ईश्वराप्रती भाव असलेला आणि सात्त्विक कृतींची आवड असलेला आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी !
ईश्वराप्रती भाव असलेला आणि सात्त्विक कृतींची आवड असलेला ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ३ वर्षे) !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘पुणे येथील चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी (वय ३ वर्षे) याचा मार्गशीर्ष शुक्ल पक्ष षष्ठी (९.१०.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
(वर्ष २०१९ मध्ये चि. अभिराम कुलकर्णी याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के होती. – संकलक)
चि. अभिराम हृषिकेश कुलकर्णी याला तिसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
१. वय : ११ मास ते १ वर्ष
१ अ. निर्भय : ‘चि. अभिराम कोणत्याही प्राण्याला वा अन्य कशाला घाबरत नाही. वर्ष २०१९ मध्ये त्याची पहिली दिवाळी होती. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी आम्ही त्याला संकुलात खाली नेले होते. तेव्हा तिथे सगळे जण फटाके वाजवत होते. त्याचा पुष्कळ आवाजही येत होता; पण तो जराही रडला किंवा घाबरला नाही.
१ आ. सात्त्विक कृतींची आवड : आम्ही अभिरामचा पहिल्या वर्षीचा वाढदिवस देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात तिथीनुसार साजरा केला. त्यानंतर आमच्या घरी आम्ही त्याचा दिनांकानुसार वाढदिवस केला. त्या वेळी संकुलामधील सर्वांना बोलावले होते. तेव्हा आम्ही ‘केक’ न कापता त्याचे औक्षण केले आणि रामरक्षा म्हटली. हे सर्व ४५ मिनिटे चालू होते; पण त्या वेळी अभिराम थोडासुद्धा रडला नाही. त्याला हे सर्व आवडत होते. त्याला मी इतर ठिकाणी वाढदिवसाला नेले की, तो ‘केक’ कापतांना पुष्कळ रडतो आणि तो मला तिथे थांबूच देत नाही.
१ इ. टाळ वाजवत असतांना ‘ऐकत रहावे’, असे वाटून भावजागृती होणे : एकदा मी खोलीत बसले होते आणि अभिराम टाळ (झांज) घेऊन आला अन् माझ्या जवळ टाळ वाजवत बसला. तो टाळ इतके सुंदर वाजवत होता की, ते पाहून माझी भावजागृती झाली. मला ‘ते ऐकत रहावे’, असे वाटत होते.
१ ई. कोथिंबिरीची वडी दिल्यावर प्रथम स्वामी समर्थांच्या चित्राला भरवणे आणि नंतर स्वतः खाणे : आम्ही एकदा कोथिंबिरीच्या वड्या केल्या होत्या. त्याला ती पुष्कळ आवडली होती. तो स्वामी समर्थांच्या चित्राशी खेळत खेळत जेवत होता. मग मी त्याच्या हातात एक वडी दिली. त्याने ती वडी प्रथम स्वामी समर्थांना भरवली आणि मग स्वतः खाल्ली. मी त्याला म्हणाले, ‘‘तू त्यांना आवडली का ?’, असे विचार.’’ त्याने लगेचच स्वामींच्या चित्राकडे पाहून मान वाकडी करून त्यांना विचारले आणि हसून स्वामींच्या चित्राची पापी घेतली.
१ उ. अभिराम जेवत नसल्यास ‘देव पहात आहे’, असे सांगितल्यावर लगेच व्यवस्थित जेवणे : त्याला ‘एखादी गोष्ट श्रीकृष्णबाप्पाला, स्वामी समर्थांना आणि परात्पर गुरु डॉक्टरांना आवडत नाही. तू तसे करू नकोस’, असे सांगितले की, तो ती गोष्ट करत नाही. तो कधी जेवत नसेल, तर त्याला ‘श्रीकृष्णबाप्पा तुझ्याकडे बघतोय. तो तुझ्याशी बोलणार नाही’, असे सांगितल्यावर तो लगेचच व्यवस्थित जेवतो.
१ ऊ. क्षमा मागणे : त्याला ‘क्षमा कशी मागायची’, हे एकदा दाखवले होते. त्याच्याकडून काही चुकले की, तो लगेचच कान पकडून क्षमा मागतो.
१ ए. विभूतीचे उपाय करणे : तो उभा रहायला लागला, त्या वेळी त्याने उभे राहून उदबत्तीच्या घरातील विभूती बोटाने काढून घेतली आणि आपल्या सर्व अंगाला लावून उपाय केले.
२. वय : १ वर्ष ते १ वर्ष ६ मास
२ अ. हट्ट न करणे : दळणवळण बंदीच्या कालावधीत घराच्या बाहेर पडायचे नव्हते; पण त्या ३ मासांत त्याने एकदाही बाहेर जाण्यासाठी हट्ट केला नाही. आमच्या संकुलातील काही मुले खाली खेळायला यायची. तो ते पहायचा; पण त्याने कधीच हट्ट केला नाही.
