भारताचे पहिले संरक्षणदलप्रमुख जनरल बिपिन रावत यांचे भारताच्या सुरक्षेमधील भरीव योगदान !

‘जनरल बिपिन रावत यांचे निधन म्हणजे भारताच्या सुरक्षेसाठी मोठा धक्काच आहे. जनरल रावत हे भारताचे पहिले संरक्षणदलप्रमुख (चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ) होते. भारतामध्ये ७० वर्षांनी संरक्षण दल प्रमुखाची नियुक्ती करण्यात आली होती. जनरल बिपिन रावत यांचे भारताच्या सुरक्षेमध्ये भरीव योगदान होते. त्यांच्या निधनामुळे पुष्कळ मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. त्यांनी इतकी वर्षे देशाच्या सैन्यामध्ये सेवा दिली. पुढील लेखाच्या माध्यमातून त्यांच्या संपूर्ण कार्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.

१. बिपिन रावत यांचा जीवन परिचय

१ अ. सैन्यदलात प्रवेश : जनरल बिपिन रावत यांना सैन्याची पार्श्वभूमी होती. त्यांचे वडील हेही सैन्यामध्ये ‘लेफ्टनंट जनरल’ होते. त्यांनी ‘गोरखा ११ रायफल’चे नेतृत्व केले होते. जनरल बिपिन रावत यांनीही त्यांच्या वडिलांच्याच रेजिमेंटमध्ये प्रवेश केला होता. वर्ष १९७८ मध्ये त्यांनी भारतीय सैन्याचे ‘कमिशंड ऑफिसर’ (द्वितीय लेफ्टनंट लष्करी अधिकारी) म्हणून प्रवेश केला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सैन्यात आल्यावर प्रत्येक दिवशी ते अतिशय चांगल्या प्रकारे काम करत होते.

१ आ. विविध परीक्षांमध्ये प्राविण्य : ‘कॅडेट’ (प्रशिक्षणार्थी) असतांना त्यांना ‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ हा सर्वांत मोठा पुरस्कार मिळाला होता (‘नॅशनल डिफेन्स अकॅडमी’मध्ये प्रथम येणार्‍या प्रशिक्षणार्थीला हा पुरस्कार दिला जातो), म्हणजे त्यांनी तेथेच लष्करी गुण दाखवायला प्रारंभ केला होता, तसेच त्यांनी विविध परीक्षांमध्ये प्राविण्य मिळवले होते. ‘स्टाफ कॉलेज’ नावाच्या महत्त्वाच्या परीक्षेतही ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर त्यांना अमेरिकेत असलेल्या ‘स्टाफ कॉलेज’मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले गेले होते. हेलिकॉप्टर अपघाताची दुर्दैवी घटना घडली, तेव्हा ते भारतातील वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजमध्ये संबोधित करण्यासाठी जाणार होते. तेथे मेजर आणि लेफ्टनंट कर्नल पदाचे ३५० भारतीय अधिकारी, तसेच ७० देशांतील लष्करी अधिकारीही असतात. त्या सर्वांना ते संबोधित करणार होते.

१ इ. प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचा प्रचंड अनुभव असणे आणि विविध ठिकाणी नेतृत्व करणे : भारताच्या युद्धाभ्यासाविषयी जगातील देशांना पुष्कळ आकर्षण वाटते. भारताला विविध रणभूमींमध्ये लढण्याचा जेवढा अनुभव आहे, तेवढा कोणत्याच देशाला नाही. भारतीय सैन्याला वाळवंट, उंच पर्वतीय क्षेत्र किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत लढण्याचा प्रचंड अनुभव आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी विदेशात हा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यानंतर त्यांनी भारत-चीन सीमेवर बटालियनचे अतिशय उत्कृष्ट नेतृत्व केले, तसेच त्यांनी ब्रिगेडचे नेतृत्वही केले. त्यानंतर त्यांना ‘युनायटेड स्टेट्स’चे मुख्य म्हणून आफ्रिकेत पाठवण्यात आले होते. तेथेही त्यांनी ‘लिडिंग फ्रॉम द फ्रंट’ (आघाडीवर राहून लढण्याची पद्धत) ही पद्धत वापरली होती. त्यानंतर त्यांनी काश्मीर खोर्‍यामध्ये अतिशय कठीण भागात एका सेक्टरचे नेतृत्व केले.

