बिपिन रावत यांच्या पार्थिवावर देहलीत अंत्यसंस्कार

  • १७ तोफांची सलामी

  • संरक्षणमंत्री, आजी-माजी सैन्याधिकारी उपस्थित

(सी.डी.एस्. – चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ – तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख)

नवी देहली – सी.डी.एस्. बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर येथील कॅटोंमेंट परिसरातील ब्रार स्क्वेअरमध्ये सैनिकी सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या सन्मानार्थ १७ तोफांची सलामी देण्यात आली. या अंत्यसंस्काराच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, अन्य मंत्री, तसेच सैन्यदलप्रमुख मनोज मुकुंद नरवणे, नौदलप्रमुख हरि कुमार, वायूदलाचे प्रमुख व्ही.आर्. चौधरी, तसेच अन्य ज्येष्ठ आजी-माजी सैन्याधिकारी उपस्थित होते. रावत यांच्या मुली तारिणी आणि कृतिका यांनी पार्थिवाला अग्नी दिला.

तत्पूर्वी रावत दांपत्याची अंत्ययात्रा त्यांच्या शंकर विहार येथील निवासस्थानावरून काढण्यात आली. १२ किलोमीटर अंतराच्या या अंत्ययात्रेच्या वेळी रस्त्यावर मोठ्या संख्येने जनतेने उपस्थित राहून श्रद्धांजली दिली. अनेकांनी या दांपत्याच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी केली. या वेळी नागरिकांकडून ‘भारत माता की जय’ अशा घोषणाही देण्यात येत होत्या. अनेक नागरिक संपूर्ण अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. अनेकांनी राष्ट्रध्वज हाती घेतले होते.

जनरल रावत आणि अन्य सैनिकांविषयी देशभरातील नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे श्रद्धांजली

जनरल बिपिन रावत आणि अन्य १३ जणांच्या झालेल्या निधनाविषयी भारतियांमध्ये दुःखासह सन्मानाची भावना गेल्या २ दिवसांत दिसून आली. अनेक ठिकाणी नागरिकांनी या सर्वांना उत्स्फूर्तपणे श्रद्धांजली वाहिली. तमिळनाडूतील सुलूर सैन्यतळावर या सर्वांचे मृतदेह रुग्णवाहिकांमधून नेले जात असतांना नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून पुष्पवृष्टी केल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात देशभर प्रसारित झाला.