सूक्ष्मातील जाणण्याची उत्तम क्षमता असलेल्या, लहान वयापासून पूर्ण क्षमतेने आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी (८.१२.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्या चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर यांचा विवाह डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्री. सुयश गाडगीळ (सिनेअभिनेते श्री. श्रीराम गाडगीळ यांचे सुपुत्र) यांच्या समवेत होणार आहे. त्यानिमित्त चि.सौ.कां. प्रियांका यांच्या समवेत सेवा करणार्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. सुयश गाडगीळ आणि चि.सौ.कां. प्रियांका लोटलीकर यांना शुभविवाहाच्या निमित्ताने सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. नेतृत्व
‘प्रियांकाताई महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या महत्त्वाच्या उपक्रमाचे दैनंदिन नियोजन पहाण्यापासून सर्व सेवा धडाडीने पहाते.
२. सूक्ष्मातील जाणण्याची उत्तम क्षमता
प्रियांकाताईमध्ये सूक्ष्मातील जाणण्याची उत्तम क्षमता आहे. त्याचप्रमाणे सूक्ष्मातून तिला जे समजते, ते चित्राच्या माध्यमातून सादर करण्याचीही तिच्यात क्षमता आहे. आचारधर्माचे महत्त्व विशद करणारी शेकडो सूक्ष्म-चित्रे तिने काढली आहेत. या माध्यमातून आचारधर्मात सांगितलेल्या अनेक कृतींमागचे शास्त्र स्पष्ट झाले आहे.
३. ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ
‘फाईन आर्ट्स’मध्ये पदवी मिळाल्यानंतर पुढे उत्तम ‘करिअर’ शक्य असूनही तिने त्या सर्वांचा त्याग करून अगदी लहान वयात ईश्वरप्राप्तीसाठी पूर्णवेळ साधना करण्यासाठी आश्रमात रहाण्याचा निर्णय घेतला.’
आधुनिक वैद्या (सौ.) लिंदा बोरकर आणि डॉ. रूपाली भाटकर
व्यष्टी साधनेच्या आढाव्यात ‘कु. प्रियांका यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले मार्गदर्शन करतात’, असे जाणवणे
‘प्रियांकाताई आमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेत असतांना मार्गदर्शन करतांना बर्याचदा ‘तिच्या माध्यमातून श्री गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) मार्गदर्शन करतात’, असे आम्हाला वाटते.’
सौ. मधुरा धनंजय कर्वे, फोंडा, गोवा.
१. सहनशील
‘प्रियांकाताईला कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी ती सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. तिला होत असलेल्या शारीरिक त्रासाविषयी ती कधीही कुठेही वाच्यता करत नाही. तिच्यामध्ये पुष्कळ सहनशीलता आहे.
२. संघभाव निर्माण करणे
सेवेतील साधकांमध्ये आरंभी संघभावना नव्हती. प्रत्येक जण आपापल्या कोषात रहात असे. तिने सत्संगात याची सर्वांना जाणीव करून दिली. तिने यासाठी सर्वांना प्रयत्न करायला सांगून ‘सर्वांमध्ये संघभाव निर्माण होईल’, असे पाहिले.
३. साधकांना समजून घेणे
अ. माझी शारीरिक स्थिती ठीक नसल्याने मला अधिक वेळ सेवा करता येत नाही, तर काही वेळा माझ्या मनात नकारात्मक विचार असतात. तेव्हा ती मला समजून घेते आणि ‘मला ताण येणार नाही’, याची सर्वतोपरी काळजी घेते.
आ. ‘ती स्वतःकडून कुणी दुखावले जाणार नाही’, याची काळजी घेते. सहसाधक तिला स्वतःची एखादी अडचण सांगत असतांना ती शांतपणे सर्व ऐकून घेते आणि थोडक्यात; पण नेमकेपणाने मार्गदर्शन करते.
४. ‘साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ असणे
अ. प्रियांकाताईला ‘सर्व साधकांची प्रगती व्हावी’, अशी तळमळ आहे. त्या दृष्टीने ताई साधकांना ‘त्यांच्यातील स्वभावदोष आणि अहं यांवर मात करण्यासाठी कसे प्रयत्न करायला पाहिजेत ?’, हे सांगते.
आ. तिचा साधकांचा चांगला अभ्यास असून तिला प्रत्येक साधकाच्या क्षमतेची पूर्ण जाणीव आहे. त्या दृष्टीने ती वेळोवेळी साधकांना पुढच्या टप्प्याची सेवा शिकवून ‘त्यांना साधनेत पुढे कसे नेता येईल ?’, यासाठी प्रयत्नशील असते.
