‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘सनातन प्रभात’ने आरंभीपासूनच आदर्श राष्ट्ररचनेसाठी अराजकीय विचार, राष्ट्र-धर्म हिताचे दृष्टीकोन आणि ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका यांद्वारे वैचारिक क्रांतीचा संदेश दिला आहे. अनेकांनी ‘सनातन प्रभात’चा वैचारिक संदेश कृतीत आणून राष्ट्र-धर्म रक्षणाच्या कृतीही केल्या आहेत. ज्ञानशक्तीमुळे क्रियाशक्ती जागृत होते, हे ‘सनातन प्रभात’मधील ज्ञानशक्तीने सिद्ध करून दाखवले आहे.

‘सनातन प्रभात’चे स्वरूप वैचारिक असण्यासह आध्यात्मिक दृष्टी देणारेही आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये प्रकाशित होणारे संत आणि साधक यांचे अनुभव अन् अनुभूती यांच्या संदर्भातील लेख साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी मार्गदर्शन करतात. जगातील कुठल्याही नियतकालिकामध्ये असे अध्यात्म शिकवणारे लेखन उपलब्ध होणार नाही. ‘सनातन प्रभात’मधील ‘साधना’ आणि ‘अध्यात्म’ या विषयांच्या लेखांचे नियमित वाचन केल्यास वाचकांमध्ये निश्चितच आध्यात्मिक दृष्टी आणि साधकत्व निर्माण होईल.

यासाठी ‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या कार्याचे एक अंग बनण्यासह या जन्माचे सार्थक करण्यासाठी उत्तम साधक बनण्याच्या प्रक्रियेला आरंभ करा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक-संपादक, ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह.