रुग्ण तपासणी करतांना साधनेचे प्रयत्न केल्याने वैद्य अशोक परशराम तांबेकर यांनी अनुभवलेला आनंद !
‘वर्ष १९९९ मध्ये पुणे येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जाहीर सभा होती. मी त्या सभेला गेलो होतो. त्यांनी सांगितल्यानुसार माझे कुलदेवतेचे नामस्मरण चालू झाले. साधनेला आरंभ करण्यापूर्वी ‘मी जे करतो किंवा जसा जगतो, ते म्हणजे ‘माया’ आणि ‘भगवंताविषयी जे करतो, ते म्हणजे ‘ब्रह्म’, असा माझा समज होता. मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने खर्या ब्रह्म मार्गाची वाट सापडली आणि आता मी ज्या वाटेवर चालतो, ते म्हणजे ‘ब्रह्म’ अन् ‘अन्य सर्व माया आहे’, असे मला वाटते.
‘माझ्याभोवती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेचे संरक्षणकवच असते. परात्पर गुरु डॉ. आठवले संकटसमयी माझ्या साहाय्याला धावून येतात’, अशा अनेक अनुभूती मला आल्या आहेत.
१. साधना आणि सेवा करतांना आनंद मिळणे
परात्पर गुरु डॉक्टरांच्या जाहीर सभांनंतर मी अधिकाधिक वेळ साधनेला देऊ लागलो. तेव्हा ते म्हणजे ‘ब्रह्म’, असे मला वाटले. मला साधना करायची इच्छा होती; पण मला त्यासाठी वेळ देता येत नव्हता. मला सनातनच्या देवद आश्रमात शनिवार आणि रविवार या दिवशी सेवा करण्याची संधी मिळाली. तेव्हा मला आनंद मिळू लागला. ‘ते २ दिवस कधी येतात’, अशी मला ओढ लागायची.
२. काळानुसार ‘प्रथोमपचार करणे’ ही साधना असणे
मला गुरुदेवांच्या कृपेमुळे प्रथमोपचार करण्याच्या माध्यमातून साधनेची नवीन दिशा मिळाली. आपत्काळ गतीने जवळ येत आहे. त्यामुळे ‘प्रथमोपचार शिकून घेणे आवश्यक आहे’, याची मला जाणीव झाली.
३. रुग्ण तपासणी करतांना साधनेचे प्रयत्न न होणे
गुरुकृपायोगानुसार साधना करतांना ‘भावपूर्ण सेवा, शरणागतभावाने भगवंताच्या चरणी प्रार्थना आणि नामजप करतांना कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी’, असे मला वाटायचे. ‘मला ही सर्व सूत्रे ठाऊक आहेत; पण रुग्णांवर उपचार करतांना वरील सूत्रांचे पालन प्रयत्न करूनही माझ्याकडून होत नाही. माझी ‘साधना म्हणून रुग्ण तपासणी होत नाही’, असे विचार माझ्या मनात यायचे. तेव्हा ‘जे वैद्य साधना करत नाहीत, त्यांचे कसे होणार ?’, असे मला वाटायचे.
४. मुंबईत नोकरी करतांना साधनेच्या स्तरावर केलेले प्रयत्न
मला जुलै २०१८ मध्ये मुंबईत नोकरी मिळाली. मला प्रतिदिन वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागत होते. त्यात कर्मचारी वर्गाची तपासणी आणि लसीकरण यांचा समावेश होता. मला अनुमाने ५० ते ५५ कर्मचार्यांची तपासणी करावी लागायची आणि त्यासाठी ४ घंटे लागायचे.
अ. कर्मचार्यांची तपासणी करतांना मी नामजप करत असे. प्रत्येक कर्मचारी तपासतांना ‘हे श्रीकृष्णा, ही सेवा तुला अपेक्षित अशी माझ्याकडून करवून घे’, अशी भावपूर्ण प्रार्थना केल्यावर मला त्यातून आनंद मिळू लागला. कर्मचार्यांची तपासणी केल्यावर मी कृतज्ञता व्यक्त करत असे.
आ. घरातून बाहेर जातांना माझी भावपूर्ण प्रार्थना होऊ लागली. माझा रुग्णांकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रार्थना केल्यामुळे पालटला. ‘श्रीकृष्ण माझ्याकडून तपासणी करवून घेत आहे’, असे मला वाटायचे. मी मधूनमधून श्रीकृष्णाशी बोलत असे.
इ. वैद्यकीय तपासणीअंतर्गत शेवटी लसीकरणाची २ ‘इंजेक्शने’ द्यावी लागायची. ती मुले ‘इंजेक्शन’ला घाबरून दंगा करायची. कधीकधी ३ – ४ जणांनी एकाला पकडून इंजेक्शन द्यावे लागायचे. तेव्हा ‘इंजेक्शन’ देण्यापूर्वी प्रार्थना होऊ लागली. आतापर्यंत मी अनेक जणांना ‘इंजेक्शने’ दिली; पण देवाच्या कृपेने कुणाकडूनही तक्रार आली नाही.
ई. मी घरातून बाहेर निघतांना स्वतःभोवती संरक्षणकवच निर्माण होण्यासाठी प्रार्थना करत असे. मी वाहनात बसतांना प्रार्थना करायचो. ‘वाहनातून प्रवास करणे, म्हणजे नामजप करण्यासाठी सर्वाेत्तम जागा’, असा मला अनुभव येऊ लागला. प्रवास करतांना नद्या किंवा समुद्र दिसल्यावर जलदेवतेला प्रार्थना होत असे.
हे लिहितांना माझा अष्टसात्त्विक भाव जागृत झाला आणि माझ्यावर आध्यात्मिक उपाय होत असल्याचे जाणवत होते.
‘गुरुमाऊली, तू प्रत्येक साधकाचा उद्धार करून घेणार आहेस’, अशी मला निश्चिती झाली आहे. ‘प्रत्येक साधकाला मायेतील ब्रह्म अनुभवायला मिळावे’, अशी मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना करतो.’
– वैद्य अशोक परशराम तांबेकर, खारघर, पनवेल. (३.१२.२०१८)