२ आ. एकदा पाहिलेली गोष्ट लक्षात ठेवून तशी कृती करणे : एकदा मी आणि अभिराम खेळत होतो. मध्येच तो डोळे मिटून बोबड्या आवाजात म्हणाला, ‘‘आई, ‘नारायण.. नारायण.’’ त्या वेळी मला काही कळले नाही. नंतर संध्याकाळी आम्ही ‘विष्णुपुराण’ पहातांना भक्त प्रल्हाद ‘नारायण, नारायण’ असा जप करतांना पाहिल्यावर त्याला पाहून त्याच्याप्रमाणेच हात जोडून तो ‘‘नारायण’’, असे म्हणाला.
२ इ. आईचे पाहून आवरण काढणे : त्याचे बाबा देवपूजा करतांना तो त्यांना साहाय्य करतो. मी आवरण काढायला लागले की, लगेच तोसुद्धा उदबत्ती घेऊन आवरण काढायला लागतो.
२ ई. परात्पर गुरु डॉक्टर यांच्या जन्मोत्सवाचा ‘ऑनलाईन’ कार्यक्रम पहायचा होता. त्या वेळी तो पुष्कळ शांतपणे कार्यक्रम पहात होता.
३. वय : १ वर्ष ७ मास ते १ वर्ष १० मास
३ अ. आजीला कामात साहाय्य करणे : घरात कुठेही कचरा दिसला की, अभिराम लगेच केरसुणी आणि सुपली आणतो अन् केर काढतो. तो त्याच्या आजीला जेवणाची ताटे, वाट्या घेण्यास आणि उचलून ठेवण्यास साहाय्य करतो. तो जेवायला बसतांना बैठका मांडतो आणि जेवण झाल्यावर उचलून ठेवतो.’
३ आ. आई नसतांना न रडता आजीजवळ रहाणे : दळणवळण बंदी संपल्यावर आम्ही ‘बेकरी’चा नवीन व्यवसाय चालू केला. त्या वेळी मी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ‘बेकरी’त असायचे. त्या वेळी तो त्याच्या आजी समवेत असायचा. संपूर्ण दिवस तो एकदाही माझी आठवण काढायचा नाही किंवा रडायचा नाही. प्रत्यक्षात मी त्याला प्रथमच इतका वेळ सोडून गेले होते.
३ इ. देवच अभिरामवर संस्कार करत असल्याचे जाणवणे
१. एकदा माझ्या मनात विचार आला, ‘मी ‘बेकरी’त असल्याने अभिरामला ‘शुभंकरोती’ म्हणायला कोण सांगेल ?’ तेव्हा मी श्रीकृष्णाला प्रार्थना केली, ‘श्रीकृष्णा, आता तूच अभिरामला ‘शुभंकरोती’ म्हणायला सांग.’ मी रात्री ९.३० वाजता घरी आल्यावर सासूबाईंनी सांगितले, ‘‘अभिराम देवाजवळ शुभंकरोती म्हणायला मांडी घालून बसला होता.’’
२. सकाळी माझी पोथी वाचायची वेळ झाल्यावर तो मला खणामधील पोथी आणून हातात देतो. त्या वेळी मला ‘देवच त्याच्यावर संस्कार करत आहे’, असे जाणवले.
३ ई. भाव
३ ई १. स्वतः जेवतांना गणपतीलाही जेवणाविषयी विचारणे : आमच्याकडे १० दिवसांचा गणेशोत्सव असतो आणि गौरीपूजनाचे व्रतही असते. एकदा अभिराम श्री गणेशमूर्तीसमोर जेवायला बसला आणि म्हणाला, ‘बाप्पा, मम्म (जेवण) केली का ? बाप्पा पापा (पोळी) हवा का ?’
३ ई २. गणपतीची मूर्ती पाण्यात विसर्जन केल्याचे पाहून अभिरामला वाईट वाटणे : या वर्षी कोरोनामुळे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन घरीच करायचे होते. त्यामुळे आम्ही घराबाहेर पाण्याचा ‘टब’ ठेवून त्यात गणपतीचे विसर्जन केले. अभिरामने ते पाहिले. नंतर तो संपूर्ण दिवस ‘आई बाप्पा ? पाणी ?’, असे म्हणत होता. त्या दिवशी तो झोपेतही ‘बाप्पा.. पाणी..’, असे म्हणत होता. सकाळी उठल्यावर त्याला ताप आला होता. तेव्हा मी त्याला समजावले, ‘बाप्पाची मूर्ती केवळ पाण्यात विसर्जन केली; पण बाप्पा आपल्या घरातच आहे.’ नंतर त्याला औषध दिले आणि तो झोपला.
३ ई ३. भावपूर्ण पूजा करणे : त्याला दसर्याला पाटी आणली आणि पाटीपूजन करण्यास सांगितले. तो पाटीपूजन भावपूर्ण आणि मनापासून करत होता. त्याची ती पूजा पाहून माझी पुष्कळ भावजागृती झाली.
३ ई ४. अभिरामला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ हातात दिला की, तो प्रथम नमस्कार करतो आणि मग त्या ग्रंथाला मिठी मारतो.
४. स्वभावदोष
स्वकौतुकाची अपेक्षा असणे’
– सौ. रमणी हृषिकेश कुलकर्णी (चि. अभिरामची आई), पुणे (४.२.२०२१)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक