प्रियांका गांधी वाड्रा यांच्या गोवा भेटीच्या दिवशी काँग्रेस पक्षात त्यागपत्रांची शृंखला आणि युतीवरून गोंधळाचे वातावरण
पणजी, १० डिसेंबर (वार्ता.) काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियांका गांधी वाड्रा १० डिसेंबर या दिवशी गोवा भेटीवर आल्या आहेत. प्रियांका गांधी वाड्रा अनेक बैठकांना संबोधित करणार असतांना सकाळी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार्यांच्या त्यागपत्रांची शृंखला चालू झाली, तसेच काँग्रेस पक्षात समविचारी राजकीय पक्षाशी युतीविषयी गोंधळाचे वातावरण दिसून आले.
सकाळी पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्ष निष्क्रीय झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. विशेष म्हणजे या सदस्यांनी एक मासापूर्वीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता, तसेच दक्षिण गोव्यात कुडतरी मतदारसंघातील काँग्रेसचे नेते मोरिनो रिबेलो यांनी पक्षाच्याप्रियांका सदस्यत्वाचे त्यागपत्र दिले. गोवा फॉरवर्ड पक्षाची युती करण्यामध्ये काँग्रेस पक्षात मतभेद निर्माण झाल्यानंतर ही त्यागपत्रांची शृंखला दिसून आली. प्रियांका गांधी वाड्रा यांनी गोवा दौर्याच्या वेळी मोरपिर्ला, केपे येथील अनुसूचित जमातीच्या महिलांशी संवाद साधला, तसेच मडगाव येथे ‘मोले सभाल्लुया’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. ‘आमचे मोले’ या चळवळीतील लोकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. येथील एका कार्यक्रमात प्रियांका गांधी यांनी देहली येथील प्रदूषणाचे सूत्र उपस्थित करून देहली येथे सत्तेवर असलेल्या ‘आप’वर टीका केली. यानंतर प्रियांका गांधी यांनी आके, मडगाव येथे महिलांसाठीच्या एका कार्यक्रमात संबोधित केले.
आके, मडगाव येथील कार्यक्रमात मंगळसूत्र चोरट्यांचा सुळसुळाट
प्रियांका गांधी वाड्रा यांच्या आके, मडगाव येथील कार्यक्रमात मंगळसूत्र चोरट्यांचा सुळसुळाट दिसून आला. या कार्यक्रमात किमान ४ महिलांनी त्यांचे मंगळसूत्र चोरीस गेल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अन्वेषण चालू आहे.
‘गोंयचो आवाज’ संघटनेचे नेते कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उपस्थितीत ‘गोंयचो आवाज’ संघटनेचे नेते कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. कॅप्टन विरियातो फर्नांडिस हे दाबोळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.