‘घरवापसी’ आणि हिंदूंचे दायित्व !
संपादकीय
उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी अंततः हिंदु धर्मात ‘घरवापसी’ केली. सर्व माध्यमांनी या घटनेचा ‘धर्मांतर’ असा उल्लेख केला असला, तरी हे धर्मांतर नव्हे; कारण हिंदु धर्म कुणाचेही धर्मांतर करण्यास सांगत नाही; त्यामुळे अन्य धर्मीय जेव्हा हिंदु धर्माचा स्वयंप्रेरणेने स्वीकार करतात, तेव्हा (हिंदु धर्म हा पृथ्वीवरील मूळ धर्म असल्याने) एकप्रकारे ते त्यांच्या मूळ घरी परत येतात, असेच म्हणावे लागते. रिझवी यांचे नवे नाव ‘जितेंद्र नारायण सिंह त्यागी’ असे आहे.
सत्यान्वेषी त्यागी यांची तत्त्वनिष्ठा आणि धैर्य !
इस्लाम धर्मातील क्रौर्याला नाकारणारा शिया पंथ नेहमीच हिंदूंच्या बाजूने राहिला आहे. राममंदिर प्रकरणात शिया वक्फ बोर्डाने ‘मंदिर पाडून मशीद बांधण्यात आली’, असे मान्य केले होते. अशा या शिया वक्फ बोर्डाचे २० वर्षे अध्यक्षपद असतांना त्यागी यांच्यावर २ प्रकरणांत आर्थिक अपहाराचे आरोपही झाले; परंतु त्यातून ते निर्दाेष सुटले. कुराणावरून मतभेद झाल्याने त्यांच्यावर इस्लाम धर्मातील शत्रूंकडून त्यांच्या चालकाला फितवून त्याच्याकरवी बलात्कार केल्याचा कथित आरोपही धर्मांधांनी केला. अशा प्रकारे समाजबांधवांकडून मोठा विरोध होत असूनही त्यागी डगमगले नाहीत. ‘११ मुख्य मशिदी, ज्यांवर मंदिरे बांधली गेली आहेत, त्या हिंदूंना दिल्या पाहिजेत’, असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर कुराणमधील हिंसा निर्माण करणारी २६ आयते काढण्यासाठी त्यागी यांनी खटला प्रविष्ट केला; परंतु न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यांनी महंमद पैगंबर यांचे चरित्र प्रसिद्ध केले. यावरून मोठा वादविवाद झाला. कट्टर मुसलमान सुन्नी पंथीय तर त्यांना अर्धे काफीरच समजतात. ‘ऑल इंडिया फैजन ए मदिना काऊन्सिल’ या संघटनेने त्यांचा शिरच्छेद करणार्यांना पारितोषिक घोषित केले आणि त्यांना बहिष्कृत करण्याचा फतवा काढला. विविध मुसलमान संघटना आणि समाज यांच्याकडून त्यांना आतापर्यंत बर्याच धमक्या आल्या आहेत अन् सध्या हा विरोध प्रचंड वाढल्याने त्यांना ‘वाय्’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली. विशेष म्हणजे आता त्यांचे नातेवाइक आणि कुटुंबीयही त्यांच्यापासून दूर झाले आहेत. असे असून त्यागी जराही डगमगले नाहीत. त्यांच्या वैचारिक तत्त्वनिष्ठेवर ते ठाम राहिले आहेत; इतकेच नव्हे, तर मृत्यू झाल्यास दहन करण्याविषयीही त्यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवले आणि अंतिमतः त्यांच्या तत्त्वनिष्ठेने त्यांना हिंदु धर्मात परत आणले आहे !
धर्मचिकित्सेचा परिणाम !