१ ई. सुरक्षेची आव्हाने पेलल्याने विविध शौर्य पुरस्कार मिळणे : काश्मीरमध्ये प्रचंड हिंसाचार होत असतांनाच्या काळातही त्यांना मोठे यश मिळाले होते. त्यांनी उत्तरपूर्व भागामध्ये डिव्हीजनचे नेतृत्व केले. जिथे जिथे सुरक्षेची मोठी आव्हाने होती, मग ते काश्मीरचे खोरे असो किंवा लडाख असो किंवा भारत-चीन सीमा असो, सगळीकडे त्यांनी उत्कृष्टरित्या काम केले. यासाठी त्यांना विविध शौर्य पुरस्कारांनीही पुरस्कृत करण्यात आले. त्यांनी खरोखरच चांगले काम केले; म्हणून त्यांना वर्ष २०१६ मध्ये भारताचे २७ वे सैन्यप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या कालावधीतही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. मानवाधिकार कार्यकर्ते, तसेच आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांना न जुमानता राष्ट्रासाठी चांगले काम करणे

आपल्या देशात अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. विशेषत: ते काश्मीरमध्ये आणि ईशान्य भागामध्ये उंटावरून शेळ्या हाकतात अन् सैन्याला नको ते उपदेश देतात; पण जनरल रावत यांनी कुणाचीही पर्वा केली नाही. आतंकवादी आणि त्यांचे समर्थक यांच्या विरोधात कठोर कारवाई केली. त्यामुळे अनेक वेळा त्यांना तथाकथित विद्वानांची टीका सहन करावी लागली; परंतु रावत यांनी देशासाठी चांगले काम केले होते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

मानवाधिकार कार्यकर्ते, तथाकथित तज्ञ किंवा ‘मला कोण चांगले आणि कोण वाईट म्हणेल’, याची त्यांनी कधीही काळजी केली नाही. एका सैनिकाने सैनिकासारखे काम करून देशाला सुरक्षित ठेवायला पाहिजे, तेच काम जनरल बिपिन रावत यांनी ३ वर्षे अतिशय कठीण परिस्थितीत केले. यासाठी आपण त्यांचे कौतुक केले पाहिजे.

३. भूदल, वायूदल आणि नौदल यांनी एकत्रितपणे लढाई लढणे आवश्यक !

भारताने स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर ठरवले की, देशाला तिन्ही सुरक्षादलांचा समन्वय साधणार्‍या संरक्षणदलप्रमुखाची आवश्यकता आहे. भूदल, वायू दल आणि नौदल तिन्ही दले निरनिराळी कामे करत असतात. त्यांनी एकत्रितपणे लढाई लढली पाहिजे; पण तसे होत नाही. त्यामुळे देशातील संसाधने योग्य वापरली जात नाहीत. यासाठी एकत्रितपणे लढाई लढणे आवश्यक आहे. वर्ष १९७१ ची लढाई हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या वेळी फिल्डमार्शल मानिक शॉ यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्रितरित्या लढले. तेव्हा भारताने केवढा मोठा विजय संपादन केला होता, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.

