खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने…

लहानपणापासूनच अतिशय सालस, सत्शील, निगर्वी व्यक्तीमत्त्व लाभलेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी, म्हणजे सनातन संस्थेतील एक अप्रतिम हिरा ! आजींचे बालपण अतिशय समृद्ध होते. हा काळ आनंदाने व्यतीत केल्यानंतर विवाहानंतरचा काळ त्यांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड देत व्यतीत करावा लागला. देवावर दृढ श्रद्धा ठेवून त्यांनी ते दिवसही सोसले. साधनेच्या राजमार्गावरून चालतांना त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी, संतपद अणि देहत्यागानंतर सद्गुरुपदही सहजतेने गाठले !

या लेखाद्वारे त्यांची मुलगी कु. राजश्री सखदेव यांनी सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी यांचा जीवनपट उलगडला आहे. १० डिसेंबर २०२१ या दिवशी आपण सद्गुरु (कै.) सौ. सखदेवआजी यांनी मुलांवर केलेले संस्कार आणि ‘क्ष’ नातेवाइकांच्या विक्षिप्त वागण्यामुळे सद्गुरु सखदेवआजी यांना झालेले त्रास यांविषयी पाहिले. आज पुढील भाग पाहूया. (भाग ५)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/534071.html

सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी

७. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना

७ अ. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करायला लागल्यानंतरही आईला ‘क्ष’ नातेवाइकांच्या बोलण्याचा त्रास होणे; पण तिचे अखंड नामस्मरण होणे : काही वर्षे अशीच गेली. त्यानंतर वर्ष १९९७ मध्ये मला माझी मैत्रीण कु. शशिकला आचार्य हिच्याकडून साधना समजली. त्या काळात मिरजेत सेवा करणारे आम्ही ७ – ८ जण असल्याने माझी महाविद्यालयातील नोकरी संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंतचा माझा सर्व वेळ सेवेत जात असे. सकाळीही घरातील कामे करून सेवेच्या संदर्भातील समन्वय इत्यादी करण्यात माझा वेळ जात असे. त्यामुळे माझे ‘क्ष’ नातेवाइकांच्या बोलण्याकडे फारसे लक्ष जात नसे. आई पूर्णवेळ घरी असल्याने तिला त्रास होत असे, तरी तिचे अखंड नामस्मरण चालू असे. काही वर्षांनी मिरज येथे आश्रम चालू झाल्यावर ती दुपारी ३ ते संध्या. ६ या कालावधीत सामूहिक नामजपासाठी मिरज आश्रमात जात असे. त्यात कधीच खंड पडला नाही. सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागल्यानंतर आईने पूर्वीपासून चालू असलेला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप थांबवून कुलदेवतेचा नामजप चालू केला.

७ आ. साधकांना होणारा वाईट शक्तींचा त्रास पाहिल्यावर ‘क्ष’ नातेवाइकांनाही वाईट शक्तींचा त्रास असल्याचे लक्षात येणे : वर्ष १९९७ मध्ये ‘क्ष’ नातेवाइकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभांच्या निमित्ताने खेड्याखेड्यांत जाऊन पुष्कळ प्रचार केला. त्यांनी सभेसाठी आवश्यक असलेले साहाय्यही केले. त्यानंतर त्यांचे आईला रागाने बोलणे न्यून होऊ लागले. वर्ष २००० मध्ये काही साधकांना वाईट शक्तींचा त्रास होऊ लागला. ते पाहिल्यानंतर ‘घरी ‘क्ष’ नातेवाइकांच्या संदर्भात तेच होत आहे’, हे आमच्या लक्षात आले. परात्पर गुरु डॉक्टर एकदा म्हणाले होते, ‘‘तुझे ‘क्ष’ नातेवाईक म्हणजे कमालीचा तमोगुण आणि आई म्हणजे कमालीचा सत्त्वगुण !’’

