सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याच्या अवैध वाहतुकीच्या प्रकरणी ७ मासांत पावणे आठ कोटी रुपयांचा मुद्देमाल कह्यात
|
सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने एप्रिल ते ऑक्टोबर २०२१ या ७ मासांत मद्याची अवैध वाहतूक आणि विक्री यांच्या विरोधात केलेल्या कारवाईत जिल्ह्यात ४६४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या अंतर्गत मद्य आणि ५९ वाहने यांसह एकूण ७ कोटी ७५ लाख ६१ सहस्र ७१५ रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला, तर ३३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी.एच्. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात १३२ परमिट रूम, ११७ बिअर शॉपी, ४४ देशी, तर १ वाईन शॉप आहे. वर्ष २०२० मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या मासांत ५२० गुन्ह्यांची नोंद करून ३१० आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ६५ वाहने आणि १ कोटी ६३ लाख ४६ सहस्र ५८० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६ कोटी १२ लाख १५ सहस्र १३५ रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेण्यात आला आहे. (मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभागाने गतवर्षीच्या तुलनेत चांगली कारवाई केली असली, तरी अशा प्रकरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ होणे, ही सामाजिकदृष्ट्या खेदाची गोष्ट आहे. उलट सरकार आणि प्रशासन यांनी याविषयी जागरुकता निर्माण करून हे प्रमाण दिवसेंदिवस घटत कसे जाईल हे पहाणे आवश्यक आहे ! – संपादक)