श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, सनातन आश्रम, गोवा.
१. नीटनेटकेपणा
‘प्रियांकाताई स्वतःच्या वस्तू व्यवस्थित ठेवते. तिची दैनंदिनी, सेवेच्या नियोजनाची वही, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन सारणी यांतील लिखाण व्यवस्थित, खाडाखोड न केलेले आणि सूत्रबद्ध असते.
२. काटकसरीपणा
अ. पेन्सिल, ‘फोल्डर’, लिखाणाचे ‘पॅड’ आदी काही वस्तू ती गेली अनेक वर्षे वापरत आहे.
आ. मी तिला कधी कपडे किंवा अन्य वस्तूंवर अनावश्यक व्यय करतांना पाहिले नाही. आश्रमात असतांना किंवा सेवेनिमित्त वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करतांनाही ती मोजकेच कपडे दीर्घकाळपर्यंत वापरते आणि तरीही तिचे कपडे नेहमी स्वच्छ, व्यवस्थित आणि प्रसंगानुरूप असतात.
३. प्रसंगावधानता
एखादी सेवा पूर्ण करण्यासाठी ती प्रसंगानुसार योग्य निर्णय घेते. सेवेच्या आवश्यकतेनुसार ‘इतरांचे साहाय्य घेणे आणि त्यासाठी समन्वय करणे’, या सेवा ती कौशल्याने करते. आश्रमात आलेले प्रतिष्ठित, संत आणि साधक यांच्याशी वार्तालाप करतांना ती परिस्थितीनुरूप योग्य ते प्रश्न विचारून त्यांच्याकडून साधकांच्या साधनेला आवश्यक अशी माहिती मिळवते.’
४. सेवेची तळमळ
अ. एखादी सेवा मिळाल्यावर ती सेवा नियोजित समयमर्यादेत पूर्ण होण्यासाठी ती कसोशीने प्रयत्न करते.
आ. सेवा करतांना ‘संतांना काय आवडेल ? त्यांना काय अपेक्षित आहे ? एखादे चित्रीकरण किंवा एखादी मुलाखत संतांना आवडेल, यासाठी ती कशी व्हायला हवी ?’, असा तिचा सतत प्रयत्न असतो. ‘ती संतांना आवडेल’, अशा प्रकारे सेवा करते.’
श्री. आशिष सावंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रगल्भता
‘प्रियांकाताई विचार करून निर्णय देते. ती वयाने माझ्यापेक्षा लहान असूनही तिच्या विचारांमध्ये प्रचंड प्रगल्भता आहे.
२. कर्तेपणा गुरुचरणी अर्पण करणे
प्रियांकाची कधीही स्तुती केली, तरी ती कधी भारावून जात नाही. ती नेहमी ‘माझे काहीच नाही. सर्व प.पू. गुरुदेवच करतात’, असे म्हणते.
श्री. गिरीश पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. प्रगल्भ आध्यात्मिक दृष्टीकोन
प्रियांकाताईंकडे सेवेविषयी किंवा अन्य कोणतीही अडचण घेऊन गेलो, तर त्या नेहमी ‘आध्यात्मिक स्तरावर योग्य दृष्टीकोन काय ठेवायला हवा ?’, हे सांगतात.
२. श्रद्धा
‘प्रियांकाताईंची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पुष्कळ श्रद्धा आहे. त्यांचा नेहमी गुरुदेवांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे आज्ञापालन करण्याचा प्रयत्न असतो.
श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, फोंडा, गोवा.
१. स्थिरता
प्रियांकाताईकडे काही सेवांचे दायित्व असतांनाही तिच्या तोंडवळ्यावर कधी ताण किंवा चुकांचे भय दिसत नाही. ती कधीही घाईगडबडीत आणि काळजीत दिसत नाही. ती स्थिर राहून सर्व हाताळते.
२. इतरांना साहाय्य करणे
ज्योतिषाच्या संबंधी विविध सेवांच्या समन्वयामध्ये मला येणार्या अडचणींवर प्रियांकाताई योग्य दिशादर्शन करते. ‘आपण आणखी कोणकोणत्या विषयांवर लेख लिहू शकतो ?’, हेही ती मला सुचवते.
३. संतांचे मन जिंकणे
प्रियांकाताईने अनेक वर्षे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी संशोधनाशी संबंधित सेवा केली आहे. संत वेळोवेळी आपल्याला शिकवण्यासाठी आपल्या चुका सांगतात, तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी मनोलय आणि बुद्धीलयही करवून घेतात. ताईने हे सर्व सकारात्मक राहून स्वीकारले अन् संतांचे मन जिंकले.’
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. |