सध्या पुरोगामी ‘हिंदु धर्माची चिकित्सा व्हायला हवी’, अशी टिमकी वाजवत असतात. ‘धर्मचिकित्सा’ हे त्यांचे आवडीचे सूत्र आहे. ‘त्यागी’ हे ‘रिझवी’ असतांना त्यांनीही त्यांच्या धर्मग्रंथातील काही आयतांना न्यायालयात आव्हान देऊन एकप्रकारे धर्मचिकित्सा करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, ही गोष्ट वेगळी; पण ही ‘धर्मचिकित्सा’ केल्यामुळे त्यांचा जिवाला धोका निर्माण झाला. इस्लामची धर्मचिकित्सा करणार्यांचे काय हाल होतात, हे या पूर्ण प्रकरणातून दिसून आले. ‘धर्माची चिकित्सा करा’, ‘सहस्रो वर्षांच्या परंपरा रहित करा’, ‘काळानुसार धार्मिक नियमांमध्ये पालट करा’, असा सल्ला देणारे या पूर्ण प्रकरणात मात्र मूग गिळून गप्प बसले होते. त्यामुळे पुरोगाम्यांचे खरे स्वरूप उघड झाले.
हिंदु धर्म व्यापक आहे. एखाद्या गोष्टीची चिकित्सा करायला हिंदु धर्मही कधी ‘नाही’ म्हणत नाही; मात्र धर्म समजून घ्यायचा असेल, तर ‘बुद्धीचा कीस पाडणे’, हा नव्हे, तर ‘धर्म जाणून घेण्याची तीव्र जिज्ञासा’ हा येथे निकष लागू होतो. हिंदु धर्माची ही व्यापकता, सर्वसमावेशकता समजून घ्यायला हवी.
हिंदूंचे दायित्व !
त्यागी हे जन्माने हिंदु नसले, तरी सत्याची कास धरून त्यासाठी प्राणत्याग करण्याची सिद्धता करून लढत राहिल्याने ते खरे कर्महिंदु झाले आहेत ! हिंदूंमध्ये जन्महिंदूंचीच संख्या प्रचंड आहे. सध्याच्या अराजक होण्याच्या स्थितीत जन्महिंदूंची नव्हे, तर कर्महिंदूंची आवश्यकता आहे. जसाजसा हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी पूरक काळ जवळ येत चालला आहे, तसतसे अन्यायग्रस्त लोकांना हिंदु धर्म हा आशेचा किरण वाटत आहे. ‘त्यागी यांची घरवापसी’ हा त्यांतील एक मैलाचा दगड म्हणावा लागेल. विश्वभरात हिंदु धर्माचे महत्त्व वाढत असतांना हिंदूंना कट्टर शत्रू समजणार्या इस्लाम धर्मांतील अनेकांनाही हिंदु धर्माचे महत्त्व पटले आहे आणि त्यामुळेच ‘आम्ही मुसलमान असलो, तरी आमचे पूर्वज अकबर-बाबर नव्हे, तर राम-कृष्ण होते’, असे सांगणार्यांचे ‘व्हिडिओ’ प्रसारित होत आहेत. शिक्षित मुसलमान युवतींना त्यांच्या धर्मात मिळणारी अन्यायकारक वागणूक लक्षात येत आहेत. मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया यांसारख्या इस्लामी; परंतु पूर्वज हिंदु असलेल्या देशांमध्ये हिंदु संस्कृती वृद्धींगत होत आहे. अशा वेळी हिंदूंचे दायित्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ‘हिनान् गुणान् दुषयति इति हिंदुः ।’ अशी हिंदु धर्माची व्याख्या आहे. याचा अर्थ ‘हीन, कनिष्ठ अशा रज-तम गुणांचा नाश करणारा तो हिंदु.’ हिंदु धर्मात आचरणाला महत्त्व आहे; त्यामुळेच नैतिकता, त्याग, संयम आदी गुणांनी युक्त असणारे हिंदूंचे नरोत्तम जगभरात नावाजले गेले. यामुळेच सारे जग आज मनःशांतीच्या शोधात एकमेवाद्वितीय अशा हिंदु धर्माकडे आशेने पहात आहे. उद्या त्यागी यांच्यासारख्या अनेकांचा हिंदु धर्मात परत येण्याचा ओघ वाढणार आहे. त्यामुळे हिंदूंनी स्वतः धर्माचरण करणे अपेक्षित आहे; अन्यथा हिंदु धर्माने प्रभावित होऊन घरवापसी करणार्यांकडून उद्या शिकण्याची वेळ हिंदूंवर येईल. हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करणार्यांकडे पाहून जन्महिंदूंचा स्वधर्माभिमान वृद्धींगत झाला पाहिजे आणि त्यांनी कर्महिंदू बनले पाहिजे !