दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यांवर नेणारे गुरूंचे निर्गुण रूपच !
१. दैनिक ‘सनातन प्रभात’ने साधनेत केलेले साहाय्य
‘एकदा प्रसारात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्गणीदारांची वृद्धी करण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी दैनिकाचे महत्त्व समाजाला समजावून सांगण्यासाठी मी दैनिकाविषयी चिंतन करत होते. तेव्हा ‘मला स्वतःला दैनिकामुळे साधनेत किती साहाय्य झाले ?’, हे भगवंताने लक्षात आणून दिले आणि माझ्याकडून दैनिकाप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
१ अ. साधनेच्या प्रारंभी दैनिकातील सूत्रांमुळेच अनेक दृष्टीकोन मिळून साधनेत स्थिरावता येणे : ‘मी साधनेमध्ये नवीन असतांना ‘साधना म्हणजे काय ?’ हे मला ठाऊक नव्हते. सत्संगात सांगितलेली सगळी सूत्रे मला लिहून घेता येत नसत किंवा त्या वेळी ती सगळी मला समजतही नसत; परंतु नंतर दैनिकात त्या सूत्रासंदर्भात लेख प्रसिद्ध झाल्यावर मला ते सूत्र समजायचे. अनेक गोष्टींबद्धल धर्मशास्त्र ठाऊक नसल्यामुळे माझे दृष्टीकोनही योग्य नव्हते. काही सूत्रे सत्संगात सांगितली जात नसत. तेव्हा मला दैनिकाच्या माध्यमातून त्यांविषयी योग्य दृष्टीकोन मिळायचे. प्रतिदिन येणारे दैनिक म्हणजे गुरुदेवांचा प्रतिदिन मिळणारा सत्संगच असायचा; परंतु ‘गुरुदेवांचा तो सत्संग किंवा दैनिक चालू करून गुरुदेवांनी केलेली कृपा’ याची मला तेव्हा जाणीवही नव्हती. आज लक्षात येते की, प्रतिदिन येणार्या दैनिक सनातन प्रभातमुळेच त्या वेळी मला साधनेमध्ये स्थिरावता आले. दैनिक ‘सनातन प्रभात’ म्हणजे गुरुदेवांचे प्रतिदिन येणारे संदेशपत्रच होते.
१ आ. दैनिकामुळे साधनेच्या विविध पैलूंची ओळख होणे : दैनिक सनातन प्रभातमध्ये अनेक साधकांचे लेख प्रसिद्ध होतात. त्यामुळे ‘प्रत्येक साधक कसे प्रयत्न करतो ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागले. त्यानुसार माझ्याकडून थोडेफार प्रयत्न होऊ लागले. ‘गुरुदेवांचे प्रतिदिन मिळणारे मार्गदर्शन म्हणजे दैनिक सनातन प्रभात !’
२. दैनिकामुळेच सनातन संस्थेच्या साधकांची ओळख होऊन सनातन परिवाराची व्याप्ती लक्षात येणे
दैनिक सनातन प्रभातमध्ये अनेक साधकांचे लेख आणि छायाचित्रे छापून येतात. त्यामुळे देशभरातील आणि विदेशातील साधकांची दैनिकाच्या माध्यमातून ओळख होते. त्यांचे गुण आणि साधनेचे प्रयत्न लक्षात येतात. त्यामुळे नकळत प्रत्येक साधकाविषयी जवळीक वाढते. ‘दैनिकामुळे कितीतरी साधक सनातन संस्थेशी जोडले गेले आहेत’, हे लक्षात आले. ‘एवढ्या मोठ्या परिवाराचा आपण एक भाग आहोत’, याची जाणीव झाल्यावर नकळतच मनात सुरक्षिततेची भावना वाढीस लागली. कधी कुणा साधकांची एखाद्या ठिकाणी भेट झाली, तर ते साधक म्हणतात, ‘‘आपण दैनिकाच्या माध्यमातून एकमेकांना ओळखतो.’’ तेव्हा सनातन परिवाराची व्यापक व्याप्ती लक्षात येते.
३. नकारात्मक विचार घालवण्यास आणि संत अन् सद्गुरु यांच्या लेखांच्या माध्यमातून अडचणींवर मात करण्यास साहाय्य करून साधनेसाठी प्रोत्साहन देणारे दैनिक !
