विश्वाची आजची स्थिती !
एकीकडे मानव औद्योगिकीकरण करून वेगाने प्रगती करत आहे. मानव ‘मंगळ’ ग्रहावर उतरू शकेल, तर दुसरीकडे मानव आणि मानवता यांच्या पुढे एकापेक्षा एक भयावह समस्या ‘आ’वासून उभ्या आहेत, उदाहरणार्थ प्रत्येक वर्षी नव्या नव्या विश्वव्यापी रोगग्रस्तता, वाढत असलेला आतंकवाद, वाढत असलेली गरिबी, श्रीमंत आणि गरीब यांमध्ये वाढत असलेली दरी, वाढत असलेली गुन्हेगारी, दिवसेंदिवस मादक पदार्थांची वाढत असलेली विक्री, तस्करी आदींसह वाढत चाललेली महागाई, वाढत असलेले प्रदूषण, वाढत असलेल्या ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे मानव आणि प्राणीमात्र या पृथ्वीवर तग धरू शकतील किंवा नाही ? अशी चिंता !
१. शिक्षण क्षेत्र ‘सेवाक्षेत्रा’च्या अंतर्गत
जागतिक व्यापार संघटनेच्या (वर्ल्ड ट्र्रेड ऑर्गनायझेशन) अंतर्गत व्यापारासंबंधी सेवाक्षेत्राविषयी सर्वसामान्य करार (जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस (गॅटस्)) झाला आहे. शिक्षण हा विषय ‘सेवाक्षेत्रा’च्या अंतर्गत येतो. हा करार भारताला बंधनकारक आहे. तसेच शिक्षण क्षेत्रही व्यापार म्हणून कायद्याच्या दृष्टीने आम्हा सर्वांना बंधनकारक आहे. त्याचमुळे पूर्वी शिक्षण महर्षी होते, आता शिक्षण सम्राट आहेत आणि होत आहेत. प्रत्येक राजकीय नेते शिक्षण संस्थाचालक होत आहे.
शिक्षण मंत्रालयाचे नाव आता ‘मानव साधन संपत्ती (संसाधन) विकास मंत्रालय’, असे झाले आहे. मानव साधन संपत्तीचा माध्यम झाला आहे म्हणजे बुंधा आहे (लाकडाचा किंवा झाडाचा मोठा तुकडा. त्याचे खुर्ची, टेबल, दार किंवा काहीही बनवा.) आम्हाला, कारखान्याचे मालक आणि शासन यांना काय आवश्यक आहे, त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना घडवणार. विद्यार्थी ‘मानव’ म्हणून किंवा मानवाच्या दृष्टीकोनातून विकसित व्हावा, अशी आवश्यकता नाही.
२. अस्थिर औद्योगिक जगत
वर्ष १९४७ ते १९९० या कालखंडात कर्मचारी, शिक्षक एकाच जागेवर उदा. टपाल, रेल्वे, सैन्य, शाळा, महाविद्यालये इत्यादी जागांवर निवृत्त होईपर्यंत चिकटून रहात असे. आज तसे नाही. आज ३० वर्षांचा मुलगा आपल्या समवयस्क युवकाला विचारतो, ‘तू ७ वर्षांपासून या एकाच संस्थेमध्ये कामाला आहे ?’ आज त्यांना अशा गोष्टींचे आश्चर्य वाटते. आज पुष्कळसे काम कंत्राट देऊन बाहेरून करवून घेतात किंवा काही कालावधीसाठी कर्मचारी नेमतात आणि करवून घेतात. अमेरिकेमध्ये ६० सहस्रांपेक्षा अधिक ‘अस्थायी’ कर्मचारी आहेत, उदा. प्राध्यापक, कारागीर असणारी आस्थापने आहेत. ब्रिटनमध्ये ९० टक्के आस्थापने किंवा संस्था अस्थायी कर्मचारी ठेवतात. भारतामध्ये शिक्षक आणि प्राध्यापक शिकाऊ म्हणून मोठ्या प्रमाणात ‘घंटे तत्त्वा’वर काम करत आहेत.
३. अस्थिर समाज
अ. कुटुंबव्यवस्था पद्धत संपुष्टात येत आहे. अमेरिकेमध्ये २००१ या वर्षी बालकांच्या जनसंख्येत ३० टक्के मुले एक पालक बालक म्हणजेच आईकडे किंवा वडिलांकडे रहात होते. वर्ष २०११ मध्ये हे प्रमाण ५० प्रतिशतने वाढले आहे. ब्रिटनची स्थिती नवीन नियमांमुळे जलद गतीने या दिशेने वाटचाल करत आहे. चीनमध्ये ‘हम दो हमारा एक’ यापेक्षा ‘हम दो हमारे न्यूनतम दो’ असे शासनाचे धोरण आहे. जपान तर वृद्धांचा देश होत चालला आहे.