७ इ. आईला ‘क्ष’ नातेवाइकांचा त्रास २ तप (२४ वर्षे) सहन करावा लागणे आणि त्या कालावधीत तिला ‘सत्विरुद्ध असत्’, असे युद्ध करावे लागणे : वर्ष १९८७ ते वर्ष १९९९ ही १२ वर्षे आईला पुष्कळ सहन करावे लागले. ते तिचे एकप्रकारे तपच झाले. त्यानंतर वर्ष २००० पासून ‘क्ष’ नातेवाइकांच्या बोलण्याचे प्रमाण न्यून झाले. त्या काळात आई तिला जमेल तशी सेवा करू लागली. वर्ष २०१० मध्ये भावाने दुसरीकडे घर घेतले. भाऊ, वहिनी आणि आई तेथे रहायला लागले. त्यानंतर ‘क्ष’ नातेवाइक जेव्हा माझ्या भावाच्या घरी जायचे, तेव्हा त्यांना आईला बोलता येत नसे. एकंदरीत २४ वर्षे, म्हणजे २ तप आईला सोसावे लागले; मात्र याच काळात आईची आध्यात्मिक प्रगती होत होती. ते ‘क्ष’ नातेवाइकांना त्रास देणार्‍या ‘क्ष’ वाईट शक्तीला सहन होत नसल्याने ती बडबड करून एकप्रकारे आईला विरोध करत असावी, म्हणजे साधनेत येण्यापूर्वी आणि साधनेत आल्यानंतर काही वर्षे आईला ‘सत्विरुद्ध असत्’, असे युद्धच करावे लागले.

कु. राजश्री सखदेव

८. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि अन्य दोन संतांनी आईविषयी काढलेले गौरवोद्गार !

अ. एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘आईची साधना खडतर होती.’’

आ. अन्य मार्गांनी साधना करणार्‍या आणि आईला न ओळखणार्‍या दोन संतांनीही ‘आईने सीतेप्रमाणे सोसले आणि या ‘सीता’च आहेत’, असे म्हटले होते.

यावरून ‘संत दिसती वेगळाले, परि ते स्वरूपी मिळाले ।’, हे अनुभवता आले.

९. सनातनच्या साधकांवरील प्रेम !

ती सनातनच्या साधकांना जमेल तितके साहाय्य करत असे. मिरज आश्रमातील साधकांसाठी खाऊ करून पाठवत असे. दिवाळीत केलेले फराळाचे पदार्थ प्रथम आश्रमात देण्यासाठी काढून नंतर ती त्या पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवत असे.

१०. वाईट शक्तींच्या त्रासामुळे आईला प्रत्येक मासात ताप येणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पाठवलेल्या प्रसादामुळे तिचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होणे

वर्ष २००६ पासून आईला प्रत्येक मासात एकदा बराच ताप येत असे. त्या वेळी तिला निपचित झोपावे लागे. त्यानंतर काही दिवस तिला पुष्कळ अशक्तपणा येत असे. ती तिच्यावर होत असलेली वाईट शक्तींची आक्रमणे होती. या काळात परात्पर गुरु डॉक्टर मिरजेला जाणार्‍या प्रत्येक साधकाच्या समवेत आईसाठी प्रसाद पाठवत. त्या प्रसादामुळे तिचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होत असे.

११. आईचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

अ. ती फार ‘देव देव’ करत नव्हती; परंतु साधना चालू केल्यापासून परात्पर गुरु डॉक्टर तिचे दैवत बनले.

आ. परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात असतांना बहुतेक प्रत्येक संकष्टी चतुर्थीला ती त्यांच्यासाठी मोदक करून पाठवत असे. मोदक करतांना ‘परात्पर गुरु डॉक्टरांसाठी मोदक करत आहे. त्यांना देऊन राहिलेले मोदक ‘प्रसाद’ म्हणून ग्रहण करायचे’, असा तिचा भाव असायचा.

इ. ‘सनातनचे साधक आणि आश्रम हे म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असा तिचा भाव होता.

