रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सोजत रोड (राजस्थान) येथील अर्चना लढ्ढा यांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. रामनाथी आश्रमात आल्यावर मन निर्विचार अवस्थेत राहू लागणे आणि ‘येथील सर्व वर्तमानकाळात राहून शिकायचे आहे’, हा एकच विचार मनात असणे
‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात काही दिवसांसाठी राहण्यास आल्यानंतर २ दिवसांतच माझे मन निर्विचार अवस्थेत राहू लागले. ‘घरी काय चालू आहे ? कसे होणार ?’ इत्यादी कुठलेच विचार माझ्या मनात आले नाहीत. माझ्या मनाच्या आतून एकच आवाज येत होता, ‘आता सर्व शिकण्याची आणि सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ते वर्तमानकाळात राहून शिकायचे आहे.’
२. स्वयंपाकघरात सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. ‘प्रत्येक कृती विचारूनच करायला हवी’, हे लक्षात येणे आणि तसे केल्यावर आनंद मिळणे : परात्पर गुरुदेवांनी मला स्वयंघरातील सेवा देऊन माझ्यात ‘मनानुसार करणे’ हा स्वभावदोष असल्याचे दाखवून दिले. ‘सगळे काही विचारूनच करायला हवे’, हे माझ्या लक्षात आले. येथील प्रत्येक साधक विचारून कृती करतो. गेल्या एक मासापासून विचारून सेवा करण्याची मला सवय झाली आहे. ‘यामध्ये आनंद मिळत आहे’, असे मला अनुभवताही आले.
२ आ. ‘वस्तूचा उपयोग योग्य प्रकारे करून ती नीट ठेवणे’, हीसुद्धा साधनाच आहे’, हे माझ्या मनावर ठसले आणि त्यातही मला आनंद मिळू लागला.
२ इ. ‘परात्पर गुरुदेव आणि अन्नपूर्णामाता सर्व साधकांना सेवांचे नियोजन करण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी बळ देतात’, असे जाणवणे : ‘सर्व साधकांना वेळेवर प्रसाद आणि महाप्रसाद मिळावा’, यासाठी केले जाणारे नियोजन अद्भुत आहे. हे नियोजन करणारे साधक स्वयंपाकघरातील सर्व साधकांना सेवा देतात. ‘परात्पर गुरुदेव आणि अन्नपूर्णामाताच त्यांना शक्ती आणि बुद्धी देऊन या सेवा त्यांच्याकडून करवून घेत आहेत’, असे माझ्या लक्षात आले.
३. पृथ्वीवरच स्वर्गलोक आणि महर्लाेक यांतील दैवी बालिकांसह रहाण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळणे
दैवी बालिकांसह राहाण्यास मिळाल्यावर ‘परात्पर गुरुदेवांनी आमची महर्लोक आणि स्वर्गलोक यांतील पुण्यात्म्यांशी पृथ्वीवरच भेट करवून दिली’, असे वाटले. ‘या दैवी बालिकांकडून मला शिकण्याची स्वर्गीय संधी प्राप्त झाली आहे आणि हे माझे परम भाग्य आहे’, असेही वाटले.
३ अ. देवतांची चित्रे शरिरावर लावण्याचे महत्त्व मनावर अंकित होणे : मी चैतन्य मिळण्यासाठी देवतांची चित्रे शरिरावर लावण्याचे टाळत होते. मी आश्रमात रहाण्यासाठी आले होते. तेव्हा दैवी बालिका कु. सान्वी मोदी (आताचे वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) माझ्या खोलीत राहात होती. मी तिला देवताांची चित्रे लावण्यासाठी साहाय्य केले. त्या दिवशी माझी भावजागृती झाली. सान्वीच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी ‘देवतांची चित्रे स्वतःही लावायला हवीत’, हे मला शिकवले.
३ आ. प्रत्येक कृतीचे नियोजन करणे आणि त्याचे पालन करणे : सान्वी प्रत्येक कृतीचे पूर्वनियोजन करून त्याचे वेळच्या वेळी पालन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असे. तिच्यामुळे वेळेचे नियोजन करण्याचे महत्त्व माझ्या मनावरही ठसले गेले आणि माझे तसे प्रयत्न होण्यास आरंभ झाला.
४. स्वभावदोष आणि अहं यामुळे साधनेची होणारी हानी लक्षात येणे अन् त्यावर उपाययोजना करता येणे
‘आपल्यातील स्वभावदोष आणि अहं आमच्या साधनेची किती हानी करत आहेत ?’, हे सत्संगात सहभागी झाल्यावर मला तीव्रतेने अनुभवता आले. प्रत्येक प्रसंग झाल्यावर ‘आपण कुठे न्यून पडलो ? कुठले स्वभावदोष लक्षात आले ?’, हे शोधण्याचा आणि त्यावर उपाययोजना करण्याचा आता मनावर संस्कार झाला आहे’, असे वाटते.
५. व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून अन् भावपूर्ण करण्यास शिकायला मिळणे
‘मला त्रास आहे; परंतु त्यावर मात करण्याची उपाययोजना करण्यात मी न्यून पडत होते’, हे मला समजले. माझ्याकडून मनमोकळेपणाने बोलणे, शरणागती, प्रार्थना, कृतज्ञता, हे सर्व मनापासून आणि भावपूर्ण केले जात नसे. माझ्याकडून केवळ वरवरच्या कृती होत होत्या. रामनाथी आश्रमात आल्यावर परात्पर गुरुदेवांनी मला साधकांच्या माध्यमातून या सर्व कृती भावपूर्ण करण्यास शिकवल्या.
