बांधकाम क्षेत्रात गोमय आणि गोमूत्र यांची उपयुक्तता !
गायीचे शेण, गोमूत्र यांचा उपयोग आरोग्य क्षेत्र, शेती, तसेच होम-हवन, यज्ञ यांसाठी नेहमीच केला जातो. आता त्याही पुढे जाऊन बांधकाम क्षेत्रातही याची उपयुक्तता लोकांच्या लक्षात येऊ लागली आहे. पुण्यातील युगा आखरे आणि सागर शिरुडे यांनी त्यांच्या लोणावळ्याच्या जवळील वाघेश्वर गावात ७०० वर्षांपूर्वीचे तंत्रज्ञान वापरून बांबू आणि माती यांच्यापासून दोन मजली घर बांधले आहे. हे घर बांधतांना त्यांनी चिकणमातीमध्ये भुसा, गुळाचा रस, कडुलिंब, गोमूत्र आणि गायीचे शेण मिसळले. खालची भूमी सिद्ध करतांना ती शेणाची केली आणि भिंतींनाही गोमूत्र अन् शेण यांनी सारवले. प्रारंभी तेथील ग्रामस्थांनी ‘मुसळधार पावसामुळे घर बांधणे मूर्खपणाचे ठरील’, असे सांगितले; मात्र काही मासांपूर्वी आलेल्या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचाही या घरावर काही परिणाम झाला नाही. प्रत्यक्ष प्रयोगच झाल्याने लोकांना अशा घरांचा लाभ आता लक्षात येऊ लागला आहे.
पूर्वीच्या काळात सर्रास घरे ही गायीच्या शेणापासूनच सारवलेली असत, अगदी भिंतीही शेणानेच सारवल्या जात. नंतर जसजसा सिमेंटचा वापर वाढला, तसतसा शेणाचा वापर अल्प होऊ लागला. सिमेंटच्या अतीवापराचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात येऊ लागल्याने लोकांचा बांबू आणि शेण यांचा वापर करून घरे बांधण्याकडे कल वाढत आहे. घरात शेणाचा थर दिल्याने घातक अतीनील किरणांपासून रक्षण होते, तसेच ‘शांत वाटते’, असेही अनेकांना आता जाणवत आहे. निमशिरगाव (जिल्हा कोल्हापूर) येथील गोतज्ञ नितेश ओझा यांनी त्यांच्या ‘वेद खिल्लार’ गोशाळेत गायीच्या शेणापासून वीट सिद्ध केली असून लोकांकडून त्याची मागणी वाढत आहे. अनेक ठिकाणी आता सिमेंटची घरे असली, तरी खालची भूमी शेणाची, भिंतीला शेणाचा थर, शेणापासून सिद्ध केलेला रंग देणे याकडेही लोकांचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
जर्मनीत बांधकाम क्षेत्रात शेणावर प्रयोग चालू असून ते भारतातून शेण आयात करतात; दुर्दैवाने भारतात याला शासकीय स्तरावर गांभीर्याने पाहिले जात नाही. शेणाच्या लाभाचा शास्त्रोक्त अभ्यास उपलब्ध असून अनेक वास्तूविशारद, बांधकाम क्षेत्रातील तज्ञही पूर्ण घरे शेण आणि बांबू यांपासून बांधण्यास पुढाकार घेत आहेत. जे गायीचे संगोपन करतात त्यांच्यासाठीही शेणापासूनची उपउत्पादने आर्थिक लाभही मिळवून देणारी असल्याने गोशाळांनाही उत्पन्न मिळू शकेल !
– श्री. अजय केळकर, सांगली.