औषधोपचारांच्या समवेत नामजपादी उपाय केल्याने साधिकेचा भाऊ मूत्रपिंडाच्या गंभीर आजारातून वाचणे
‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !
‘मनुष्याच्या जीवनात येणार्या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे. त्यामुळे सत्कार्यामध्ये विघ्ने आणून त्यांचे त्रास देण्याचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी समाजाभिमुख सत्कार्य करणार्या, म्हणजे समष्टी साधना करणार्या सनातनच्या साधकांना सध्या अशा त्रासांची वारंवार प्रचीती येत आहे. त्यामुळे कोणतेही सत्कार्य निर्विघ्नपणे होण्यासाठी आधीच नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत. तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रतिदिन करत असलेल्या व्यष्टी साधनेमध्येही साधकांना वाईट शक्ती वारंवार त्रास देत आहेत. त्यासाठीही साधकांना नामजपादी उपाय शोधून ते करावे लागत आहेत.
वाईट शक्तींच्या त्रासांवर नामजपादी उपाय करणे म्हणजे त्यांच्याशी एकप्रकारे लढणेच असते. पाचव्या, सहाव्या पाताळांतील वाईट शक्तींची शक्ती पुष्कळ असल्याने त्यांच्याशी लढणे, म्हणजे आपल्या जिवावर बेतण्याएवढे धोकादायक असते, तरीही गुरूंचे संरक्षककवच आणि देवाची कृपा यांमुळेच मी ही सेवा करू शकत आहे. या सेवेतील माझे विविध अनुभव, मला शिकायला मिळालेली सूत्रे, मी नामजपादी उपाय केलेल्या साधकांच्या अनुभूती हे लिखाण या लेखमालेत देत आहे. ‘हे लिखाण वाचून साधना, नामजपादी उपाय आणि गुरुकृपा यांचे जीवनातील महत्त्व सर्वांच्या मनावर बिंबो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना करतो.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३१.८.२०२१)
१. भावाला तीव्र शारीरिक त्रास होणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘इंजेक्शन’ देऊनही त्याला बरे न वाटणे
‘८.९.२०२१ या दिवशी माझा लहान भाऊ श्री. प्रशांत अरविंद शुक्ल याच्या पोटात अकस्मात् दुखू लागले. त्याच्या पायांतून तीव्र कळा येऊ लागल्या, तसेच त्याला जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. आधुनिक वैद्यांना बोलावल्यावर त्यांनी ५ – ६ इंजेक्शने दिली; पण काही लाभ झाला नाही.
२. भावाच्या मूत्रपिंडाचे कार्य पूर्ण थांबले असल्याचे लक्षात येणे
१०.९.२०२१ या दिवशी माझ्या भावाला रुग्णालयात नेले असता आधुनिक वैद्यांनी त्याला अतीदक्षता विभागात भरती केले. त्या वेळी त्याच्या रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण ९.९० मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर इतके झाले होते (‘निरोगी मूत्रपिंड असलेल्या पुरुषासाठी रक्तातील ‘क्रियाटिनिन’चे प्रमाण ०.६ ते १.३ मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर असते.’ – संकलक) त्याच्या मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य पूर्ण थांबले होते.
३. संतांनी नामजपादी उपाय करण्यास सुचवणे
२ – ३ दिवसांनी आम्ही संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे संत अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णीकाका (वय ६३ वर्षे) यांना संपर्क केला. तेव्हा त्यांनी ‘तुम्ही अद्याप नामजपादी उपाय का विचारले नाहीत ?’, असे विचारले आणि आम्हाला नामजपादी उपाय करण्याची जाणीव करून दिली. त्यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका यांना याविषयी सांगितले. सद्गुरु गाडगीळकाकांनी लगेच ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः। श्री गुरुदेव दत्त । श्री हनुमते नमः ।’, हा मंत्रजप करण्यास सांगितला (‘हा जप रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण वाढल्याने मूत्रपिंडाची क्षमता न्यून होण्याच्या विकारावर उपाय म्हणून केला जातो.’ – संकलक), तसेच सद्गुरु नंदकुमार जाधवकाका (वय ६९ वर्षे) यांनी ‘संकटनिवारण मंत्र’ म्हणायला सांगितला आणि भावाची नारळाने दृष्ट काढायला सांगितली.
संकटनिवारण मंत्र
शरणागतदीनार्तपरित्राणपरायणे ।
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : शरण आलेल्या दीनजनांना तारण्यास सदैव तत्पर अशा सर्वांचे दुःख दूर करणार्या हे देवी नारायणी (दुर्गादेवी), तुला माझा नमस्कार असो.
४. नामजपादी उपाय केल्याने भावाच्या प्रकृतीत आश्चर्यकारक पालट होणे आणि आधुनिक वैद्यांनी त्याला ‘तुम्ही वाचलात’, हा दैवी चमत्कार आहे’, असे सांगणे
संतांनी सांगितल्याप्रमाणे नामजपादी उपाय केल्यावर भावाच्या प्रकृतीत आश्चर्यकारक पालट झाला. सातव्या दिवशी त्याला अतीदक्षता विभागातून बाहेर आणले. त्याला दिवसातून ३ वेळा ‘इन्सुलिन’चे ‘इंजेक्शन’ चालू होते. ते आता एकदाच आणि अल्प प्रमाणात द्यावे लागते. आता त्याच्या रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण १.४८ मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर इतके झाले आहे. त्याला ‘डायलिसीस’ (मूत्रपिंड निकामी झाल्यावर हा उपचार करतात. यात यंत्राद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरिरात पुरवले जाते.) करायला सांगितले होते; पण नामजपादी उपायांमुळे आधुनिक वैद्यांनी ‘डायलिसीस’चा निर्णय अकस्मात् पालटला.
७.१०.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्यांनी त्याला परत तपासणीसाठी बोलावले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमची केस म्हणजे एक आश्चर्यच आहे. काहीतरी दैवी चमत्कार झाला आणि तुम्ही वाचलात, नाहीतर तुमच्या जिवाला धोका होता.’’ तेथील परिचारिकाही म्हणाली, ‘‘तुम्ही वाचाल’, असे आम्हाला वाटत नव्हते.’’
हे सर्व केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य झाले. त्यांच्या, तसेच सद्गुरु डॉ. गाडगीळकाका, सद्गुरु जाधवकाका आणि पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णीकाका यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. नीलिमा कुलकर्णी, नाशिक (१५.१०.२०२१)
|