३ अ. ‘थिएटर कमांड्स’च्या माध्यमातून भारताची सुरक्षाव्यवस्था अधिक सबळ होणार असल्याचे दिसत असतांनाच बिपिन रावत यांचा मृत्यू होणे; पण ‘भविष्यात नवीन सक्षम अधिकारी सैन्याचे नेतृत्व करून रावत यांचे राहिलेले काम पूर्ण करेल’, याची निश्चिती असणे : नेमके त्याचप्रमाणे एकत्रित नेतृत्व करण्याचे काम जनरल रावत यांना दिले होते. त्याला ‘इन्टिग्रेटेड थिएटर कमांड्स’ म्हटले जाते. त्यांच्या माध्यमातून भूदल, वायूदल आणि नौदल एकत्रितरित्या काम करतात. याचाच परिणामस्वरूप देशाचा शस्त्रांवरील व्यय अल्प झाला असता, प्रशासनाने एकत्र काम केले असते, तसेच त्यांना एकत्रित धोरण बनवता आले असते आणि एकत्रितपणे प्रशिक्षणही करता आले असते. अर्थात् हे सर्व चालू होते आणि यात चांगली प्रगती झाल्याचेही दिसत होते. पुढील काही वर्षांत हे ‘थिएटर कमांड्स’ निर्माण होऊन भारताची सुरक्षाव्यवस्था अधिक सबळ होईल, असेही दिसत होते; पण नियतीला हे मान्य नव्हते. अशातच रावत यांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

यातून देशाची प्रचंड मोठी हानी झाली आहे; परंतु देशाची अर्थात् सैन्याची मोठी परंपरा आहे की, ज्या वेळी एक सक्षम अधिकारी जातो, तेव्हा तेथे दुसरा सक्षम अधिकारी नियुक्त केला जातो. भारत सरकार निश्चितपणे नवीन संरक्षणदलप्रमुखाची नियुक्ती करेल, यात शंका नाही. रावत यांच्या ठिकाणी पुन्हा नवीन सक्षम अधिकारी सैन्याचे नेतृत्व करण्यासाठी येईल आणि त्यांचे राहिलेले काम पूर्ण करेल. मी देशाला एवढे सांगू इच्छितो की, देशाच्या सुरक्षेमध्ये काहीही अल्प पडणार नाही. याविषयी कुणाच्या मनात शंका यायला नको.

४. हेलिकॉप्टरच्या अपघातामागील कारणे आणि तो होऊ नये, यासाठी घ्यावयाची काळजी

बिपिन रावत हे अन्य १३ जणांच्या समवेत ‘आय.ए.एफ्. एम्आय-१७ व्ही ५’ या हेलिकॉप्टरमधून कोईम्बतूरवरून वेलिंग्टन येथील स्टाफ कॉलेजला जात होते आणि कुन्नूर येथे उतरणार होते; पण त्यापूर्वीच त्यांचा अपघात होऊन त्यात १३ जणांचा मृत्यू झाला.

५. विमान किंवा हेलिकॉप्टर यांच्या अपघातांचे ४ प्रकार !

५ अ. मेकॅनिकल फेल्युअर (यांत्रिक बिघाड) : हेलिकॉप्टरचे इंजिन बंद पडल्याने अपघात घडू शकतो. या हेलिकॉप्टरचा ‘ब्लॅक बॉक्स’ मिळाल्यावर अपघाताचे नेमके कारण कळू शकते.

५ आ. पक्ष्यामुळे झालेला अपघात : एखादा मोठा पक्षी मध्ये येऊन रोटरमध्ये अडकल्यास अपघात होऊ शकतो.

५ इ. हवामानामध्ये अचानक पालट होणे : हेलिकॉप्टर झेप घेत असतांना अचानक मोठे वादळ आले, मोठा पाऊस पडायला लागला किंवा मोठे धुके आले, तर अपघात होऊ शकतो. हा अपघात धुक्यामुळे झाला का ? याचेही कारण अन्वेषणानंतर कळेल.

५ ई. पायलटची चूक : पायलटने विमान अधिक उंचावर नेले, योग्य वळण घेतले नाही किंवा ते नीट उतरवले नाही, तर असे होऊ शकते. त्यामुळे नेमकी कुठे चूक झाली आणि कोणती काळजी घ्यायला पाहिजे ? हे येणार्‍या काळात कळेल. अशा प्रकारचे अपघात यापूर्वीही झाले आहेत आणि कदाचित् पुढेही होतील; कारण या वाहतुकीमध्ये काही मर्यादा असतात. कोणतेही यंत्र हे १०० टक्के सुरक्षित नसते.

६. रावत यांच्या अपघातामागे घातपात असल्यास शत्रूराष्ट्रांना ‘जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे !

