‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी स्वीकारला हिंदु धर्म !
यापुढे ‘जितेंद्र नारायण सिंह त्यागी’, हे असेल नवीन नाव !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – ‘उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी येथील डासनादेवी मंदिरात जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरि सरस्वती यांच्या उपस्थितीत हिंदु धर्मात प्रवेश केला. नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर रिझवी यांचे नाव पालटून ‘जितेंद्र नारायण सिंह त्यागी’ ठेवण्यात आले. या वेळी वसीम रिझवी यांचे शुद्धीकरण करण्यात आलेे. यासह हवन आणि यज्ञही करण्यात आले.
Wasim Rizvi becomes Jitendra Narayan Swami: Former Shia Waqf Board chief reverts to Hinduism at Dasna templehttps://t.co/zmPL7hmf2U
— OpIndia.com (@OpIndia_com) December 6, 2021
मला ‘मुसलमान’ म्हणून रहाण्याची लाज वाटत होती ! – जितेंद्र नारायण सिंह त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)
हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर जितेंद्र नारायण सिंह त्यागी म्हणाले की, येथे धर्मांतराचे काही सूत्र नाही. मला इस्लाममधून काढण्यात आल्यावर कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा, हा माझ्यासमोर प्रश्न होता. सनातन जगातील सर्वांत पहिला धर्म असून जितक्या चांगल्या गोष्टी येथे आहेत, तितक्या इतर कोणत्याही धर्मात नाहीत. ‘जुम्मा’च्या दिवशी (शुक्रवारच्या दिवशी) नमाजपठण केल्यानंतर मला मारण्यासाठी बक्षिसांची घोषणा केली जाते. शिर छाटण्याचे फतवे काढले जातात. अशा परिस्थितीत मला ‘मुसलमान’ म्हणून रहाण्याची लाज वाटत होती.
केंद्र सरकारने जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांना सुरक्षा पुरवावी ! – अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज
अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी जितेंद्र नारायण सिंह त्यागी यांचे सनातन धर्मात स्वागत करून त्यांचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, वसीम रिझवी आता ‘हिंदु’ झाले असून त्यांच्याविरोधात फतवा काढण्याचे कुणी धाडस करू नये. केंद्र सरकारने त्यांना योग्य सुरक्षा पुरवावी, अशी मागणी केली.
मुसलमानांनी ठार मारण्याचा फतवा काढल्याने हिंदु पद्धतीनुसार अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्याविषयी रिझवी यांनी सिद्ध केले होते मृत्यूपत्र !
वसीम रिझवी यांनी कुराणातील २६ आयते (वाक्य) काढून टाकण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रविष्ट केली होती; मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर बरेलीतील ‘ऑल इंडिया फैजन ए मदिना कॉन्सिल’ या संघटनेने ‘जो कुणी वसीम रिझवी यांचे शिर छाटेल, त्याला १० लाख रुपये आणि ‘हज’ची विनामूल्य यात्रा घडवून आणली जाईल’, असा फतवा काढला होता. ‘रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नाही’, असे मुसलमान संघटनांचे म्हणणे आहे. त्यानंतर रिझवी यांनी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मृत्यूपत्र लिहून त्यात ‘माझा मृत्यू झाल्यानंतर माझे दफन न करता हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात यावेत. काही लोक मला ठार मारू इच्छित आहेत. मुसलमान कब्रस्तानात माझा दफनविधी होऊ देणार नाहीत. अशात कुठल्याही कब्रस्तानात मला दफन न करता माझ्या शरिराला अग्नी देऊन अंत्यविधी करावा. महंत नरसिंहानंद यांनी माझ्यावर चितेवर अग्नीसंस्कार करावेत’ असे नमूद केले होते.
१. वसीम रिझवी यापूर्वी वर्ष २००० मध्ये लक्ष्मणपुरीच्या काश्मिरी मोहल्ल्यातून समाजवादी पक्षाच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर वर्ष २००८ मध्ये ते ‘शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे सदस्य झाले; मात्र वर्ष २०१२ मध्ये मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) कल्बे जावेद यांच्याशी झालेल्या वादामुळे रिझवी यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
२. वसीम रिझवी यांनी आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयातही गेले होते; मात्र ते या प्रकरणातून निर्दोष सुटले होते.
३. वर्ष २०१८ मध्ये रिझवी यांनी ‘मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात’, असा मोठा आरोपही केला होता. इतकेच नव्हे, तर उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मदरशांमध्ये आतंकवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.