‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक
पुणे – जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीने कामकाजाला गती देऊन राज्यात ‘जादूटोणाविरोधी कायद्याची’ प्रभावी कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादूटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबवण्याविषयी बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. या वेळी सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे, वित्तीय सुधारणाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव आदी या वेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की,
१. नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट तसेच अघोरी प्रथा अन् जादूटोणा यांनी प्रतिबंध घालण्याविषयी आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याविषयी २०१३ मध्ये हा अधिनियम संमत करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे.
२. या कायद्याची कार्यवाही करणार्या सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे. जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीचे गठन करण्याबाबत सामाजिक न्याय विभागाने कार्यवाही करावी.
३. गृह विभागाने आलेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करावी. प्रा.श्याम मानव यांनी केलेल्या सूचनांविषयी शासन सकारात्मक असून राज्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व निर्णय घेण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
जादूटोणाविरोधी कायद्याच्या समित्यांचे पुनर्गठन लवकरच करणार ! – सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे
जादूटोणाविरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यवाही समितीचे पुनर्गठन करण्यात येईल. या कायद्याची माहिती, तसेच जनजागृती करणे, तसेच जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांच्याशी चर्चा करून त्यांनी विभागासंदर्भात मांडलेल्या मुद्यांविषयी कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री मुंडे यांनी दिली.