गुलाल-खोबर्याची उधळण करत श्री सिद्धनाथांची रथयात्रा पार पडली !
भाविकांपुढे नमते घेत प्रशासनाची रथयात्रेस अनुमती
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – प्रशासनाने ऐनवळी बैठक घेऊन म्हसवड (जिल्हा सातारा) येथील रथयात्रेस बंदी घातली होती; मात्र ग्रामस्थ, व्यापारी आणि भाविक यांनी संघटितपणे प्रशासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच ‘म्हसवड बंद’ची हाक दिली होती. त्यामुळे प्रशासनाने सिद्धनाथांच्या भक्तांसमोर नमते घेत रथयात्रेस अनुमती दिली. ‘सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं’च्या गजरामध्ये रथयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. मार्गशीर्ष शुक्ल पक्ष प्रतिपदेला दुपारी १२.३० वाजता प्रशासनाचे सर्व नियम पाळत भाविकांनी रथ ओढला; मात्र ग्रामप्रदक्षिणा न करता मैदानात रथ फिरवण्यात आला. या वेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
म्हसवडमध्ये बाहेरगावच्या भाविकांना आत येता आले नाही. ज्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांनाच पोलीस आत येण्यास अनुमती देत होते. प्रतिवर्षी ४-५ लाख भाविक यात्रेसाठी येतात; मात्र यावर्षी यात्रेसाठी केवळ १४-१५ सहस्र भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडली.