राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम शेतकर्यांसाठी उपयुक्त ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
अकोले (जिल्हा नगर) – राहीबाई म्हणजे आधुनिक युगातील सीतामाताच आहेत. राहीबाई यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेले काम देशातील शेतकर्यांसाठी उपयुक्त आहे. या कामासाठी त्यांना मिळालेल्या ‘पद्मश्री’ पुरस्काराचा आम्हाला अभिमान आहे. आधुनिक युगात सकस आणि शुद्ध अन्न प्रत्येकाच्या ताटात जाण्यासाठी राहीबाईंचे विचार स्वीकारावेच लागतील, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. प्रगतीशील शेतकरी राहीबाई पोपेरे यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते नुकताच सन्मान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
राहीबाई यांनी सांगितले की, ‘हायब्रीड’ बियाणे, तसेच रासायनिक शेती यांमुळे अनेक आजार वाढले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी शेतकर्यांनी सेंद्रिय शेती करावी. प्रत्येक गावात देशी वाणाची बीज बँक असावी.
राहीबाई पोपेरे यांचा परिचय
राहीबाई पोपेरे या महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे या गावातील महिला शेतकरी आणि पारंपरिक बियाणांच्या वाणांच्या संरक्षक-संवर्धक आहेत. देशी वाणांच्या बियाणांची जपणूक केल्याविषयी राहीबाई यांना भारत सरकारने वर्ष २०२० मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार दिला.