार्पणाच्या निमित्ताने ‘काशी विश्वनाथ धाम’ सजवण्यात आले आहे. यासाठी शेजारच्या अनेक राज्यांतून फुले मागवण्यात आली आहेत. त्यात गुलाब, झेंडूसह इतर अनेक फुलांचा समावेश आहे. यासह ७ लाख घरांत लाडवाचा प्रसाद वाटला जाणार आहे. १४ डिसेंबरला भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे संमेलनदेखील प्रस्तावित आहे. १७ डिसेंबरला देशभरातील महापौरांचे काशीमध्ये आगमन होईल.
#LIVE | कल PM मोदी करेंगे काशी विश्वनाथ कॉरिडोर का उद्घाटन; वाराणसी में हो रही भव्य सजावट, देखिए रिपब्लिक भारत – https://t.co/ilGNRa5ijD pic.twitter.com/kWRGOk1PLm
— रिपब्लिक.भारत (@Republic_Bharat) December 12, 2021
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या धामचे भूमीपूजन ८ मार्च २०१९ या दिवशी झाले होते. या योजनेसाठी ३३९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. नंतर ही योजना वाढवून ८०० कोटी रुपयांवर पोचली. ही योजना ३ टप्प्यांत पूर्ण करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण उद्या होणार आहे.
देशात ५१ सहस्र ठिकाणी थेट प्रक्षेपण !
या कार्यक्रमाचे देशभरातील १५ सहस्र ४४४ मंडळांत ५१ सहस्र ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक ठिकाणी ५०० ते ७०० लोक कार्यक्रमाशी जोडले जातील. इतर ११ ज्योतिर्लिंगांच्या तीर्थस्थळीही लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
असे होणार लोकार्पण !
पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ डिसेंबरला काशीतील बाबा श्री कालभैरवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील. तेथून ते राजघाटला जातील. तेथून ते नौकेद्वारे ललिता घाटावर जातील. गंगानदीचे दर्शन घेऊन पवित्र जल घेऊन काशी विश्वनाथ धामच्या मार्गाने पायी श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात जातील. अभिषेक झाल्यानंतर ते पूजेत सहभागी होतील. नंतर लोकार्पण सोहळा होईल.
ज्ञानवापी कूप आणि नंदी यांचा ‘काशी विश्वनाथ धाम’मध्ये समावेश !
वर्ष १६६९ मध्ये औरंगजेबाच्या आदेशाने श्री काशी विश्वेश्वनाथाचे मंदिर पाडून तेथे ज्ञानवापी मशीद बांधण्यात आली होती. त्या वेळी येथील नंदीची मूर्ती फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्या वेळी मंदिरांच्या महंतांनी तेथे असलेले शिवलिंग ज्ञानवापी कुपामध्ये लपवला होता. काही वर्षांनी अहिल्याबाई होळकर यांनी या मशिदीच्या शेजारी नवीन मंदिर बांधले. त्या वेळी मंदिराच्या परिसरात या नंदीचा आणि ज्ञानवापी कूपचा समावेश नव्हता; मात्र आताच्या ‘काशी विश्वनाध धाम’मध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
काशी विश्वनाथ धामसाठी २७ मंदिरांची विशेष ‘मणीमाला’ !
काशी विश्वनाथ धाममध्ये २७ मंदिरांची एक विशेष ‘मणीमाला’ सिद्ध करण्यात आली आहे. ही मंदिरे पूर्वी श्री काशी विश्वनाथ मंदिरासमेवत बांधण्यात आली होती, तर काही मंदिरे ही नंतर बांधण्यात आली आहेत. या धामच्या दुसर्या टप्याच्या कामात ९७ मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे, तर तिसर्या टप्प्यात १४५ शिवलिंग स्थापित करण्यात येणार आहेत.
५ सहस्र फूटांवरून ५ लाख सहस्र फूटांच्या परिसरात विस्तार !
पूर्वीच्या काशी विश्वाथ मंदिराचा परिसर ५ सहस्र फुटांचा होता. आता जीर्णोद्धारात शेजारची भूमी अधिग्रहित करून तो ५ लाख २७ सहस्र ३०० फुटांचा करण्यात आला आहे. यासाठी संबंधितांना ३९० कोटी रुपये भरपाई म्हणून देण्यात आली आहे. या धामसाठी आता ४ प्रवेशद्वार असणार आहेत. प्रत्येक प्रवेशद्वार २० फूट उंच असणार आहे. मंदिरापासून गंगाघाटावर जाण्यासाठी २०० मीटरचा ४० फूट रूंद मार्ग सिद्ध करण्यात आला आहे. या मंदिरासह काशीच्या पंचक्रोशीतील १०८ मंदिरे, ४४ धर्मशाळा आणि कुंड यांचाही जीर्णोद्धार करण्यात येत आहे.