भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापुरातून तडीपारीची कारवाई !
लोकप्रतिनिधींना तडीपारीची शिक्षा होणे गंभीर आहे ! – संपादक
सोलापूर – येथील भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्यावर पोलीस आयुक्त हरिश बैजल यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सोलापूर, धाराशिव आणि इंदापूर (जिल्हा पुणे) येथून २ वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केली आहे. राजेश काळे यांच्यावर राजकीय पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य पद्धतीने कामे करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागणे, शासकीय अधिकारी आणि कर्मचार्यांना ॲट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याची धमकी देणे, शासकीय कामकाजात अडथळा आणणे आदी विविध ७ गंभीर गुन्हे नोंद आहेत. या गुन्ह्यांची नोंद घेऊन पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे.
१. उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापूर पोलीस आयुक्तालयासह अन्य काही पोलीस ठाण्यातही गुन्हे नोंद आहेत, तसेच राजेश काळे यांच्यावर पुण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी निगडी आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांतही २ गुन्हे नोंद आहेत.
२. यासमवेतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याच्यावर हत्या आणि अपहरण यांसह सामान्य नागरिकांना विनाकारण मारहाण करून दहशत निर्माण करणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे आदी गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावरही प्रतिबंधात्मक स्वरूपात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसह इंदापूरमधून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.