छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना २१ व्या शतकात साकारू शकतो ! – रामनाथ कोविंद, राष्ट्रपती
रायगड – छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते. रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतियासाठी अभिमानाची गोष्ट आहे. रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एकप्रकारे तीर्थयात्राच आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना २१ व्या शतकात साकारू शकतो, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. ६ डिसेंबर या दिवशी राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना रायगडावर निमंत्रित केले होते. ६ ते ९ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रपती महाराष्ट्राच्या दौर्यावर आले आहेत. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून राष्ट्रपतींनी या दौर्याला प्रारंभ केला.
या वेळी त्यांच्या समवेत त्यांनी पत्नी सौ. सविता कोविंद, कन्या स्वाती कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, आमदार सर्वश्री भरत गोगावले, अनिकेत तटकरे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, तसेच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांसह पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
या वेळी राष्ट्रपती कोविंद भाषणात म्हणाले, ‘‘गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव आणि देशप्रेम वृद्धीच्या परंपरेला प्रारंभ केला. भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी ‘शिवराजविजया’ या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय अन्य भाषांमधून अनुवाद व्हावा. पश्चिम घाट आणि कोकण या निसर्गसंपन्न क्षेत्रात पर्यटन आणि आधुनिकीकरणास अधिक वाव आहे.’’
राष्ट्रपती कोविंद यांनी रायगडावरील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली. ‘मराठा लाईट इन्फंट्री’ या भारतीय सैन्याच्या युनिटच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या युद्धघोषणेचा आवर्जून उल्लेख करून राष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभिमान व्यक्त केला. या वेळी छत्रपती संभाजीराजे यांनी राष्ट्रपतींना आणि त्यांच्या कुटुंबियांना दांडपट्टा, होन, महाराजांच्या आज्ञापत्राची प्रतिकृती या भेटवस्तू दिल्या.