विज्ञापन फलकांचा दंड न भरल्यास दंडाच्या रकमेची वसुली मिळकत करातून होणार ! – विजय लांडगे, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग
पुणे – शहरात अनधिकृत विज्ञापन फलक (होर्डिंग्ज), कापडी फलक, फ्लेक्स, झेंडे, भित्तीपत्रके आणि कमानी उभारल्यानंतर ते काढण्यासाठीचा (निष्कासन कारवाई) महापालिका प्रशासनाचा होणारा व्यय संबंधित व्यक्तीकडून किंवा ज्या जागेत फलक आहेत, त्या संबंधित जागा मालकाकडून तो वसूल केला जाईल. फलक लावणार्या संबंधित व्यक्तीने ती रक्कम न भरल्यास फलक लागलेल्या जागा मालकाच्या मिळकत करातून दंडाच्या रकमेची वसुली केली जाईल, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाचे उपायुक्त विजय लांडगे यांनी घोषित केले आहे.
अनधिकृत विज्ञापन फलकाच्या निष्कासन कारवाईसाठी एका फलकासाठी ५० सहस्र रुपयांचा व्यय निश्चित केला आहे. याशिवाय १ ते १० पर्यंतचे कापडी फलक, झेंडे, भित्तीपत्रके, कमानी लावणार्या संस्था किंवा व्यक्तींकडून प्रत्येकी १ सहस्र रुपये आणि १० पेक्षा जास्त कापडी फलक, झेंडे, भित्तीपत्रके लावणार्यांकडून ५ सहस्र रुपये दंड निष्कासन व्यय म्हणून वसूल करण्यात येणार आहे. गेल्या २ दिवसांमध्ये शहरातील सर्व १५ क्षेत्रिय कार्यालयांकडून ७ अनधिकृत विज्ञापन फलक (होर्डिंग), ४६४ बॅनर, १७६ कापडी फलक इत्यादी हटवण्यात आले आहेत.