किती महत्त्वपूर्ण आहेत देशी गायीची शिंगे ?
‘देशी गायी केवळ आपल्या पंचगव्यांनीच (दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र) आपल्याला केवळ पोषित करत नाही, तर सूक्ष्म, अतिसूक्ष्म सौर ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा (कॉस्मिक एनर्जी) इत्यादी प्राप्त करून त्यांच्याद्वारे समस्त प्राण्यांना लाभ होत असतो. हे कसे होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? गायीच्या मस्तकावर सुशोभित असणार्या शिंगांच्या उत्पत्तीचा इतिहास आणि शिंगांची वैशिष्ट्ये यांचे रहस्य उघड करतात.
भगवान वेदव्यास म्हणतात, ‘‘गायींना अगोदर शिंग नव्हते. त्यांनी शिंगांसाठी भगवान ब्रह्मदेवांची उपासना केली. गायींना प्रायोपवेशन (आमरण उपोषण) करतांना पाहून ब्रह्मदेवांनी त्यांच्यापैकी प्रत्येकीला तिच्या आवडत्या वस्तू दिल्या. वरदान मिळाल्यावर गायींचे शिंग प्रगट झाले. जिच्या मनात जशा शिंगांची इच्छा होती, तसे तिचे शिंग बनले. ना-ना प्रकारच्या रंगरूपांनी आणि शिंगांनीयुक्त त्या गायींची दिव्य शोभा होऊ लागली.’’ (महाभारत, अनुशासन पर्व : ८१.१३-१५)
१. गायीच्या शिंगांद्वारे अंतरिक्षातील सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, देवगण आणि सप्तर्षी यांच्याकडून प्रवाहित ऊर्जा ग्रहण केली जाणे
जसे दूरचित्रवाणी किंवा भ्रमणभाष टॉवरचा ‘रिसीव्हर’ त्याच्या तरंगलहरी ग्रहण करतो, अगदी तसेच गायीचे शिंग अंतरिक्षातील सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्र, तारे, देवगण (शुभ नक्षत्रांचा समूह) आणि सप्तर्षी इत्यादींकडून प्रवाहित ऊर्जा ग्रहण करून गायीच्या शरिरात प्रवाहित करतात. ही ऊर्जा गायीच्या दूध आदी पंचगव्यांपासून आपल्याला मिळते. अंतरिक्षाची ही शक्ती आकृष्ट करण्याची शक्ती अन्य शिंगयुक्त पशूंमध्ये नसते.
दिवसा सौरऊर्जा ग्रहण करायला गोमाता सूर्यतापात जाण्यासाठी आकृष्ट रहाते आणि रात्री चंद्राची सौम्य ऊर्जा अन् ग्रह-नक्षत्रांचे विद्युत चुंबकीय तरंगलहरी ग्रहण करण्यासाठी मोकळ्या आकाशाखाली बसणेच पसंत करते.
२. उर्ध्व दिशेच्या आणि अर्धचंद्राकृती शिंगांच्या गायीचे दूध अन् तूप यांचा होणारा औषधी उपयोग
अ. गायींमध्ये ऊर्ध्व, खालच्या दिशेने, कुंडलाकार आणि वक्र इत्यादी प्रकारची शिंगे पहायला मिळतात. ऊर्ध्व शिंगांच्या गायींचे दूध अधिक ऊर्जाप्रद रहाते. महर्षि अग्निवेश यांनी आयुर्वेदाच्या औषधांसाठी अशा गायींचे दूध, तूप ग्रहण करण्याचा संकेत केला आहे.
आ. अर्धचंद्राकृती शिंगांच्या गायी चंद्राची सौम्य ऊर्जा विशेष संग्रहित करतात. पित्तदोष शमनार्थ आणि पित्तसंबंधी व्याधींसाठी अशा गायींचे दूध, दही आणि तूप यांचे सेवन केले पाहिजे.
३. मृत गायींच्या शिंगांचा उपयोग करून केले जाणारे खत
पौर्णिमेच्या दिवशी (शरद पौर्णिमेचा दिवस सर्वाेत्तम)२ फूट लांब, २ फूट रूंद आणि २ फूट खोल खड्डा खोदून त्याचा ९ इंच खोलीचा भाग गायीच्या शेणाने भरावा. मग मृत दुभत्या गायीच्या शिंगांमध्ये (नैसर्गिकरित्या मेलेल्या गायींच्या शिंगांचाच वापर लाभदायी असतो) शेण भरून त्यांचा तोंडाकडचा भाग शेणात खुपसावा आणि टोकाचा भाग वर ठेवावा. त्यानंतर यावर शेण थापावे आणि दुसर्या थरातही शिंगे खुपसावी. यानंतर खड्ड्याचा उरलेला भागही शेणाने भरावा आणि जमीन सपाट करावी. अनुमाने ६ मासांनी अमावास्येला (जर या दिवशी शक्य नसेल, तर कृष्ण पक्षाच्या कोणत्याही अन्य तिथीला) शिंगे खड्ड्यातून बाहेर काढावीत. शिंगांतील पावडर बाहेर काढून सुरक्षित ठेवावी. पेरणीच्या वेळी या पावडरचे (१ ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने) पाण्यात मिश्रण बनवून जमिनीवर शिंपडावे. या सुंदर शास्त्रीय विधीचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा.’