ई. आमच्या देवघरात प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची छायाचित्रे आहेत. आई प्रतिदिन त्यांची भावपूर्णरित्या आरती करत असे. त्यामुळे त्या दोन्ही छायाचित्रांत सकारात्मक पालट झाले होते.

१२. आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर तिने रामनाथी आश्रमात वास्तव्यास येणे आणि त्या वेळी तिच्या मनात ‘क्ष’ नातेवाइकांविषयी थोडाही कलुषितपणा नसणे

वर्ष २०११ मध्ये आईची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आणि त्यानंतर ती रामनाथी आश्रमात वास्तव्यास आली. त्यानंतर तिच्या मनात ‘क्ष’ नातेवाइकांविषयी थोडाही कलुषितपणा नव्हता. तिच्या बोलण्यातून तो कधीच व्यक्त झाला नाही. ‘क्ष’ नातेवाइक आश्रमात आल्यानंतर ती त्यांच्याशी अगदी पूर्वीप्रमाणेच बोलत होती. मधला कालखंड इतिहासजमा झाल्याप्रमाणे ती वागत होती. ‘साधनेने व्यक्तीच्या व्यक्तीमत्त्वात किती आमूलाग्र पालट होतो !’, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

१३. कृतज्ञता !

केवळ परम पूज्यांच्या कृपेमुळे आम्ही सर्व जण साधनेत आलो. त्या पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आमच्या समवेत स्थूल रूपात नव्हते, तरी त्यांनीच विविध रूपांत आम्हाला सांभाळले, धीर दिला आणि आम्हाला जिवंत ठेवले. तेव्हा ‘संकटात देवाला हाका मारायच्या आणि त्याला आळवायचे’, असे आम्हाला ठाऊक नव्हते, तरी ‘आता देव काय ते करील. आपण चांगलेच वागायचे’, असे विचार परात्पर गुरु डॉक्टरांच्याच कृपेने आमच्या मनात येत होते; अन्यथा असे विचार मनात येणेही कठीण आहे.

आई हिराच होती. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी या हिर्‍याला पैलू पाडले’, असे मला वाटते. ‘त्यांनीच हे सर्व प्रसंग घडवून त्यातून हाताला धरून तिला अलगद बाहेर काढले आणि पुढे नेले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे.’

(समाप्त)

– कु. राजश्री सखदेव (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.७.२०२१)

साधिकेला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी आईची (सद्गुरु (कै.) सौ. सखदेवआजी यांची) आठवण न येणे, ‘ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यात पूर्णपणे विलीन झाली आहे’, असे वाटणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेले सूत्र

‘भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीयेला माझा वाढदिवस असतो. वर्ष २०२१ मध्ये माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सकाळी आवरून झाल्यावर मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राला नमस्कार केला. घरातील मोठे म्हणून मी माझ्या मामांना भ्रमणभाष करून त्यांना नमस्कार केला; परंतु दिवसभरात ‘आईला (सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी यांना) नमस्कार करायला हवा’, असे एकदाही माझ्या लक्षात आले नाही.

वाढदिवसानंतर साधारण एक मासाने मला याची जाणीव झाली. त्या वेळीही मला त्याचे वाईट वाटले नाही. आईने देहत्याग केल्यानंतरच्या वर्षी माझ्या वाढदिवसाला मी तिला मानस नमस्कार केला होता. (सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेवआजी यांनी वर्ष २०१६ मध्ये देहत्याग केला.) तेव्हा मला तिच्या जागी परात्पर गुरु डॉक्टर दिसले होते. ‘आता ती परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये विलीन झाली आहे’, असे मला वाटले.

यानंतर एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग मिळाला. त्या वेळी मी त्यांना वरील सूत्र सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘जेव्हा संत देहत्याग करतात, तेव्हा ते सगळी नाती आणि बंधने इत्यादींचा त्याग करतात. असे करत ते ईश्वराशी एकरूप होतात.’’

– कु. राजश्री सखदेव (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१०.२०२१)