आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी मुख्य प्रशासकीय अधिकारी कह्यात !

  • पेपरफुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. चुकीच्या मार्गाने परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार कधीतरी प्रामाणिकपणे काम करतील का ? त्यांनाही शिक्षा म्हणून पुढील काही वर्षे परीक्षा देण्यापासून वंचित ठेवायला हवे. – संपादक

  • पेपरफुटीच्या प्रकरणी मुख्य अधिकार्‍याला अटक होणे हे, प्रशासनाचे कमालीचे अध:पतन ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – आरोग्य विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणात सायबर पोलिसांनी लातूर येथील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकार्‍यासह ५ जणांना कह्यात घेतले आहे. कह्यात घेतलेल्या आरोपींमध्ये डॉक्टर, शिक्षक तसेच निवृत्त सैनिक यांचा समावेश आहे. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीप्रकरणी आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

सायबर पोलिसांनी अन्वेषण करून मुख्य प्रशासकीय अधिकारी बडगिरे यांच्यासह अन्य आरोपींना कह्यात घेतले. न्यायालयाने १२ डिसेंबरपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. बडगिरे यांनी प्रश्नपत्रिका कोठून मिळवली ? त्यांना कुणी साहाय्य केले ? या प्रकरणामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे ? याचे अन्वेषण सायबर पोलीस करत आहेत.