अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांची मुंबई उच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना !
अमली पदार्थविरोधी पथकाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केल्याचे प्रकरण
मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीका न करण्याचे आश्वासन देऊनही पुन्हा त्यांच्यावर टीका केल्याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांनी १० डिसेंबर या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात विनाअट क्षमायाचना केली. यापुढे पुन्हा वानखेडे यांच्यावर टीका करणार नसल्याचे आश्वासन नवाब मलिक यांनी न्यायालयात दिले.
प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर नवाब मलिक काही दिवसांपासून प्रसिद्धीमाध्यमांसमोर येऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत होते. यामध्ये ‘समीर वानखेडे हे मुसलमानधर्मीय आहेत. नोकरी मिळण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रे सादर केली, आर्यन खान याला खंडणीसाठी अटक करण्यात आली’, असे गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केले होते. या विरोधात समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात अवमान याचिका केली आहे. याविषयी न्यायालयाने एकदा तंबी देऊनही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर टीका चालूच ठेवली होती. ज्ञानदेव वानखेडे यांनी हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला, तेव्हा मलिक यांना पुन्हा क्षमायाचना करावी लागली.