६. परात्पर गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा होण्यासाठी प्रार्थना होणे आणि सेवेतून आनंद मिळणे
माझ्याकडून ‘प्रत्येक सेवा परात्पर गुरुदेवांना जशी अपेक्षित आहे, तशी होऊ दे’, अशी श्रीकृष्णाला आर्ततेने प्रार्थना होत होती. परात्पर गुरुदेव त्या प्रार्थनेला प्रतिसाद देत होते आणि फलस्वरूप केलेल्या सेवेतून आनंद मिळून माझे मन रोमांचित होत होते.
७. ‘ईश्वर चराचरात आहे. ईश्वराला सर्वांमध्ये आणि सर्वत्र पाहिल्याने आपले अस्तित्व नष्ट होईल, तसेच त्रास न्यून होईल’, असे मी येथे अनुभवले.
८. साधनेच्या संदर्भात असलेल्या शिबिरात सहभागी झाल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेकाकांनी मला साधनेच्या संदर्भात असलेल्या शिबिरामध्ये २ घंटे उपस्थित रहाण्याची संधी दिली. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरुदेवांना प्रार्थना झाली, ‘या शिबिरामध्ये मला जे आवश्यक आहे, ते तुम्हीच मला शिकवा.’
अ. शिबिरामध्ये समोर सर्व सद्गुरु बसलेले पाहून मला वाटले, ‘हे काही सर्वसाधारण शिबिर नाही, तर ‘आगामी हिंदु राष्ट्र कसे असेल ?’, याची ही एक झलक आहे.
आ. सर्व सद्गुरूंच्या चारही दिशांना पिवळ्या प्रकाशाचे एक कवच दिसले.
इ. शिबिरामध्ये साधक मनमोकळेपणाने आपल्या चुका सांगत होते आणि त्या स्वीकारत होते. तेव्हा ‘हिंदु राष्ट्रामध्ये याच पद्धतीची न्यायव्यवस्था असेल’, असे मला वाटले.
९. साधकांमध्ये पालट घडवून आणण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे परात्पर गुरुदेव !
‘साधकांची साधना व्हावी’, यासाठी परात्पर गुरुदेवांनी अनमोल अशी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया साधकांना शिकवली अन् ते त्यांच्याकडून ती राबवूनही घेत आहेत. ‘त्यांची साधकांना पालटण्याची तळमळ पाहून अनंत कोटी कृतज्ञता व्यक्त केली, तरी तीसुद्धा अल्पच आहे’, असे वाटते. त्यामुळे आता परात्पर गुरुदेवांप्रती केवळ आणि केवळ कृतज्ञताच वाटते. धन्य आहे ती गुरुमाऊली !
स्मरण स्मरण श्री गुरु स्मरण ।
जन्म-मृत्यूचा चुकला फेरा ।
स्मरण स्मरण श्री चरण स्मरण ।।
१०. अनुभूती
१० अ. नामजपासाठी डोळे मिटल्यावर डोळ्यांसमोर सतत पांढरा प्रकाश दिसणे आणि ‘मोक्षप्राप्ती म्हणजे पांढर्या प्रकाशाशी एकरूप होणे’, असे परात्पर गुरुदेवांनी सूक्ष्मातून सांगणे : परात्पर गुरुदेव पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करतांना डोळे बंद केल्यावर मला सतत पांढरा प्रकाश दिसत असे. एकदा मी परात्पर गुरुदेवांना मनातल्या मनात विचारले, ‘असे का दिसते ?’ तेव्हा परात्पर गुरुदेव अंतर्मनातून बोलले, ‘मोक्षप्राप्ती म्हणजे पांढर्या प्रकाशाशी एकरूप होणे, म्हणजे स्वतःचे अस्तित्व नष्ट होऊन त्यामध्ये विलीन होणे.’
१० आ. सूक्ष्मातून परात्पर गुरुदेवांचे विराट रूप दिसणे : प्रत्येक सेवेच्या आधी परात्पर गुरुदेवांचे विराट रूप उघड्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसत होते.’
‘रामनाथी आश्रमातून परत जाऊ नये’, असे वाटणे, सद्गुरु पिंगळेकाकांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांनी ‘सर्व ठिकाणी मी असल्यामुळे सगळीकडे एकाच भावात राहाता येणे आवश्यक आहे’, असे सांगितल्यावर मन शांत होणे आणि परतीचा प्रवास करतांना समष्टीत परात्पर गुरुदेवांचे रूप दिसणे
सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी मी परत जाण्यापूर्वी मला विचारले, ‘‘येथे कसे वाटले ?’’ त्या वेळी मला रडू आले. येथून जाण्यासाठी माझे मन सिद्धच होत नव्हते. ‘निर्विचार अवस्थेतून परत रज-तमात गेल्यावर माझे कसे होईल ? मी बाहेर साधना कशी करणार ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. तेव्हा माझ्या मनातले ओळखून सद्गुरु पिंगळेकाका म्हणाले, ‘‘सर्व ठिकाणी एकाच भावात रहाता आले पाहिजे. आज येथे, उद्या दुसरीकडे कुठेतरी, असे असले, तरी सर्व एकच आहे.’’
त्या वेळी माझ्या मनाला ते स्वीकारता आले. जणूकाही साक्षात् परात्पर गुरुदेवच त्यांच्या मुखातून मला म्हणत होते, ‘सर्वत्रची ठिकाणे हे माझे व्यापक रूप आहे. पावलोपावली मी आहे. मी तुमच्यासह चालत आहे.’ त्या वेळी माझे मन शांत झाले. आगगाडीने परतीचा प्रवास करतांना समष्टीत परात्पर गुरुदेवांचे रूप दिसत होते.
– अर्चना लढ्ढा, सोजत रोड, राजस्थान. (एप्रिल २०१९)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |