(म्हणे) ‘लेखक आणि साहित्यिक यांचे लेखनस्वातंत्र्य न्यून होत आहे !’
मोदी सरकारच्या काळात साहित्यिकांची गळचेपी होत असल्याची गीतकार जावेद अख्तर यांची गरळओक
नाशिक, ७ डिसेंबर (वार्ता.) – आज सामान्य नागरिक असो, कवी असो किंवा साहित्यिक असो, या सर्वांचे स्वातंत्र्य न्यून होत आहे. साहित्यिकांची लेखणी थांबत असून जीभ लडखडत आहे. वर्ष १९६३ मध्ये नव्हती इतकी साहित्यिकांना आज लेखनस्वातंत्र्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य करून गीतकार जावेद अख्तर यांनी ‘मोदी सरकारच्या काळात साहित्यिकांची गळचेपी होत आहे’, अशी गरळओक नाशिक येथील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात केली. या संमेलनाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करतांना त्यांनी वरील विधान केले होते. ‘जो बात कहनेको डरते हे सब, तू वो बात लिख । इतनी अंधेरी थी न कभी ये रात, लिख’, असा शेर म्हणून जावेद अख्तर यांनी साहित्यिकांच्या लेखनस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे नमूद केले. (काँग्रेसच्या काळात काश्मीरमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकावण्याच्या, भारताचे तुकडे करण्याची घोषणा करण्याच्या, हिंदूंच्या देवतांची टिंगल करण्याच्या कृत्यांचे साहित्यातून समर्थन करणे, म्हणजे लेखनस्वातंत्र्य आहे का ? आता जागृत होत असलेल्या हिंदूंनी याला विरोध केल्यावर स्वातंत्र्याची गळचेपी झाल्याची ओरड करणारे अन्य पंथियांकडून होणार्या मानवतेच्या स्वातंत्र्याच्या गळचेपीविषयी का बोलत नाहीत ? – संपादक)
अख्तर पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १९६३ मध्ये कवी प्रेमचंद यांच्या अध्यक्षतेखाली बंगाल येथे झालेल्या साहित्यिकांच्या संमेलनात प्रेम कवितांऐवजी देश आणि महिलांचे स्वातंत्र्य यांसाठी लिखाण करण्याचा निश्चय करण्यात आला होता. तेव्हा नव्हती एवढी आजच्या स्थितीला लेखनस्वातंत्र्याची आवश्यकता आहे. लोकशाहीसाठी संसद, राजकीय पक्ष, सत्ताधारी आणि विरोधक यांची जशी आवश्यकता आहे, तशी कुणाच्या बंधनात नसलेल्या नागरिकांचीही आवश्यकता आहे. साहित्यिकांनी कुणा पक्षाशी नव्हे, तर संस्कार, आदर्श आणि देशाशी एकनिष्ठ असावे.’’ (साहित्यप्रेमींना उपदेश करणार्या जावेद अख्तर यांनी ही गोष्ट प्रथम ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास नकार देणार्या स्वत:च्या समाजबांधवांना आणि कथित पुरोगाम्यांना सांगावी. तस्लिमा नसरीन यांनी सत्य लिखाण केल्यानंतर त्यांना बांगलादेशमधून बाहेर जावे लागले, तेव्हा जावेद अख्तर यांना लेखनस्वातंत्र्याची आठवण झाली नाही. यातून त्यांचा ढोंगीपणा दिसून येतो. – संपादक)