‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सर्व ५ विदेशी नागरिकांची प्रकृती स्थिर ! डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
पणजी, ८ डिसेंबर (वार्ता.) ‘कोरोना’चा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाल्याची शक्यता असलेल्या सर्व ५ विदेशी नागरिकांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोव्यात खनिजवाहू जहाजातून आलेले रशियाचे ३ आणि जॉर्जियाचे २ नागरिक यांना गोव्यात आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला होता. ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झाला आहे का ? हे तपासण्यासाठी या रुग्णांचे कोरोनाविषयक चाचणीचे नमुने पुणे येथे ’जिनोमी सिक्वेन्सिंग’ चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत; मात्र या चाचणीचा अहवाल अजून आलेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘जहाज गोव्यात आल्यावर १२ ते १३ दिवसांनी जहाजातील सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत आणि त्यामुळे त्यांना ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग होण्याची शक्यता अल्प दिसत आहे.’’
अजूनही १ लक्ष ३० सहस्र लोकांनी कालावधी उलटूनही कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतलेली नाही
कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रेनंतर (डोसनंतर) दुसरी मात्रा (डोस) घेण्याचा कमीतकमी कालावधी उलटूनही अजूनही १ लक्ष ३० सहस्र लोकांनी दुसरी मात्रा घेतलेली नाही. ‘ओमिक्रॉन’च्या संसर्गाची भीती जगभर व्यक्त केली जात असल्याने संबंधितांनी त्वरित कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घ्यावी. प्रत्येक गोमंतकियाने कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतल्यास ‘गोवा राज्य हे पर्यटकांसाठी १०० टक्के सुरक्षित ठिकाण’, असे घोषित करता येणार आहे. यामुळे गोव्यात पर्यटकांची वर्दळ वाढणार आहे. प्रत्येकाने दुसर्याला भेटतांना हस्तांदोलन करण्यापूर्वी ‘संपूर्ण लसीकरण झाले आहे ?’(कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणे म्हणजे संपूर्ण लसीकरण) याविषयीही विचारपूस करावी.’’ (भेटल्यावर पाश्चात्त्यांप्रमाणे हस्तांदोलन करणे, ही सांस्कृतिक गुलामगिरी असल्याने हिंदूंनी हस्तांदोलनाऐवजी दोन्ही हात जोडून नमस्कारच करावा ! – संपादक)