देशभरातील महामार्गांवरील अपघातांत गेल्या वर्षी ४७ सहस्र ९८४ लोकांचा मृत्यू ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
|
नवी देहली – भारतात वर्ष २०२० मध्ये द्रुतगती महामार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये ४७ सहस्र ९८४ लोकांचा, तर वर्ष २०१९ मध्ये द्रुतगती मार्गांसह राष्ट्रीय महामार्गांवर रस्ते अपघातांमुळे ५३ सहस्र ८७२ लोकांचा मृत्यू झाला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली.
गडकरी पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गांवरील अपघातांच्या प्रमुख कारणांमध्ये वाहनांची रचना आणि स्थिती, वेग, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, भ्रमणभाषचा वापर इत्यादींचा समावेश आहे. मंत्रालयाने सर्व टप्प्यांवर सुरक्षा लेखापरीक्षणाद्वारे रस्ते सुरक्षा सुधारण्यासाठी रचना, बांधकाम आणि स्वतंत्र रस्ता सुरक्षा तज्ञांचा समावेश करून मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.