ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !
वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संकल्पानुसार काही वर्षांतच ईश्वरी राज्याची स्थापना होणार आहे. अनेकांच्या मनात ‘हे राष्ट्र चालवणार कोण ?’, असा प्रश्न येतो. त्यासाठी ईश्वराने उच्च लोकांतून दैवी बालकांना पृथ्वीवर जन्म देऊन पाठवले आहे. त्यांचे प्रगल्भ विचार आणि अलौकिक वैशिष्ट्ये या सदरांतर्गत प्रसिद्ध करत आहोत.
दैवी बालकांच्या वागण्याविषयी ठेवायचा दृष्टीकोन !‘काही दैवी बालकांच्या अयोग्य वागण्यामुळे काही जणांना वाटते की, ‘यांच्यामध्येही स्वभावदोष आहेत, तर ही ‘दैवी बालके’ कशी ?’ यामध्ये लक्षात घेतले पाहिजे की, दैवी बालकांमध्येही त्यांच्या प्रकृतीनुसार काही स्वभावदोष असतात; पण त्यांचे प्रमाण आणि तीव्रता अल्प असते. त्यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांसाठी थोडे प्रयत्न केले, तर ते लवकर उणावतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१७.११.२०२१) |
समंजस, धीट आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारा यवतमाळ येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. श्रीनिवास देशपांडे (वय १० वर्षे) !
यवतमाळ येथील (सध्या रामनाथी आश्रमात असलेला) कु. श्रीनिवास देशपांडे याची त्याच्या आईला लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. समंजस
१ अ. श्रीनिवासच्या वडिलांना रुग्णालयात भरती केल्यावर ‘तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल न आणता नंतर आणूया’, असे त्याला सांगितल्यावर त्याने ते सहजतेने स्वीकारणे : ‘३.५.२०२१ या दिवशी कु. श्रीनिवासचा वाढदिवस होता. ‘त्या दिवशी त्याच्यासाठी नवीन सायकल आणायची’, असे आधीच ठरले होते; परंतु ३०.४.२०२१ या दिवशी, म्हणजे त्याच्या वाढदिवसाच्या ३ दिवस आधीच त्याच्या वडिलांना कोरोना आजारावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा श्रीनिवासला ‘आपण सायकल आणण्याचे नियोजन नंतर करूया’, असे समजावून सांगितल्यावर कुठलीही कुरबूर न करता त्याने मान्यता दिली. तेव्हा मला त्याच्यातील ‘समंजसपणा आणि साधकत्व’ या गुणांचा प्रत्यय आला.
१ आ. वडिलांच्या निधनानंतर श्रीनिवासच्या डोळ्यांतील अश्रू पाहिल्यावर आईलाही भावना आवरणे कठीण होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने आईला सावरणे : त्याच्या वडिलांच्या निधनानंतर त्याला मधूनच पुष्कळ रडू यायचे. नंतर वडिलांची आठवण आल्यास तो स्वतःवर नियंत्रण ठेवायला शिकला. ‘त्याच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मला भावना आवरणे कठीण होत असे’, हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो मलाही सावरू लागला.
१ इ. श्रीनिवासचे वडील कुटुंबातील प्रत्येकाच्या अडचणीला धावून जाणारे असल्याने त्यासंदर्भात घरात बोलणे चालू असतांना श्रीनिवासने ‘मी छोटा रवींद्र होऊन सर्वांना साहाय्य करीन’, असे सांगणे : श्रीनिवासच्या वडिलांच्या (माझे यजमान रवींद्र यांच्या) निधनामुळे आमच्या कुटुंबाचा कणाच मोडला.
त्याचे वडील कुटुंबातील प्रत्येकाच्या अडचणीला धावून जात असत. कुणाचे काही काम अडलेले असल्यास ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असत. घरात कुटुंबियांचे याविषयी बोलणे चालू असतांना श्रीनिवास तेथेच होता. तो म्हणाला, ‘‘मी छोटा रवींद्र होऊन सर्वांना साहाय्य करणार आहे. मी बाबांसारखाच होईन.’’ प्रत्यक्षातही श्रीनिवासचा स्वभाव त्याच्या वडिलांसारखा मनमिळाऊ आहे. त्याची इतरांशी लगेच ओळख आणि जवळीकही होते.
२. धीटपणा
२ अ. श्रीनिवासच्या आत्याचे निधन झाल्यावर त्याने स्मशानभूमीवर जाऊन अग्नीसंस्कार विधी न घाबरता पहाणे : फेब्रुवारी २०२१ मध्ये श्रीनिवासच्या आत्याचे निधन झाले. तेव्हा श्रीनिवास त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊन स्मशानभूमीपर्यंत जाऊन आला. अशा वेळी लहान मुलांना सहसा पाठवत नाहीत; म्हणून मी त्याला ‘जाऊ नको’, असे सांगितले होते; परंतु तो हट्टाने तेथे गेला. त्याने संपूर्ण अग्नीसंस्कार विधी न घाबरता पाहिला. घरी आल्यानंतर त्याने मला सांगितले, ‘‘मी जराही घाबरलो नाही.’’ नंतरही १३ दिवस सर्व विधींसाठी तो वडिलांच्या समवेत जात होता आणि आतेभावांना साहाय्य करत होता.
