रंकाळा तलाव सुशोभिकरणासाठी संमत झालेले ९ कोटी ८४ लाख रुपये राज्यशासन देणार ! – राजेश क्षीरसागर, अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ
कोल्हापूर – राज्याचे नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौर्यात ऐतिहासिक रंकाळा तलावाचा परिपूर्ण विकास आणि सुशोभिकरण यांसाठी ९ कोटी ८४ लाख रुपये संमत केले होते. प्रारंभी नगरपालिकेने यातील २५ टक्के वाटा उचलावा अशी अट होती; मात्र कोल्हापूर महापालिकेची आर्थिक स्थिती पहाता तेवढी रक्कम महापालिका व्यय करणे शक्य नव्हते. त्यामुळे हा संपूर्ण व्यय राज्यशासनाने करावा, अशी मागणी मी राज्यशासनाकडे केली होती. त्यानुसार आता रंकाळा तलाव सुशोभिकरणासाठी संमत झालेले संपूर्ण ९ कोटी ८४ लाख रुपये राज्यशासन देणार आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ८ डिसेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, शिवसेनेचे किशोर घाटगे, तुकाराम साळोखे यांसह अन्य उपस्थित होते.