जेव्हा माझ्या मनात नकारात्मक विचार येतात, तेव्हा मला इतर साधकांनी साधनेसाठी केलेले खडतर प्रयत्न वाचल्यावर साधनेसाठी प्रोत्साहन मिळते. जेव्हा मला साधनेमध्ये काही अडचणी येतात किंवा विरोध होतो, तेव्हा संत आणि सद्गुरु यांचे लेख वाचल्यामुळे मला त्या अडचणींवर मात करता येते. यासाठीच ‘मला दैनिक सनातन प्रभात म्हणजे साधकांना साधनेच्या पुढच्या टप्प्यांवर नेणारे गुरूंचे निर्गुण रूपच आहे’, असे वाटते.
४. संसारात राहून साधना करणार्या साधकांसाठी दैनिक म्हणजे ‘गुरुदेवांचा चैतन्य वाहक’ असणे
सनातनच्या गोव्यातील रामनाथी आश्रमात होणार्या अनेक यज्ञांचे सूक्ष्म परीक्षण दैनिक सनातन प्रभात मधून प्रसिद्ध होत असते. ते वाचून साधकांना प्रत्यक्ष यज्ञातील चैतन्य अनुभवता येते. त्यामुळे जे साधक संसारात राहून साधना करतात, त्यांच्यासाठी दैनिक म्हणजे गुरुदेवांचा ‘चैतन्य वाहक’च आहे.
५. अष्टांग साधनेचे परिपूर्ण माध्यम असलेले दैनिक सनातन प्रभात !
अ. स्वभावदोष आणि आ. अहं निर्मूलन : दैनिकात प्रसिद्ध झालेले साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भातील लेख, साधकांकडून झालेल्या चुका, साधकांसाठीच्या सूचना आणि देण्यात आलेले दृष्टीकोन या सर्वांमुळे साधकांना स्वभावदोष अन् अहं यांचे निर्मूलन करण्याची प्रक्रिया राबवण्यास साहाय्य होते.
इ. नाम : दैनिक हातात घेतले की, नामजप आपोआप चालू होतो.
ई. सत्संग : दैनिक म्हणजे प्रतिदिन मिळणारा सत्संग आहे.
उ. सत्सेवा : दैनिक वितरणाच्या सेवेमुळे अनेक साधकांना प्रतिदिन सेवेची संधी मिळते.
ऊ. त्याग : दैनिक सनातन प्रभातमुळेच अनेक साधक सेवेच्या माध्यमातून, विज्ञापनदाते अर्पणाच्या माध्यमातून आणि साधक साधनेच्या माध्यमातून तन, मन अन् धन यांचा त्याग करू शकतात.
ए. प्रीती : दैनिकाच्या माध्यमातून अनेक साधक, समाजातील धर्मप्रेमी, दैनिकाचे वाचक, वार्ताहर, विज्ञापन देणारे आणि हितचिंतक या सर्वांचे संघटन होत आहे. सनातन परिवार वाढीस लागत आहे. या सर्वांमध्ये जवळीक आणि प्रेम निर्माण होत आहे.
ऐ. भावजागृती : दैनिकातील चैतन्यदायी लेख; साधकांच्या अनुभूती; साधक, संत अन् परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांची छायाचित्रे आणि त्यांच्या संदर्भातील साधकांचा भाव या सर्वांमुळे भावजागृती होते.
६. ‘दैनिक’ नव्हे, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करणारा ‘सैनिक’ !
दैनिकामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे बीजारोपण होत असल्यानेच सद्गुरु स्वातीताई म्हणतात, ‘‘दैनिक सनातन प्रभात म्हणजे ‘दैनिक’ नाही, तर जगभरातील हिंदूंचे रक्षण करणारा ‘सैनिक’ आहे.’’
७. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘हे गुरुदेवा, आम्हा सर्व साधकांना सनातन प्रभातच्या वाचकांना साधनेत जोडून ठेवता येऊ दे. हे दैनिक योग्य जिज्ञासूंपर्यंत पोचले जाऊन ते वर्गणीदार होऊ देत आणि लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची पहाट होऊ दे’, अशी तुझ्या कोमल चरणी प्रार्थना करते.
– श्रीमती मधुरा तोफखाने, गावभाग, सांगली. (९.४.२०१९)