२ आ. वडिलांचे निधन झाल्यावर श्रीनिवासने उत्तरक्रिया न घाबरता व्यवस्थित करणे आणि पुरोहितांनी सांगितलेले सर्व नियम पाळणे : २०.५.२०२१ या दिवशी श्रीनिवासचे वडील श्री. रवींद्र यांचे निधन झाले. रवींद्र यांच्या मृत्यूनंतर सर्व क्रियाकर्म पुत्र या नात्याने श्रीनिवासलाच करणे आवश्यक होते. श्रीनिवासने काकांच्या साहाय्याने त्याच्या बाबांचे अंत्यविधी केले. अंत्यविधी क्रियाकर्मासाठी येणार्या पुरोहितांनीही श्रीनिवासचे कौतुक केले. क्रियाकर्म करणार्या पुरोहितांनी सांगितलेले सर्व नियम, उदा. भात वर्ज्य करायचा, गादीवर झोपायचे नाही इत्यादी गोष्टी त्याने १३ दिवस व्यवस्थित पाळल्या.
३. ‘श्री गुरुच आपल्या सर्वांचे पालनकर्ते असून आता तेच माझे बाबा आहेत’, असा भाव असणारा कु. श्रीनिवास !
‘आता आपल्याला बाबा नाहीत’, या विचाराने श्रीनिवास पुष्कळ दुःखी झाला. तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रापुढे उभा राहून त्यांना आळवू लागला. त्याने श्री गुरूंना मनातील व्यथा सांगितली. ‘श्री गुरुच आपल्या सर्वांचे पालनकर्ते असून आता तेच माझे बाबा आहेत’, या विचाराने त्याचे अस्वस्थ मन शांत झाले. नंतर तो माझ्याशी याविषयी बोलला. मी कधी व्यथित झाले, तर तो मलाही हेच समजावून सांगत असे.’
– श्रीमती धनश्री देशपांडे (कु. श्रीनिवासची आई), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.९.२०२१)
गुरुआज्ञा शिरसावंद्य मानून मनापासून आणि तळमळीने सेवा करणारी दिव्य दैवी बालके !
१. दैवी बालके त्यांना मिळालेली कुठलीही सेवा तळमळीने आणि भावाने करत असणे
‘कोणत्याही प्रकारची सेवा करण्याची तळमळ असणे’, हा साधकाचा गुण आहे. दैवी बालकांमध्ये ‘सेवेची तळमळ’ हा सहजभाव आहे. मी आश्रमात काही दैवी बालकांना प्रत्यक्ष सेवा करतांना पाहिले आहे. त्यांना सेवा करतांना बघणेही आनंददायी असते. ती इतक्या प्रेमाने, तळमळीने आणि भावावस्थेत राहून सेवा करतात की, त्यांना पाहून प्रेम उचंबळून येते.
२. लहान वयाच्या दैवी बालकांना ‘सेवा का करायची ?’ हेही ठाऊक असणे, यातून त्यांचे दिव्यत्व अनुभवता येणे
दैवी बालके सत्संगात त्यांनी सेवा करतांना ठेवलेले दृष्टीकोन, त्यांच्याकडून झालेल्या चुका, त्यातून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांना आलेल्या अनुभूती सांगतात. या सर्व गोष्टी त्यांचे दिव्यत्व दर्शवतात. त्यांना ‘ते ती सेवा का करत आहेत ?’, हेही पूर्णपणे ठाऊक आहे. त्यांना पाहून जणू ते सगळ्यांना ‘साधकांमध्ये सेवाभाव कसा असावा ? हे शिकवण्यासाठीच या पृथ्वीवर आले आहेत’, असे वाटते.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा करायला सांगिल्यावर ते शिरसावंद्य मानून तसे करण्याचा त्वरित प्रयत्न करणारे दैवी बालके !
प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) अपेक्षित अशी सेवा करण्यास आणि प्रत्येकाची अनुभूती लिहून ठेवण्यास सांगितले जाते. तेव्हा ती बालके एकदाही ‘आम्हाला जमणार नाही किंवा आम्हाला ती सेवा करण्यात काही अडचण आहे’, असे सांगत नाहीत. ‘श्री गुरूंनी आदेश द्यावा आणि शिष्याने आज्ञाधारकपणे त्याचे पालन करावे’, हीच तर गुरु-शिष्य परंपरा आहे अन् दैवी बालकांमध्ये मी हा गुण अनुभवला आहे.
आपण सर्वांनी त्यांच्याकडून अधिकाधिक शिकावे, अशी गुरुचरणी प्रार्थना आहे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ.