विजापूर (कर्नाटक) येथे आहेत अफझलखानाच्या ६३ बेगमांच्या (बायकांची) कबरी !
१० डिसेंबर २०२१ या दिवशी ‘शिवप्रतापदिन’ (छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला, तो दिवस) आहे. त्यानिमित्ताने…
भयावह क्रूरकर्मा अफझलखानाचे एक क्रौर्य
विजापूरच्या जवळ ५ किलोमीटर अंतरावर अफझलखानाच्या ६३ बायकांच्या कबरी आहेत. या ठिकाणाला ‘साठ कबर’ या नावाने ओळखले जाते. ५ एकर उजाड असलेल्या जागेमध्ये एका उंच चौथर्यावर एकसारख्या आकारात ६३ कबरी बांधलेल्या आहेत. या कबरींविषयीचा इतिहास येथे देत आहोत. या इतिहासावरून ‘अफझलखान हा किती क्रूरकर्मा होता’, ते लक्षात येईल.
स्वराज्यावर स्वारी करण्यापूर्वी एका मौलवी बाबांनी अफझलखानाला लढाईमध्ये न जाण्याविषयी सांगून जिवाला धोका असल्याचे सांगणे
अफझलखानाने आदिलशाहच्या दरबारात फुशारकी मारून छत्रपती शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा विडा उचलला होता. यानंतर अफझलखान स्वराज्यावर स्वारी करायला येणार होता. तत्पूर्वी खानाचा एक नियम होता की, जेव्हा जेव्हा तो लढाईसाठी निघायचा, तेव्हा तो एका मौलवी बाबांकडे जाऊन त्यांच्याकडून कौल घ्यायचा. ‘त्या बाबांना एक सिद्धी प्राप्त होती आणि त्यांना पुढे काय होणार आहे, हे समजायचे’, असे अफझलखान मानायचा. त्यामुळे स्वराज्यावर स्वारी करण्यापूर्वी या वेळीही खान त्यांच्याकडे कौल घेण्यासाठी गेला. तेव्हा बाबांना दृष्टांत झाला. त्यांना अफझलखानाचे नुसते धडच दिसले; पण त्यावर मुंडकेच नव्हते. त्यांनी खानाला याविषयी सांगितले की, ‘या लढाईमध्ये जाऊ नको. तुझ्या जिवाला धोका आहे’; पण खानाने तर फुशारकीने भर दरबारात ‘कौन सिवा ?’, असे म्हणत विडा उचलला होता. त्यामुळे स्वराज्यावर लढाईसाठी गेलो नाही, तर स्वतःची अब्रू जाईल; म्हणून नाईलाजाने अफझलखान लढाईसाठी सिद्ध झाला.
लढाईला जाण्यापूर्वी अफझलखानाने त्याच्या ६३ बायकांना विहिरीत ढकलून मारणे आणि त्यांच्या कबरी बनवणे
असे असले, तरी ‘आपल्यानंतर आपल्या माघारी बेगमांचे (बायकांचे) काय होईल ?’, या विचाराने अफझलखान हैराण झाला; कारण त्या वेळी प्रत्येक सरदाराचा वेगळा जनानखाना असायचा. जर एखाद्या सरदाराचा लढाईमध्ये मृत्यू झाल्यास त्याच्या जनानखान्यात असलेल्या त्याच्या बेगमा बाकीच्या सरदारांच्या जनानखान्यात भरती व्हायच्या. यामुळे अफझलखान चिंतीत झाला आणि त्याने एक क्रूर निर्णय घेतला. त्याने गोड बोलून त्या सर्व बायकांना विजापूरला आणले आणि तेथे असलेल्या विहिरीमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे ६३ बेगमांना पाण्यात बुडवून मारले. यानंतर त्याने त्यांच्यासाठी एकसारख्या कबरी बनवून घेतल्या आणि मगच स्वराज्यावर स्वारी केली.
पुढे प्रत्यक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रूर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी पाठवले, हा इतिहास सर्वांना ठाऊक आहेच.
(साभार : abchandorkar.wordpress.com)