२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कण्हेरचे पाणी आले शाहूपुरीमध्ये !
सातारा, १० डिसेंबर (वार्ता.) – २० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पाणी उपसा पंपाची कळ दाबून करण्यात आले. त्यामुळे आता कण्हेर धरणातील पाणी शाहूपुरीवासियांना मिळणार आहे.
या वेळी सातारा विकास आघाडीचे नगरसेवक अधिवक्ता दत्ता बनकर, वसंत लेवे, बाळासाहेब ढेकणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सतीश अग्रवाल, पल्लवी चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार भोसले म्हणाले, ‘‘२० वर्षांपूर्वी या योजनेचे माझ्या हस्ते भूमीपूजन झाले होते; मात्र काही अडचणींमुळे काम रखडले. १६ कोटी रुपयांची ही योजना आता ४२.९८ कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास गेली आहे. या योजनेतून ९.५ सहस्र नळजोडण्या देण्यात येणार आहेत. यासाठीचे मागणी अर्ज उपलब्ध आहेत. या योजनेला गती येऊन चलनवलन व्यवस्थित होईपर्यंत याचे उत्तरदायित्व प्राधिकरणाकडे रहाणार आहे. पुढे दोन टप्प्यांत ते सातारा नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येईल.’’