‘साधकांची सेवा आणि साधना चांगली व्हावी’, यासाठी त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी (वय ४७ वर्षे) !
मार्गशीर्ष शुक्ल पक्ष चतुर्थी (७.१२.२०२१) या दिवशी सनातनचे ११ वे संत आणि सनातनच्या ग्रंथांचे संकलक पू. संदीप आळशी यांचा ४७ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने ग्रंथांशी निगडित सेवा करणार्या साधकांना जाणवलेली पू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.
पू. संदीप आळशी यांच्या चरणी ४७ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. प्रतिदिन ग्रंथांशी निगडित सेवेच्या कक्षात येऊन साधकांच्या सेवेत येणार्या अडचणी सोडवणे
‘पू. संदीपदादांच्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील रहात्या खोलीत संगणक जोडलेला असल्याने ते अनेक वर्षे दिवसातील बहुतेक वेळ खोलीत बसूनच ग्रंथांशी निगडित सेवा करत होते. जून २०२१ पासून आम्ही काही साधक ग्रंथसेवा शिकत आहोत. आम्हाला ग्रंथांशी निगडित सेवा शिकवण्यासाठी पू. दादा प्रतिदिन दुपारच्या आणि रात्रीच्या महाप्रसादानंतर ग्रंथसेवेच्या कक्षात येतात अन् आमच्याशेजारी बसून आमच्या शंका आणि अडचणी सोडवतात.
२. अत्यल्प अहं आणि शिकण्याची वृत्ती
एकदा एक साधिका पू. दादांना म्हणाली, ‘‘तुम्हाला आमच्यासाठी दिवसातून २ वेळा दोन मजले खाली असलेल्या कक्षात येऊन आमच्या अडचणी सोडवाव्या लागतात. आमच्यामुळे तुम्हाला त्रास होतो.’’ तेव्हा पू. दादा म्हणाले, ‘‘आतापर्यंत ग्रंथसेवा करणारे सगळे साधक अनेक वर्षांपासून ती सेवा करत असल्याने ते अनुभवी होते; पण तुम्ही नवीन आहात. आपण एकत्र बसल्यामुळे मलाही तुमच्याकडून शिकता येते.’’
३. साधकांना होणार्या त्रासाचे स्वरूप ओळखून त्यानुसार त्यांना उपाययोजना करण्यास सांगणे
ग्रंथांशी निगडित सेवा करणार्या बहुतेक साधकांना आध्यात्मिक त्रास आहे. प्रत्येक साधकाची प्रकृतीही वेगवेगळी आहे. पू. दादांमध्ये प्रत्येक साधकाला योग्य प्रकारे हाताळण्याची हातोटी आहे. पू. दादांना ‘साधकांना होणार्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता कितपत आहे ?’, हे ओळखता येते आणि त्यानुसार ते साधकांना आध्यात्मिक उपाय करण्यास सांगतात. त्याचप्रमाणे साधकांना होणार्या शारीरिक आणि मानसिक त्रासांकडेही त्यांचे लक्ष असते अन् ते स्वतःहून आवश्यकतेप्रमाणे त्यांवर उपाययोजनाही सुचवतात.
४. पू. संदीपदादांमुळे ग्रंथांची सेवा करणार्या साधकांची प्रगती होत असल्याचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगणे
पू. संदीपदादा आठवड्यातून एकदा आमचा सत्संग घेतात. सत्संगामध्ये पू. दादा स्वतः आम्हाला ‘व्यष्टी साधनेचे प्रयत्न आणि ग्रंथांशी निगडित सेवेत झालेल्या चुका’, यांसंदर्भात मार्गदर्शन करतात. त्यामुळे आमची व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसण्यास साहाय्य होत आहे. या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा म्हणाले होते, ‘‘संदीपमुळे ग्रंथ सेवेतील साधकांची प्रगती होत आहे.’’
५. आश्रमातून काही काळासाठी घरी गेलेल्या साधकांच्या साधनेकडे लक्ष असणे
एकदा एक साधक-दांपत्य एक मासासाठी आश्रमातून घरी जाणार होते. घरी जाण्यापूर्वी पू. दादांनी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही घरी गेल्यावरही व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा नियमितपणे द्यायला हवा. घरी गेल्यावर साधनेचे प्रयत्न न झाल्यास आपण मायेत अडकून साधनेपासून दूर जातो.’’ घरी गेल्यावर त्या दोघांकडून एक आठवडा साधनेचे प्रयत्न झाले नव्हते. पू. दादांनी त्यांची ही चूक त्यांना सांगायला सांगितली आणि त्यासाठी प्रायश्चित्तही घेण्याचा निरोप देण्यास सांगितला. त्यानंतर ते दोघेही नियमितपणे आढावा देऊ लागले आणि त्यांचे साधनेचे प्रयत्नही होऊ लागले. तेव्हा पू. दादांनी त्यांचे कौतुकही केले.
६. सहसाधकांना घडवण्याच्या संदर्भात उत्तरदायी साधकांना मार्गदर्शन करणे
एकदा एका उत्तरदायी साधिकेने तिची सहसाधिका आश्रमातून घरी गेल्यावर तिच्याकडून होणार्या साधनेच्या प्रयत्नांचा आढावा घेतला नव्हता. त्या वेळी पू. दादांनी त्या उत्तरदायी साधिकेला सांगितले, ‘‘सहसाधकांकडून साधना करवून घेण्याचे दायित्व आपले असते. त्यांना आपल्यासारखेच सिद्ध करायचे असते. ‘ते आपल्यापुढेही गेले पाहिजेत’, असे प्रयत्न त्यांच्याकडून करवून घ्यायला हवेत. त्यासाठी आपल्यात समष्टी तळमळ असायला हवी.’’
‘गुरुदेवा, ‘तुमच्या कृपेमुळे आम्हाला पू. दादांचा सत्संग मिळत आहे. त्याचा आम्हाला आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– ग्रंथांशी निगडित सेवेतील सर्व साधक (३.१२.२०२१)
पू. दादांसारखे आपणही घडावे !
‘परात्पर गुरु डॉक्टर,
पू. संदीपदादा आम्हा सर्व साधकांना नेहमीच तळमळीने मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे आमच्याकडून कृतीही करवून घेतात. असे असूनही ‘परात्पर गुरु डॉक्टरांमुळेच सर्व होते’, असे सांगून ते तुमच्याप्रमाणेच नामानिराळे रहातात. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून काहीतरी लिहावे’, असे मला वाटत होते; पण मला ते शब्दांत व्यक्त करता येत नव्हते. ३.१२.२०२१ या दिवशी सकाळी मला कवितेच्या पुढील ओळी उत्स्फूर्तपणे सुचल्या.
पू. दादांकडे पाहिल्यावर वाटते ।
आपणही असे नम्रमूर्ती बनावे ।। १ ।।
पू. दादांच्या चालण्याकडे पाहिल्यावर वाटते ।
आपलेही प्रत्येक पाऊल गुरुचरणांकडे जाण्यासाठीच पडावे ।। २ ।।
पू. दादांशी बोलल्यावर वाटते ।
आपल्याही मनात गुरुकार्याचा ध्यास निर्माण व्हावा ।। ३ ।।
पू. दादांची सेवा पाहिल्यावर वाटते ।
आपणही केवळ गुरूंसाठी असेच घडावे ।। ४ ।।
अशा गुरुमय झालेल्या पू. संदीपदादांच्या चरणी आणि असे संत घडवणार्या अन् आम्हा सर्वांना अशा संतांचे मार्गदर्शन उपलब्ध करवून देणार्या परात्पर गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२१)
|