श्रीकृष्णजन्मभूमीवर आरतीची अनुमती नाकारली !

अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्‍यांकडे केली होती मागणी

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक 

मथुरा (उत्तरप्रदेश) – अखिल भारत हिंदु महासभेने येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरामध्ये १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्‍यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली आहे.

१. जिल्हाधिकारी नवनीत सिंह चहल यांनी म्हटले की, आरतीसाठी अनुमती देण्यात आलेली नाही; कारण यामुळे एक नवीन परंपरा निर्माण होऊ शकते. या प्रकरणी प्रशासन सतर्क आहे. येथील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल.

२. हिंदु महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा राज्यश्री चौधरी यांनी एक दिवस आधी म्हटले होते की, आम्ही जिल्हा प्रशासनाला ७ डिसेंबर या दिवशी पत्र पाठवले आहे; मात्र अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. अनुमतीविना आम्ही आरती करणार नाही. जर आम्हाला अनुमती दिली नाही, तर स्वतः प्रशासनाने तेथे आरती करावी आणि त्याचा व्हिडिओ आम्हाला पाठवावा.

३. यापूर्वी महासभेने ६ डिसेंबर या दिवशी ईदगाह मशिदीमध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापित करून तेथे जलाभिषेक करण्याची घोषणा केली होती; मात्र पोलिसांनी त्यांच्या पदाधिकार्‍यांना घरात नजरकैद केल्याने आणि प्रचंड बंदोबस्त ठेवल्याने या संघटनेने ही घोषणा मागे घेतली होती.