आ. एकूण लोकसंख्येमध्ये काम करणारी (वर्किंग पॉप्युलेशन) आणि काम न करणारी (नॉन वर्किंग पॉप्युलेशन) यांचे गुणोत्तर प्रमाण गतीने पालटत आहे. त्यामुळे सामाजिक सुरक्षेसंबंधी सर्वच प्रगत देश आणि चीन यांसारख्या देशांपुढे मोठी समस्या निर्माण होत आहे, ती पुढेही होणार आहे आणि ती अधिक उग्ररूप धारण करणार आहे.
इ. सर्वच ठिकाणी समाज मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहे.
४. मुसलमान जगत्
मुसलमान जगत् आणि अरब देश यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरसंहार होत आहे. मागील ५ वर्षांमध्ये ५० लक्ष मुसलमान आपापसांत भांडणे आणि आंदोलने यांमध्ये मारले गेले. ‘इसिस’चे संपूर्ण विश्वाला भयकंपित करणारे उग्ररूप समोर येत आहे.
५. आगामी भविष्य
अ. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे जगात वर्ष २०११ नंतर प्रत्येक वर्षी १० लाखांहून अधिक लोक आत्महत्या करत आहेत. ‘वर्ष २०२५ मध्ये विश्वाच्या एकूण लोकसंख्येच्या २६ टक्के लोक मनोरुग्ण असतील’, असा अंदाज वर्तवला आहे.
आ. वैश्विक स्तरावर वैचारिक जगतात झालेले पालट : इ.स. १७ ते १९ या शतकात जडवादाच्या (मटेरिॲलिझम) प्रभाव अत्युच्च होता. याच्या विरुद्ध बोलणे विद्वान लोकांनाही अशक्य होते; परंतु १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकात स्वामी विवेकानंद यांनी ‘वेदांत’ हा विषय जगासमोर ठेवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे २० व्या शतकाच्या पहिल्या शतकामध्ये श्रेष्ठ वैज्ञानिक आईनस्टाईन यांनी स्वतःचे सिद्धांत मांडले, ते जडवादाला भ्रमित करणारे होते. नंतर श्रोडिंगर यांना वर्ष १९३५ मध्ये नोबल पुरस्कार मिळाला. श्रोडिंगर यांनी सांगितले, ‘माझ्या शोध कार्यात जे सिद्धांत आणि पुस्तके मी लिहिली, त्यावरून स्पष्टपणे भारतीय तत्त्वज्ञान सिद्ध होत आहे.’ आपल्या प्रयोगशाळेत पहिला अणूस्फोट करणारे श्रेष्ठ अणुवैज्ञानिक डॉ. ओपेनहायमर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रारंभीच गीतेतील ११ व्या अध्यायातील विश्वदर्शनाचे वर्णन केलेला श्लोक उद्धृत केला आहे. ‘क्वांटम’ पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र) गतीने प्रगत होत आहे. शास्त्रज्ञ जीसेफसन यांना वर्ष १९८४ मध्ये पदार्थविज्ञान (भौतिकशास्त्र) विषयात नोबल पुरस्कार मिळाला. तेही उपनिषदांनी प्रभावित झाले होते. ते उपनिषदांमधील अनेक उदाहरणे देतात.
‘अनेक श्रेष्ठतम वैज्ञानिक भारताच्या प्रस्थानत्रयी (गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्रे) यांचा आधार घेत आहेत. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान आणि पाश्चिमात्य विज्ञान पुष्कळ जवळ येत आहे. संयुक्तपणे अभ्यास केल्यावर जे समाजशास्त्र सिद्ध होईल, ते विश्वामध्ये शांती आणेल’, अशी भविष्यवाणी स्वामी विवेकानंद यांनी केली होती.
आज भारत अध्यात्माचे ‘ज्ञान’ समाजापर्यंत पोचवेल. तेच ज्ञान आहे. २१ वे शतक ज्ञानाचे युग आहे आणि ज्ञानाचे स्पष्टीकरण गीतेमध्ये दिले आहे.
अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १३, श्लोक ११
अर्थ : आत्मा आणि अनात्मा यांच्या विवेकज्ञानामध्ये सतत गढून जाणे, तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच सर्वत्र पहाणे, हे सर्व ज्ञान होय, आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे.
– श्री. मुकुंद गोरे, पुणे (२४.३.२०१६)