सर्वांत महत्त्वाचे सूत्र, म्हणजे या अपघातामागे चीन किंवा पाकिस्तान यांचे समर्थक आहेत का ? त्यांनी काही घातपात केला का ? त्यांनी ‘रोटरचे स्क्रू’ सैल केले किंवा इंजिनमध्ये बिघाड करून ठेवला असेल का ? किंवा इंधनामध्ये काहीतरी भेसळ केली असेल का ? या कारणांचा शोधही नंतर लागू शकतो. या घटनेमागे घातपात असेल, तर तो करणार्‍याला पकडून कठोर शिक्षा द्यायला पाहिजे. या घातपातामागे चीन, पाकिस्तान किंवा अन्य देश असेल, तर ‘आम्ही तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ शकतो’, असा संदेश त्यालाही देणे आवश्यक आहे.

काही वर्षांपूर्वी पाकिस्तानचे सर्वेसर्वा आणि सैन्याचे प्रमुख जनरल झिया उल हक् हे एका विमानाने जात असतांना विमानाचा अपघात झाला आणि त्यात ते मारले गेले. त्यानंतर असे वृत्त समजले की, अमेरिकेची गुप्तचर संस्था ‘सीआयए’ने हा घातपात केला होता. सध्याची हेलिकॉप्टर दुर्घटना पहाता ‘चीनने सायबर आक्रमण तर केले नाही ना ? त्यांनी ‘कम्युनिकेशन सिस्टम’ (संपर्क यंत्रणा) तर बंद पाडली नाही ना ?’, अशा अनेक शक्यता निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टी अन्वेषणामध्ये समोर येतील. हा घातपात असेल, तर भारताने ‘जशास तसे’ उत्तर द्यायलाच पाहिजे; कारण हीच भाषा चीन आणि पाकिस्तान यांनाही कळते.

७. भारताच्या पहिल्या संरक्षणदलप्रमुखाला ‘सॅल्युट’ (अभिवादन) करा !

जनरल रावत हे शूर, उत्कृष्ट आणि अष्टपैलू सेनानी होते. भारताच्या पहिल्या संरक्षणदलप्रमुखाला ‘सॅल्युट’ (अभिवादन) केलाच पाहिजे. आपण ‘त्यांच्या आत्म्याला शांती लाभो’, अशी ईश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे. या दुर्घटनेमध्ये रावत यांची पत्नी मधुलिका रावत यांचाही मृत्यू झाला आहे. त्यांनी सैनिक आणि त्यांचे कुटुंब यांसाठी पुष्कळ मोठे योगदान दिले आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि २ मुली देहलीमध्ये आहेत. त्यांच्यावर फार मोठा आघात झाला आहे. तो सहन करण्यासाठी ‘देव त्यांना शक्ती देवो आणि जनरल रावत यांना शांती लाभो’, अशी प्रार्थना करूया.

८. देशासाठी योगदान देणारे शूर संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांना देशाकडून भावपूर्ण श्रद्धांजली !

जनरल रावत हे भारताचे शूर संरक्षणदलप्रमुख होते. त्यांनी सैन्यासाठी मोठे योगदान दिले होते. काश्मीरमधील अशांतता असो, ईशान्यकडील बंडखोरी असो, चीनची आक्रमकता असो किंवा सीमेवरील पाकिस्तानचे आक्रमण असो, या सर्वांना प्रत्युत्तर देण्यातून त्यांनी देशाच्या सुरक्षेत योगदान दिले. त्यांनी सर्व स्तरांवर काम केले. आता ते एका वैचारिक स्तरावर होते, जेथे तिन्ही दलांना एकत्रित आणण्याचे काम करण्यात येत होते. यातून भारताची युद्धक्षमता आणि सैन्यक्षमता पुष्कळ वाढणार होती. जनरल रावत यांचे योगदान देश कधीही विसरणार नाही. या शूर संरक्षणदलप्रमुखाला देशाने श्रद्धांजली वहायला पाहिजे. आपण आशा करूया की, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. जय हिंद !’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे